शहरातील कचरा उचलण्याचे २११ कोटींचे कंत्राट अडकले चर्चेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 02:01 PM2018-10-20T14:01:34+5:302018-10-20T14:07:17+5:30

इंदूरच्या धर्तीवर महापालिका शहरातील संपूर्ण कचरा उचलण्याचे काम पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला देत आहे.

211 crore contract to get rid of the city's waste in the discussion | शहरातील कचरा उचलण्याचे २११ कोटींचे कंत्राट अडकले चर्चेत

शहरातील कचरा उचलण्याचे २११ कोटींचे कंत्राट अडकले चर्चेत

googlenewsNext
ठळक मुद्दे स्थायी समितीत ठराव एक महिन्यापासून पडून  आता उद्धव ठाकरे यांच्या आगमनापूर्वी बैठक

औरंगाबाद : शहरातील संपूर्ण कचरा उचलण्याचे कंत्राट बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला देण्याचा २११ कोटी रुपयांचा प्रस्ताव शुक्रवारच्या स्थायी समितीची बैठकीतही मंजूर होऊ शकला नाही.

हा प्रस्ताव मागील एक महिन्यापासून स्थायी समितीत पडून आहे.  बैठक सुरु होताच दुसऱ्या मिनिटाला तहकूबही करण्यात आली. आता २३ आॅक्टोबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे औरंगाबादेत येत असून त्यापूर्वी म्हणजेच २२ आॅक्टोबरला स्थायीची बैठक होणार आहे. समितीमधील सदस्यांसोबत २११ कोटींच्या कामावरून अद्याप ‘चर्चा’ पूर्ण झालेली नाही. सदस्यांचे पूर्णपणे समाधान झाल्यावर अंतिम निर्णय होणार आहे.

इंदूरच्या धर्तीवर महापालिका शहरातील संपूर्ण कचरा उचलण्याचे काम पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला देत आहे. एकूण ७ वर्षांसाठीचा हा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे. एक टन कचरा कंपनीने उचलल्यास १८६३ रुपये मनपा देणार आहे. वर्षाला ३० कोटींचा हा खर्च आहे. कंपनी ७५ हातगाड्या, ३०० अ‍ॅटो टिप्पर, ३० हायड्रोलिक टिप्पर, ९ कॉम्पॅक्टर, गरजेप्रमाणे एक्सवेटर आदी यंत्रणा उभी करणार आहे. कचरा उचलण्यासाठी संपूर्ण मनुष्यबळही कंपनीकडेच राहणार आहे.

मागील महिन्यातच मनपा प्रशासनाने प्रस्ताव अंतिम करून स्थायी समितीला सादर केला. समितीमधील सदस्यांचे काही मुद्यांवर एकमत झाले नाही. कंपनीला एक वर्षासाठी काम द्यावे की, सात वर्षांसाठी यासंदर्भात वेगवेगळे मतप्रवाह आहेत. शनिवारी, रविवारी सदस्य सभापतींसोबत चर्चा करणार आहेत. चर्चेनंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल. सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मंगळवारी औरंगाबादेत पदाधिकारी मेळावा घेणार आहेत. त्यापूर्वी एक दिवस अगोदर स्थायीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.  

दोन मिनिटांमध्ये बैठक तहकूब
शुक्रवारी सायंकाळी ५.४५ वाजता स्थायी समितीची बैठक सुरू झाली. समितीमधील सदस्य पूनम बमणे यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याने बैठक पुढे ढकलण्यात यावी, त्यांना श्रद्धांजली अर्पण करावी, अशी मगणी गजानन बारवाल, स्वाती नागरे, शिल्पाराणी वाडकर यांनी केली. श्रद्धांजली वाहण्यात आल्यावर बैठक सोमवारी सकाळी ११.३० वाजता घेण्यात येईल, असे सभापती राजू वैद्य यांनी जाहीर केले.

Web Title: 211 crore contract to get rid of the city's waste in the discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.