अचलपूर- मूर्तिजापूर-यवतमाळच्या शकुंतलेवर अखेर भारतीय रेल्वेची मोहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 11:10 AM2018-01-10T11:10:16+5:302018-01-10T11:11:01+5:30

अचलपूर-मूर्तिजापूर-यवतमाळ लोहमार्गावर धावणाऱ्या शकुंतला रेल्वेवर पहिल्यांदाच भारतीय रेल्वेची मोहर लागली आहे. भारतीय रेल्वे (इंडियन रेल्वे) च्या लोगोसह ‘शकुंंतला सवारी गाडी’ असे नाव रेल्वे प्रशासनाकडून डब्यांवर लिहिण्यात आले आहे.

A stamp of an Indian railroad at Murtijapur-Yavatmal's Shakuntala | अचलपूर- मूर्तिजापूर-यवतमाळच्या शकुंतलेवर अखेर भारतीय रेल्वेची मोहर

अचलपूर- मूर्तिजापूर-यवतमाळच्या शकुंतलेवर अखेर भारतीय रेल्वेची मोहर

googlenewsNext
ठळक मुद्दे‘सवारी गाडी’ असे नामकरण

अनिल कडू
अमरावती : अचलपूर-मूर्तिजापूर-यवतमाळ लोहमार्गावर धावणाऱ्या शकुंतला रेल्वेवर पहिल्यांदाच भारतीय रेल्वेची मोहर लागली आहे. भारतीय रेल्वे (इंडियन रेल्वे) च्या लोगोसह ‘शकुंंतला सवारी गाडी’ असे नाव रेल्वे प्रशासनाकडून डब्यांवर लिहिण्यात आले आहे. यामुळे आता शकुंतला पूर्णत: भारतीय झाली आहे.
काल-परवापर्यंत शकुंतलाच्या डब्यांवर नाव नव्हते, भारतीय रेल्वेचा लोगो नव्हता. १९१६ पासून धावत असलेल्या या रेल्वेला स्वत:चे नाव मिळविण्यासाठी २०१८ पर्यंत म्हणजे १०१ वर्षांची वाट पाहावी लागली. शकुंतलाचा रेल्वे मार्ग १८५७ साली अस्तित्वात आलेल्या मेसर्स क्लिक अँन्ड निक्सन लिमिटेड या ब्रिटिश कंपनीची आस्थापना आहे. कंपनीने १९१३ मध्ये सेंट्रल प्रॉव्हिन्सेस रेल्वे कंपनी लिमिटेडला भारतात एजंट म्हणून नियुक्त केले. पुढे १९१६ ला सेंट्रल प्रॉव्हीन्सेस रेल्वे कंपनी लिमिटेड आणि भारत सरकार यांच्यात एक करार झाला. करारानुसार अचलपूर-मूर्तिजापूर-यवतमाळ हा रेल्वे मार्ग सेंट्रल प्रॉव्हिन्सेस रेल्वे कंपनी लिमिटेड या खासगी कंपनीच्या मालकीचा आहे. या रेल्वे मार्गावर भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागाकडून शकुंतला चालविली जाते. विशेष म्हणजे, हा रेल्वे मार्ग भारतीय रेल्वेच्या मालकीचा नाही. तो केवळ भाडे तत्त्वावर (लीज) आहे .

दर दहा वर्षांनी वाढत गेला करार
१९१६ चा करार ३१ मार्च १९४७ साली रद्द करता आला असता. परंतु, १ एप्रिल १९४७ पासून दर दहा वर्षांनी करार वाढत गेला. २०१६-१७ पर्यंत करार वाढविला गेला. मुदतवाढ देण्यापूर्वी १२ महिन्यांची आगाऊ नोटीस देऊन भारतीय रेल्वेला हा रेल्वे मार्ग विकत घेता आला असता; पण तसेही झाले नाही. रेल्वेच्या राष्ट्रीयीकरणाच्या वेळी हा मार्ग दुर्लक्षित राहिला. यामुळे देशातील हा एकमेव खासगी रेल्वे मार्ग ठरला आहे.

गाडीचे क्रमांकही बदलले
शकुंतला आधी तीन अंकी क्रमांकाने धावत होती. मूर्तिजापूर-अचलपूर अप गाडीचा क्रमांक १३७, तर अचलपूर-मूर्तिजापूर डाऊन गाडीचा क्रमांक १३८ होता. मूर्तिजापूर-यवतमाळ अप गाडीला १३१, तर यवतमाळ-मूर्तिजापूर डाउन गाडीला १३२ क्रमांक होता. आता या गाड्यांना पाच अंकी क्रमांक देण्यात आला आहे. तीन अंकांच्या समोर ५२ हा आकडा लावण्यात आला आहे.

२७ वर्षानंतर लोकभावनेचा आदर
तत्कालीन खासदार सुदाम देशमुख यांनी १९८९-९० मध्ये या रेल्वे मार्गावर संसदेत चर्चा घडवून आणली. चर्चेदरम्यान या रेल्वेचा त्यांनी ‘शकुंतला’ असा नामोल्लेख केला. सुदामकाकांनी केलेला हा नामोल्लेख लोकांनी उचलून धरला. त्यानंतर शकुंतला हे नाव या रेल्वेसाठी लोकाभिमुख झाले. रेल्वे प्रशासनाकडून या लोकभावनेचा तब्बल २७ वर्षांनंतर आदर केला गेला.
 

Web Title: A stamp of an Indian railroad at Murtijapur-Yavatmal's Shakuntala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.