राज्य प्राणी शेकरू पोहोचला अमरावतीपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 08:35 PM2019-06-05T20:35:38+5:302019-06-05T20:36:01+5:30

सह्याद्री पर्वतरांगांतील भीमाशंकर अभयारण्य, मध्य प्रदेश भागात शेकरू आढळतो. खारीच्या वर्गात मोडणारा हा प्राणी आकाराने त्यापेक्षा मोठा असतो.

State animal an Indian giant squirrel reached Amravati | राज्य प्राणी शेकरू पोहोचला अमरावतीपर्यंत

राज्य प्राणी शेकरू पोहोचला अमरावतीपर्यंत

googlenewsNext

- वैभव बाबरेकर

अमरावती : शेकरू या राज्य प्राण्याची काळजी अमरावती वनविभाग घेत आहे. तथापि, हा अतिशय देखणा आणि सह्याद्रीच्या दाट झाडीच्या पर्वतरांगांमध्ये आढळणारा प्राणी अमरावतीपर्यंत कसा पोहोचला, याबाबत कोणीतीही माहिती वनविभागाकडेही अद्याप उपलब्ध नाही. 
सह्याद्री पर्वतरांगांतील भीमाशंकर अभयारण्य, मध्य प्रदेश भागात शेकरू आढळतो. खारीच्या वर्गात मोडणारा हा प्राणी आकाराने त्यापेक्षा मोठा असतो. इंडियन जायंट स्क्विरल या नावाने इंग्रजीत प्रचलित असलेली ही मोठी खार पानगळीच्या जंगलात किंदळ व उंबरसारख्या झाडांवर हमखास आढळत होती. परंतु आता त्यांचा नैसर्गिक अधिवास जंगलतोडीमुळे संकुचित झाला आहे. पंधरा दिवसांपूर्वी हा राज्य प्राणी एका व्यक्तीने वनविभागाच्या स्वाधीन केला. त्यानंतर शेकरूला वडाळी वनपरिश्रेत्रातील बांबू गार्डन येथील संगोपन केंद्रात ठेवण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकाºयांकडून तपासणी करण्यात आली. आता त्याला जंगलात सोडण्याची वेळ आली असून, आल्लापल्ली येथील शेकरू संवर्धन केंद्रात त्याला सोडले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

येथे आढळतो शेकरू
भारतात जायंट स्क्विरल प्रजातीच्या एकूण ७ उपप्रजाती आढळतात. महाराष्ट्रात भीमाशंकर, फणसाळ, आंबा घाटाजवळील जंगलात, आजोबा डोंगररांगांत, माहुली व वासोटा परिसरात शेकरू आढळतो. मेळघाट अभयारण्य, ताडोबा राष्ट्रीय उद्यान येथेही तो दिसतो. विविध प्रकारची फळे व फुलांतील मधुरसाचे भक्षण हे त्याचे खाद्य असते.

अशी आहे शेकरूची शरीररचना
शेकरूचे वजन दोन ते अडीच किलो व लांबी अडीच ते तीन फूट असते. त्याला गुंजेसारखे लालभडक डोळे, मिशा, अंगभर तपकिरी तलमकोट आणि गळ्यावर, पोटावर पिवळसर पट्टा, झुबकेदार लांबलचक शेपूट असते. 

सुरक्षेसाठी सहा ते आठ घरटी
शेकरूची मादी वर्षातून एकदाच डिसेंबर-जानेवारीमध्ये पिलाला जन्म देते. एक शेकरू सहा ते आठ घरे तयार करतो. एका झाडावरून दुस-या झाडावर सहज झेप घेणारा शेकरू १५ ते २० फुटांची लांब उडी घेऊ शकतो. त्यामुळे याला उडणारी खारदेखील म्हणतात. शेकरू डहाळ्या व पाने वापरून गोलाकार आकाराचे घरटे बनवते. सुरक्षेसाठी हे घरटे बारीक फांद्यांवर बांधले जाते, जेथे अवजड परभक्षी पोहोचू शकत नाहीत. त्याची घरटे बांधण्याची पद्धत वेगळी असते. एका झाडावर अनेक ठिकाणी तो घरटी बांधतो. यातील एखाद्या घरट्यातच शेकरूची मादी पिले देतात. या फसव्या घरट्यामुळे पिलांचे शत्रूपासून रक्षण होते. 

शेकरू अमरावतीत कोणत्या माध्यमातून पोहोचला, हे निश्चित सांगता येणार नाही. त्याला आलापल्ली येथील संवर्धन केंद्रात सोडले जाईल. 
- गजेंद्र नरवणे, उपवनसरंक्षक

दुर्मीळ होत चाललेला शेकरूचा पर्यावरण संवर्धनात मोलाचा वाटा आहे. वनविभागाच्या आश्रयात असणाºया शेकरुची योग्य ती काळजी अमरावती विभाग घेत आहे. 
- नीलेश कंचनपुरे, वन्यप्रेमी, अमरावती

Web Title: State animal an Indian giant squirrel reached Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.