Water cup competition : सहा गावात येणार श्रमदानाचे तुफान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 04:18 PM2019-04-30T16:18:09+5:302019-04-30T16:26:48+5:30

अकोला जिल्ह्यातील सहा गावांमध्ये १ मे महाराष्ट्र दिनी महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे.

Water Cup Competition: water conservation work will done in Six villages | Water cup competition : सहा गावात येणार श्रमदानाचे तुफान!

Water cup competition : सहा गावात येणार श्रमदानाचे तुफान!

Next
ठळक मुद्देश्रमदान करण्यासाठी जिल्ह्यातील १२ हजार २१ जलमित्रांनी नोंदणी केली आहे. धाडी, अडगाव, कोठा, जांभरून, गोरव्हा, सायखेड या गावांचा समावेश आहे.गावात मजुरी करणारे ग्रामस्थ दररोज नियमित श्रमदान करीत आहेत.

- संदीप वानखडे

अकोला: गेल्या काही वर्षांपासून अल्प पाऊस होत असल्याने जिल्ह्याला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या वॉटर कप स्पर्धेत ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने श्रमदान करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील सहा गावांमध्ये १ मे महाराष्ट्र दिनी महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाश्रमदासाठी जिल्ह्यातील १२ हजार २१ जलमित्रांनी नोंदणी केली आहे. जलमित्रांसह अधिकारी, पदाधिकारीही श्रमदानात सहभाग घेणार आहेत.
जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये ८ एप्रिलपासून वॉटर कप स्पर्धेस सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत सहभागी झालेली गावे पाणीदार करण्यासाठी श्रमदान करीत आहेत. येत्या १ मे रोजी जिल्ह्यातील सहा गावांमध्ये महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रमदान करण्यासाठी जलमित्रांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील १२ हजार २१ जलमित्रांनी नोंदणी केली आहे. श्रमदान होणाºया गावांमध्ये अकोट तालुक्यातील रुधाडी, तेल्हारा तालुक्यातील अडगाव, कोठा, पातूर तालुक्यातील जांभरून आणि बार्शीटाकळी तालुक्यातील गोरव्हा, सायखेड या गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये श्रमदानाचे महातुफान येणार आहे. महाश्रमदानात त्या-त्या तालुक्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यासह इतर अधिकारी, पदाधिकारी सहभाग घेणार आहेत. तसेच जांभरुण येथे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, उपजिल्हाधिकारी लोणारकर आदी मान्यवर श्रमदान करणार आहेत.
अकोट तालुक्यातील रुधाडी हे गाव आदिवासीबहुल गाव आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी निसर्गरम्य असलेल्या गावात मजुरी करणारे ग्रामस्थ दररोज नियमित श्रमदान करीत आहेत. त्याची दखल घेऊन या गावाची महाश्रमदानासाठी निवड करण्यात आली आहे. तेल्हारा तालुक्यातील अडगाव येथे दरररोज नियमित श्रमदान होत आहे. कोठा हे खारपाणपट्ट्यातील छोटेशे गाव श्रमदानासाठी एकजूट झाले आहे. त्यामुळे दोन्ही गावात महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे. पातूर तालुक्यातील जांभरून येथे फासेफारधी समाजाचे वास्तव्य आहे. येथील पानदेव टेकडी प्रसिद्ध आहे. पाणलोटच्या उपचारासाठी टेकडीचा लाभ होणार आहे. त्यामुळे या गावाची निवड करण्यात आली आहे. गोरव्हा आणि सायखेड येथे मजुरी करणारे ग्रामस्थ श्रमदान करीत आहेत. त्यामुळे तेथेही महाश्रमदान होणार आहे.


अशी झाली जलमित्रांची नोंदणी
तेल्हारा - ४०४१
बार्शीटाकळी - ३३००
अकोट - २३४१
पातूर - २३३९

श्रमदानातून ही होतील कामे
या महाश्रमदानातून समतल चर, दगडी बांध, माती नाला बांध, कंटूर बांध आदी जलसंधाणाच्या उपचाराची कामे करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सहा गावांमध्ये हजारो जलमित्र एकाच वेळी श्रमदान करणार आहेत. तसेच या श्रमदानात वकील संघटना, विद्यार्थी संघटना, शिक्षक संघटना, बचत गटातील महिला, पोलीस प्रशासन, अधिकारी, पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

जलसंधारणाची चळवळ लोकांनी आपली म्हणून स्वीकारली आहे. दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी ग्रामस्थ सज्ज झाले आहेत. तुमचे दोन हात आणि दोन तास जलक्रांती घडवू शकतात. त्यासाठी महाराष्ट्र दिनी चारही तालुक्यांमध्ये जलमित्रांसह ग्रामस्थांनी श्रमदान करून जलक्रांतीमध्ये आपले योगदान द्यावे.
नरेंद्र काकड, जिल्हा समन्वयक , पाणी फाउंडेशन

 

Web Title: Water Cup Competition: water conservation work will done in Six villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.