250 workers workless due to the closure of Wipro's Safalya furniture unit | ‘विप्रो’चे साफल्य फर्निचर युनिट बंद झाल्याने २५० कामगार बेकार 
‘विप्रो’चे साफल्य फर्निचर युनिट बंद झाल्याने २५० कामगार बेकार 

ठळक मुद्देकामगारांचा दोन दिवसांपासून कंपनीसमोर ठिय्या कामगार व व्यवस्थापनात वाद सुरू आहेत

वाळूज महानगर (औरंगाबाद ) : कामगार व व्यवस्थापनात सुरू असलेल्या अंतर्गत वादामुळे वाळूज एमआयडीसीतील विप्रो कंपनीचे साफल्य इंडस्ट्रीजमार्फत सुरू असलेले फर्निचर युनिट बुधवारी व्यवस्थापनाने बंद केले. या निर्णयामुळे कंपनीत काम करणाऱ्या २५० कामगारांचा रोजगार हिरावला गेला असून, दोन दिवसांपासून कामगारांनी कंपनीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

वाळूज एमआयडीसीतील विप्रो इंटरप्रायजेस प्रा.लि.मार्फत ७ ते ८ वर्षांपूर्वी साफल्य इंडस्ट्रीज हे युनिट सुरू केले. या युनिटमध्ये विविध प्रकाराचे फर्निचर तयार करण्यात येते. कंपनीत २५० कामगार काम करतात. काही दिवसांपूर्वी या कंपनीतील १६१ पुरुष व ६९ महिला कामगारांनी महाराष्ट्र कामगार विकास संघटनेचे सभासदत्व स्वीकारले होते.

यावरून कामगार व व्यवस्थापनात वाद सुरू झाला. त्यातच आठवडाभरापूर्वी कंपनीतून रॉ-मटेरियल बाहेर पाठविण्यावरून पुन्हा वाद उफाळून आला. व्यवस्थापक सुमित बंड व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवीगाळ करून महिला कामगारांना मारहाण केल्याचा आरोप करीत कामगारांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी व्यवस्थापक बंड यांच्या तक्रारीवरून कामगारांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

व्यवस्थापन व कामगारांतील संघर्षामुळे व्यवस्थापनाने ३० डिसेंबरपासून उत्पादन थांबविले होते. मात्र, कंपनीतील सर्व कामगार शिफ्टप्रमाणे दररोज कंपनीत कामावर येत होते. व्यवस्थापनाने बुधवारी कामगारांना कंपनीत प्रवेश करण्यास मज्जाव करीत टाळे लावले. त्यामुळे संतप्त कामगारांनी दोन दिवसांपासून कंपनीतच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. कंपनी पूर्ववत सुरू करून कामगारांना रोजगार देण्यात यावा, यासाठी कामगार आयुक्त कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे महाराष्ट्र कामगार विकास संघटनेचे संस्थापक सचिव रामकिसन पा. शेळके, उपाध्यक्ष गणेश घोरपडे, शिवशंकर सगट यांनी सांगितले. 

याविषयी साफल्य इंडस्ट्रीजचे भास्कर जाधव म्हणाले की, गतवर्षी मार्चपासून कामगार असहकार्य आंदोलन करून कंपनीतील अधिकाऱ्यांना धमकावत आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले असून, कामगारांमुळे अधिकाऱ्यांच्या जीवितास धोका असल्यामुळे युनिट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

कामगार आयुक्त कार्यालयात बैठक
वादावर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी कामगार उपायुक्त कार्यालयात व्यवस्थापन व महाराष्ट्र कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. मात्र, व्यवस्थापनाने बैठक पुढे ढकलण्याची विनंती केल्याने सोमवारी कामगार उपायुक्त कार्यालयात बैठक होणार असल्याचे सहायक कामगार उपायुक्त शर्वरी पोटे यांनी सांगितले.


Web Title: 250 workers workless due to the closure of Wipro's Safalya furniture unit
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.