भाजपातील अनेक लोक सहमत; पण भीतीपोटी बोलत नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 02:16 AM2017-10-17T02:16:52+5:302017-10-17T02:40:29+5:30

अकोला: भारतीय जनता पक्षातील अनेक नेते, कार्यकर्ते आपल्या भूमिकेशी सहमत असले तरी, ते भीतीपोटी समोर येऊन बोलायला तयार नसल्याचे प्रतिपादन, गत काही दिवसांपासून स्वपक्षाच्या सरकारच्या विरोधात मोर्चा उघडलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी रविवारी येथे ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीदरम्यान केले. 

Many people in BJP agree; But do not talk about fear! | भाजपातील अनेक लोक सहमत; पण भीतीपोटी बोलत नाहीत!

भाजपातील अनेक लोक सहमत; पण भीतीपोटी बोलत नाहीत!

Next
ठळक मुद्दे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांची ‘लोकमत’ला खास मुलाखत

रवी टाले । 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: भारतीय जनता पक्षातील अनेक नेते, कार्यकर्ते आपल्या भूमिकेशी सहमत असले तरी, ते भीतीपोटी समोर येऊन बोलायला तयार नसल्याचे प्रतिपादन, गत काही दिवसांपासून स्वपक्षाच्या सरकारच्या विरोधात मोर्चा उघडलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी रविवारी येथे ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीदरम्यान केले. 
शेतकरी जागर मंच या संघटनेने आयोजित केलेल्या ‘भारतीय अर्थव्यवस्था, नोटाबंदी, जीएसटी व शेतकरी’ या विषयांवरील व्याख्यानाच्या निमित्ताने अकोल्यात आलेल्या सिन्हा यांनी अत्यंत व्यस्त कार्यक्रमातून ‘लोकमत’ला मुलाखत देण्यासाठी वेळ काढला. त्यांनी यावेळी राजकारणापासून अर्थकारणापर्यंत विविध प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली. त्या संवादातील हे निवडक अंश:

प्रश्न: काही दिवसांपूर्वी एका राष्ट्रीय दैनिकात ‘मी आता बोलायलाच हवे!’ या शीर्षकाचा लेख लिहून देऊन आपण देशात एकच मोहोळ उठवून दिले. आपण आता बोलायलाच हवे, ही जाणीव आपणांस सर्वप्रथम केव्हा झाली?

सिन्हा: मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी आहे. गत अनेक दिवसांपासून देशात जे काही चाललंय ते मी एक मूकदर्शक बनून बघत होतो. त्या दरम्यान मला ही जाणीव झाली, की जे काही होत आहे ते ठीक नाही. त्यानंतर मी माझ्या मनातील विचार कागदावर उतरविण्याचा प्रयत्न केला. तो लेख प्रसिद्ध झाल्यानंतर ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्यामुळे मला आश्‍चर्याचा सुखद धक्का बसला. त्यावेळी मला ही जाणीव झाली, की एक दुखती नस आहे आणि मी नेमके त्यावर बोट ठेवले आहे. माझ्या पक्षातून कशी प्रतिक्रिया उमटेल, याबाबत मी थोडा साशंक होतो; पण माझ्या पक्षातील अनेकांनी माझ्या भूमिकेचे स्वागतच केले. तुम्ही पुढाकार घेतला हे बरे केले, अशीच बहुतांश जणांची प्रतिक्रिया होती; परंतु माझ्या भूमिकेचे स्वागत करणारे माझ्या पक्षातील लोक कुठे तरी भयभीत आहेत, हे माझ्या लक्षात आले. मी त्यांना सांगतोय, की असे घाबरून चालणार नाही. लोकशाही आणि भय एकत्र नांदू शकत नाहीत. भय झुगारण्याची गरज आहे. 
प्रश्न : मंत्रिमंडळात एकत्र काम केलेले सहकारी, पक्षातील ज्येष्ठ सहकारी अशांपैकी नेमके किती लोक आपल्या सोबत आहेत?

सन्हा : खूप लोक सहमत आहेत; मात्र ते उघडपणे बोलायला तयार नाहीत. घाबरतात. 

प्रश्न : आपण भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रकृतीचे निदान केले आहे, तिच्या भवितव्याविषयी मतप्रदर्शन केले आहे. मग स्वपक्षाच्या भविष्याविषयी आपल्याला काय वाटते? विशेषत: २0१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीतील कामगिरीबाबत आपले आकलन काय? 

