४८ तासांत विदर्भात हलका पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 10:15 PM2018-05-16T22:15:09+5:302018-05-16T22:16:12+5:30

येत्या ४८ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. सोबतच ४१ ते ४४ डिग्री सेल्सीअस तापमानाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे उन्ह-पावसाचा खेळ रंगण्याची शक्यता आहे.

Vidarbha light rain in 48 hours | ४८ तासांत विदर्भात हलका पाऊस

४८ तासांत विदर्भात हलका पाऊस

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येत्या ४८ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. सोबतच ४१ ते ४४ डिग्री सेल्सीअस तापमानाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे उन्ह-पावसाचा खेळ रंगण्याची शक्यता आहे.
श्री शिवाजी कृषि महाविद्यालयातील हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांच्या अंदाजानुसार, पूर्व उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि विदर्भावर कमी दाबाची द्रोणीय स्थिती १.५ किमी उंचीवर आहे. पश्चिम उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश सीमेवर चक्राकार वारे आहेत. दक्षिण पश्चिम अरबी समुद्रात ठळक कमी दाबाचे क्षेत्र असून, ते पश्चिमेकडे सरकत आहे. त्यामुळे देशाला त्यापासून धोका नसल्याचे मत बंड यांनी मांडले आहे. तथापि, या स्थितीमुळे पुढील ४८ तासांत विदर्भ, मराठवाडा, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या काही भागात तापमान ४४ डिग्रीपर्यंत पोहोचेल तसेच १७ मे रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. १७ ते २० मे दरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
परतवाड्यात मेघगर्जनेसह मान्सूनपूर्व पाऊस बरसला
परतवाडा : प्रचंड उकाड्यानंतर बुधवारी दुपारी २.३० वाजता शहरातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. विजा कडाडल्या आणि वादळी वारा सुटल्याने बाजार समितीध्ये आणलेला माल ओला होण्यापासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांनी एकच धावपळ केली.
अचलपूर नाका ते जयस्तंभ, अंजनगाव स्टॉप, बाजार समिती, परिषद, मिल कॉलनी स्टॉप आदी ठिकाणी पावसाने हजेरी लावली. जोराचा वारा सुटल्याने सर्वत्र धुराळा उडाला होता. बाजार समितीच्या पटांगणात दोनशेवर ट्रॅक्टरमध्ये शेतकºयांनी आणलेली तूर झाकण्यासाठी एकच पळापळ झाली. बाजार समितीने तात्काळ आपल्या गोदामातून शेतकऱ्यांना ताडपत्र उपलब्ध करून दिल्या. २० मिनिटांनी पाऊस थांबला.
धारणीत वाऱ्यासह पावसाचे आगमन
धारणी : तालुक्यात बुधवारी जोरदार वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. भवई पूजेला पावसाचा मान मिळाल्याने आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.
तालुक्यात बुधवारी आदिवासी बांधवांची भवई पूजा होती. यानंतर आदिवासी बांधवांच्या नवीन वर्षाची सुरवात होते. नवीन वर्षात पीक चांगले पिकण्यासाठी व वर्ष सुखसमृद्धीचे जाण्याकरिता भवई पूजा केली जाते. या पूजेला संपूर्ण गावकरी गावाबाहेरील त्यांच्या देवतांना साकडे घालून पूजाअर्चा करतात व तेथेच भोजनाचा आस्वाद घेऊन मनोमीलन करतात. भरपूर पावसाच्या आगमनाकरिता आदिवासी बांधव ही पूजा करतात, अशी आदिवासी बांधवांची श्रद्धा आहे. आज वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्याने भवई पूजेला पावसाच्या आगमनाचा मान मिळाल्याच्या आनंदाने आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

Web Title: Vidarbha light rain in 48 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.