१०० दिवसांत रबीचे चार टक्केच कर्जवाटप; पश्चिम विदर्भाची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 04:48 PM2018-12-20T16:48:28+5:302018-12-20T16:48:58+5:30

यंदाच्या खरिपात शेतक-यांना कर्जवाटपात बँकांनी असहकार्य केल्यानंतर रबीतही हाच प्रकार सुरू ठेवला आहे. रबी हंगामाच्या १०० दिवसांत विभागातील बँकांनी फक्त चार टक्केच कर्जवाटप केले.

4 percent of Rabi debt disbursements in 100 days; The condition of western Vidharbha | १०० दिवसांत रबीचे चार टक्केच कर्जवाटप; पश्चिम विदर्भाची स्थिती

१०० दिवसांत रबीचे चार टक्केच कर्जवाटप; पश्चिम विदर्भाची स्थिती

Next

अमरावती : यंदाच्या खरिपात शेतक-यांना कर्जवाटपात बँकांनी असहकार्य केल्यानंतर रबीतही हाच प्रकार सुरू ठेवला आहे. रबी हंगामाच्या १०० दिवसांत विभागातील बँकांनी फक्त चार टक्केच कर्जवाटप केले. विशेष म्हणजे शेतक-यांची म्हणविणा-या जिल्हा बँकेसह ग्रामीण बँकेचे वाशीम वगळता चार जिल्ह्यांत रबीचे कर्जवाटप निरंक आहे. शेतमालास किमान हमीभावही नाही अन्  हंगामासाठी कर्जवाटपही नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.
अत्यल्प पावसामुळे खरिपाचा हंगाम उद्ध्वस्त झाल्याचा थेट परिणाम रबी हंगामावर झाला. जमिनीत आर्द्रतेचा अभाव असल्याने यंदा अमरावती विभागातील रबीचे दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र नापेर राहिले. ज्या शेतक-यांजवळ संरक्षित सिंचनाची सुविधा आहे, त्यांनादेखील बँका कर्ज नाकारत असल्याचे चित्र दुर्देवी आहे. अमरावती विभागात यंदाच्या रबी हंगामासाठी बँकांना ६९७ कोटी ९९ लाखांचे कर्जवाटपाचे लक्ष्यांक देण्यात आले. त्या तुलनेत आतापर्यंत बँकांनी फक्त २,८९२ शेतक-यांना २९ कोटी ८६ लाखांचे कर्जवाटप केले, याची टक्केवारी केवळ ४ एवढी आहे.
जिल्हा बँकांना यंदा १९० कोटी ५३ लाखांचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत फक्त ५५० शेतक-यांना एक कोटी ४९ लाख ९२ हजारांचे कर्जवाटप केले. ही ०.७९ टक्केवारी आहे. शेतक-यांची म्हणविणारी जिल्हा बँक शेतक-यांनाच कशी नाडवते, हे त्याचे उदाहरण आहे. राष्ट्रीयीकृत बँकांना ४७० कोटींचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत १,१४३ शेतक-यांना ११ कोटी ६६ लाखांचे वाटप केले, तर ग्रामीण बँकांना ३४ कोटी ४३ लाखांचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत फक्त वाशिम जिल्ह्यात ८८ शेतक-यांना ६२ लाखांचे कर्ज वाटप केले आहे. शेतकरी बँकाचे उबंरठे झिजवीत असताना बँका कर्ज नाकारत असल्याची विभागाची शोकांतिका आहे.

२.३० लाख शेतकरी कर्जमाफीच्या प्रतिक्षेत
शासनाने जून २०१७ मध्ये कर्जमाफी जाहीर केली. यासाठी विभागातील  नऊ लाख ७२ हजार १३७ शेतक-यांनी कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज दाखल केले. त्या तुलनेत आतापर्यत जाहीर १३ ग्रीन लिस्ट मध्ये सात लाख ४१ हजार ६०२ शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. यामध्ये जिल्हा बँकेच्या तीन लाख ९५ हजार ९१८ शेतकºयांचे १,७५८ कोटी ३६ लाखांचे तर राष्ट्रीयीकृत बँकांच्या तीन लाख ४५ हजार ९८४ शेतक-यांचे १९९६ कोटी २५ लाखांचे कर्ज माफ झाले. अद्याप दोन लाख ३० हजार ५३५ शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेतच आहेत.

Web Title: 4 percent of Rabi debt disbursements in 100 days; The condition of western Vidharbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.