सिन्हा : या विषयावर मी फार टिप्पणी करणार नाही. लोकसभा निवडणुकीला अद्याप बराच अवकाश आहे. राजकारणात परिस्थिती अचानक अनुकूल होते, अचानक प्रतिकूल होते. त्यामुळे मी या घडीला त्या संदर्भात भविष्यवाणी करणार नाही; परंतु हे लक्षात घेतले पाहिजे, की आताच आलेल्या बातमीनुसार, भाजपाचा गुरदासपूर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत पराजय झाला आहे. नांदेड महापालिका निवडणुकीत काय झाले, ते तुम्हाला ज्ञातच आहे. अर्थात तिथे आमच्या जागा वाढल्या, असे काही लोक म्हणू शकतात. त्यामुळे निवडणूक निकाल सोडून द्या; पण जनतेमध्ये कुठे तरी निराशेची भावना व्याप्त आहे, हे मला सतत जाणवत आहे. 

प्रश्न : आपल्या पक्षात हुकूमशाही सुरू आहे, असे आपल्याला वाटते?

सिन्हा : हुकूमशाही आहे अथवा नाही, ते सोडा; पण तुम्ही बघा, नुकतेच आमचे मित्र अरुण शौरी असे म्हणाले, की अडीच लोक पक्ष आणि सरकार चालवित आहेत. शत्रुघ्न सिन्हाही तेच बोलले, की दोन लोकच पक्ष चालवित आहेत. थोडक्यात काय, तर पक्षात जी भयमुक्त भागिदारी असायला हवी, ती कुठे दिसत नाही. 

प्रश्न : सध्याच्या घडीला अर्थव्यवस्थेसमोरील सर्वात मोठे आव्हान कोणते आहे? आपल्याला काय वाटते, यापुढे अर्थव्यवस्था अधिकाधिक विस्कळीत होत जाणार, की रुळावर येणार?

सिन्हा : मला असे वाटते, की अर्थव्यवस्थेसमोरील सगळ्यात मोठी समस्या आम्हाला विरासत म्हणून मिळाली आहे. या सरकारला त्यासाठी दोष देता येणार नाही. ती समस्या म्हणजे ‘बंॅकांचे नॉन परफॉर्मिंग असेट्स’ म्हणजेच फसलेली कर्जे! एक घसरणीला लागलेली अर्थव्यवस्था आम्हाला मिळाली होती. बंॅकांचे एनपीए वाढू लागले होते, त्यावेळी आम्ही असे बोलत होतो, की सर्वप्रथम एनपीए नियंत्रणात आणणे गरजेचे आहे; पण गेल्या साडेतीन वर्षात आम्ही ते नियंत्रणात तर आणू शकलोच नाही, उलट ते वाढत गेले. त्यामुळेच खासगी क्षेत्राकडून गुंतवणूक वाढलेली नाही. कोणत्याही सरकारकडे एवढा खजिना नसतो, की सरकार स्वत:च्या गुंतवणुकीतून अर्थव्यवस्थेला गती प्रदान करू शकेल. भरीव गतीसाठी खासगी क्षेत्राची गुंतवणूक अत्यावश्यक असते.

प्रश्न : यासाठी धोरणात्मक अपयश कारणीभूत आहे?

सिन्हा : कुठे ना कुठे तरी अंमलबजावणीच्या पातळीवर त्रुटी आहेत. 

प्रश्न : जर यशवंत सिन्हा अर्थमंत्री असते, तर जे झाले त्यापेक्षा वेगळे असे त्यांनी काय केले असते?

सिन्हा : माझ्यासाठी हा प्रश्न काल्पनिक नाही. मी अर्थमंत्री म्हणून काम केले आहे. मी काम करून दाखविले आहे. एनपीएचाच विषय घ्या. सर्वोच्च न्यायालयाकडून आवश्यक ती अनुमती घेऊन आम्ही कर्ज वसुलीसाठी कायदा केला आणि कर्ज वसुली लवादांचे गठन केले. त्यानंतर पुन्हा एक कायदा बनवून आम्ही लवाद आणि बंॅकांना, की विजय मल्ल्यासारख्या जाणीवपूर्वक कर्जे थकविणार्‍या लोकांच्या गहाण मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार प्रदान केले. त्यानंतर जाणीवपूर्वक कर्जे थकविलेल्या आणि परिस्थितीवश कर्ज थकलेल्या कर्जदारांमध्ये भेद करून, परिस्थितीवश कर्जे थकलेल्या लोकांसाठी तोडगे काढता येतील, अशा व्यवस्थेचे निर्माण केले. याशिवाय एनपीए वाढलेल्या बंॅकांसाठी ‘असेट कंस्ट्रक्शन कंपनी’ची स्थापना करून बंॅकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. अशी सात-आठ पावले आम्ही उचलली होती, ज्यामुळे एनपीएच्या समस्येवर आम्ही बर्‍याच प्रमाणात मात केली होती. 

प्रश्न : आपल्या सध्याच्या हालचाली आणि विश्‍वनाथ प्रताप सिंग यांच्या १९८७-८८ मधील हालचाली, यामध्ये बरीच साम्यस्थळे दिसतात..

सिन्हा : (हसत हसत) तुम्ही खूप पुढचा विचार करीत आहात! 

Web Title: Many people in BJP agree; But do not talk about fear!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.