अर्ध्या शहरात पाणीपुरवठा; उर्वरित आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 01:24 AM2018-06-08T01:24:40+5:302018-06-08T01:24:40+5:30

तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहिल्याने अमरावतीत पाण्यासाठी हाहाकार उडाला होता. अनेकांना तर अग्निपरीक्षाच द्यावी लागली. पाणीटंचाईचे सचित्रण ‘लोकमत’ने लोकदरबारी मांडल्यानंतर जनसामान्यांनी आभार व्यक्त केले.

Water supply to half a city; Remaining today | अर्ध्या शहरात पाणीपुरवठा; उर्वरित आज

अर्ध्या शहरात पाणीपुरवठा; उर्वरित आज

Next
ठळक मुद्देनागरिकांना दिलासा : सिंभोरा ते नेरपिंगळाई ३३ किमी नवीन पाइपलाइनचा प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहिल्याने अमरावतीत पाण्यासाठी हाहाकार उडाला होता. अनेकांना तर अग्निपरीक्षाच द्यावी लागली. पाणीटंचाईचे सचित्रण ‘लोकमत’ने लोकदरबारी मांडल्यानंतर जनसामान्यांनी आभार व्यक्त केले. वृत्ताची दखल घेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानेही आभार व्यक्त केले. दरम्यान, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानेही दिवस-रात्र एक करून फुटलेल्या पाइप लाइनच्या दुरुस्तीचे काम केले. त्यामुळेच गुरुवारी अर्ध्या शहराचा पाणीपुरवठा सुरू झाला. उर्वरित पाणीपुरवठा शुक्रवारपासून सुरळीत होणार आहे.
सिंभोरा ते नेरपिंगळाईपर्यंतची मुख्य जलवाहिनी कालबाह्य झाल्यामुळे ती पाण्याच्या दबावामुळे फुटण्याची अधिक शक्यता आहे. सोमवारी माहुलीजवळ अचानक मुख्य जलवाहिनी फुटली आणि अमरावतीकरांसमोर जलसंकट निर्माण झाले. ही जलवाहिनी ३३ किलोमीटर लांबीची असून, ती बदलविली जाणार आहे. यासंबंधी प्रस्ताव शासनाकडे लवकरच पाठविला जाणार आहे. कालबाह्य जलवाहिनीमुळे अनेकदा अमरावतीकरांना पाणीपुरवठा बंदची झळ सोसावी लागली. मजीप्राच्या अनियोजित कारभाराच्या परिणामी सोमवारपासून अमरावतीकरांच्या घरी नळ आले नाहीत. मजीप्राने फुटलेली जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धस्तरावर केल्याने पाणीपुरवठा पुन्हा पूर्ववत झाला आहे. भविष्यातही अशाच प्रकारे मजीप्राने तत्परता दाखवावी, अशी अपेक्षा अमरावतीकर व्यक्त करीत आहेत.
रात्री ९.३० वाजता सिंभोराचा पहिला पंप सुरू
माहुलीजवळील पाइप लाइन दुरुस्तीचे काम पूर्ण होताच मजीप्राने सर्वप्रथम पाणीपुरवठ्याची चाचणी घेतली. बुधवारी रात्री ९.३० वाजता सिंभोराचा पहिला पंप सुरू करण्यात आला. त्यानंतर रात्री ११.३० वाजता दुसरा पंप व त्यानंतर चारही पाणीपुरवठा करणारे पंप हळूहळू सुरू करण्यात आले. मध्यरात्री जलशुद्धीकरण केंद्रावर पाणी पोहोचले. गुरुवारी सकाळी ९.३० वाजता जलशुद्धीकरण केंद्रातून खालच्या भागातील टाक्यांपर्यंत पाणी पोहचविले गेले. सायंकाळी ४.३० वाजता शहरातील अर्ध्याअधिक टाक्यांमध्ये पाणीपुरवठा झाला. पाणीपातळीनुसार नागरिकांच्या घरापर्यंत पाणीपुरवठा करण्यात आला.
या भागात झाला पाणीपुरवठा
पाइप लाइनचे काम पूर्ण होताच मजीप्राने सिंभोरा येथून तपोवन जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणले. त्यानंतर गुरूवारी नागपुरी गेट, सातुर्णा, साईनगर, रुक्मिणीनगर या भागातील जलकुंभातून पाणीपुरवठा करण्यात आला. गुरुवारी मध्यरात्री बडनेरा येथे पाणीपुरवठा केला जाईल, असे नियोजन मजीप्राने केले आहे. शुक्रवारी वडरपुरा, मायानगर, कॅम्प अशा उर्वरित भागात नियमित पाणीपुरवठा केला जाणार आहे.

Web Title: Water supply to half a city; Remaining today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.