धिप्पाड देहाची सहृदय माणसं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 12:56 PM2018-03-12T12:56:00+5:302018-03-12T12:58:26+5:30

Bhav | धिप्पाड देहाची सहृदय माणसं

धिप्पाड देहाची सहृदय माणसं

Next

गौरवर्णीय, कृष्णवर्णीय, मिश्रवर्णीय आणि तपकिरी रंगाचे आशियाई अशा चार रंगांचे लोक गुण्यागोविंदाने राहत असल्याने या देशाला इंद्रधनुषी देश म्हणतात. या देशाचे वैशिष्ट्य असे की, जुलूम केल्याचा इतिहास ज्यांच्याविषयी आहे ते गौरवर्णीय आणि क्रांतीची ज्योत पेटवून मायभूमीवर पुन्हा जोमदारपणे पाऊल रोवणारे कृष्णवर्णीय यांचे वंशज हे एकविसाव्या शतकात एकत्र राहत आहेत. हिंसा, गुन्हेगारी, वर्णद्वेषाचे चित्र पुसण्यासाठी तेथील तरुण आता आटोकाट प्रयत्न करताना जाणवतात. फारसा पैसा त्यांच्याकडे नसला तरी लोक आनंदी आणि समाधानी आहेत.
दक्षिण आफ्रिकेत जाण्यापूर्वी तिथल्या माणसांविषयी असलेली भावना, कल्पना तेथे गेल्यानंतर पूर्णत: बदलली जाते, याचा अनुभव घेतला. याचे संपूर्ण श्रेय तिथल्या सहृदय, मनमोकळ्या माणसांना द्यावे लागेल. वर्णविद्वेषामुळे प्रचंड क्लेश, छळ, अपमान, भेदभाव, अन्यायाचे हलाहल पचवून ही माणसे सौजन्यशीलतेने पर्यटकांशी वागताना दिसले. संगीत हा त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव असून संगीताचे सूर कानावर पडताच त्यांचे पाय थिरकायला लागतात, मग आपण रस्त्यावर आहोत की, कुठे याचे भान त्यांना नसते. अनौपचारिकता हा त्यांचा आणखी एक गुण. परिचय असो अथवा नको, कुणी भेटले की, हसतमुखाने त्याचे स्वागत आफ्रिकन माणूस करतो. पुढाकार घेऊन विचारपूस करतो. हास्यविनोद करून पहिल्या भेटीतील वा परिचयातील अवघडलेपण दूर करण्यासाठी प्रयत्न करतो.
नेल्सन मंडेला हे त्या देशाचे आणि देशवासीयांचे दैवत आहे. त्यांचे पुतळे, स्मारके, प्रतिमा ठिकठिकाणी दिसून येतात. कृष्णवर्णीयांवर झालेल्या अत्याचाराची स्मृतीशिल्पे उभारून त्यांनी पूर्वजांविषयी आठवणी, त्यांच्या वेदना जिवंत ठेवल्या आहेत. सर्व अधिकारांपासून त्यांना वंचित ठेवले गेले होते. कोणताही आर्थिक व सामाजिक हक्क बजावण्याला मनाई होती. जमिनी, घरे सोडायला भाग पाडून त्यांना झोपडपट्टीत कोंबण्यात आले. त्या वस्तीत अक्षरश: काडेपेटीसारख्या घरांमध्ये ते राहत असत. अजूनही काही प्रमाणात या झोपडपट्ट्या आहेत. उर्वरित झोपडपट्ट्यांच्या जागी घरकुले उभारण्यात आली आहेत. या वातावरणातून बाहेर पडण्याचा प्रयत्न ते करीत आहेत.
कृष्णवर्णीय महिलांची कष्ट करण्याची ताकद अलौकिक आहे. हॉटेलमधील वेटरपासून तर हेलिकॉप्टरमधील पायलटपर्यंत सर्व ठिकाणी त्या लिलया काम करतात. काळा-सावळा रंग, रेखीव आणि हसतमुख चेहरा, तेजस्वी डोळे अशा व्यक्तिमत्त्वाच्या या महिलांनी सौंदर्याची पाश्चिमात्य व्याख्या धुडकावून लावली. मॉडेल, अभिनेत्री, नृत्यांगना, सूत्रसंचालक अशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये त्या चांगली कामगिरी करीत आहेत.
हिंसा, गुन्हेगारी, वर्णद्वेषाचे चित्र पुसण्यासाठी तेथील तरुण आता आटोकाट प्रयत्न करताना जाणवतात. फारसा पैसा त्यांच्याकडे नसला तरी लोक आनंदी आणि समाधानी आहेत.
त्यांच्या प्रगतीला अडथळे म्हणजे, प्रचंड गरिबी, रोगराई, शिक्षणाचा अभाव ही आहेत. परंतु त्यावर मात करण्याची इच्छाशक्ती या लोकांमध्ये आहे. ९ राज्ये, ११ भाषा अशी वैविध्यपूर्ण भौगोलिकता आणि संस्कृती हे एक वैशिष्ट्य आहे.
- मिलिंद कुलकर्णी

Web Title: Bhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव