मूलभूत सुविधांची वानवा; महापालिकेचा ‘फ्लॉप शो’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 03:14 PM2019-09-13T15:14:21+5:302019-09-13T15:14:57+5:30

आठवडा उलटून गेला असला तरी प्रभावी उपाययोजना होत नसल्यामुळे महापालिकेचा शो फ्लॉप ठरल्याचे समोर आले आहे.

Lack of infrastructure; Akola Municipal 'Flop Show' | मूलभूत सुविधांची वानवा; महापालिकेचा ‘फ्लॉप शो’ 

मूलभूत सुविधांची वानवा; महापालिकेचा ‘फ्लॉप शो’ 

Next


अकोला: प्रभागात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची नैतिक जबाबदारी महापालिकेची आहे. प्रशासनाने नियुक्त केलेले विविध विभागातील कर्मचारी नगरसेवकांच्या हातावर तुरी ठेवण्यात पटाईत झाल्यामुळे प्रभागांमध्ये मूलभूत सुविधांची दाणादाण उडाल्याचे चित्र आहे. मनपाच्या प्रशासकीय कारभारावर चारही बाजंूनी टीकेची झोड उठत असल्यामुळे आयुक्त संजय कापडणीस यांनी सारवासारव करण्याच्या उद्देशातून झोननिहाय बैठकीच्या माध्यमातून नगरसेवकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आठवडा उलटून गेला असला तरी प्रभावी उपाययोजना होत नसल्यामुळे महापालिकेचा शो फ्लॉप ठरल्याचे समोर आले आहे.
शहरवासीयांजवळून कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्याच्या बदल्यात महापालिका प्रशासनाने रस्ते, नाल्या, पथदिवे, पदपाथ, दैनंदिन पाणी पुरवठा तसेच साफसफाई आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त ठरते. मनपाच्या आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारणाऱ्या संजय कापडणीस यांच्या कालावधीत मूलभूत सुविधांकडे साफ दुर्लक्ष झाल्याचे चित्र समोर आले आहे. याबाबत विरोधी पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तसेच भारिप-बमसंच्या नगरसेवकांपेक्षा खुद्द सत्ताधारी भाजपमधील नगरसेवकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटू लागला आहे. सत्ता असूनदेखील प्रशासनाला वारंवार सूचना केल्यानंतरही प्रभागातील समस्यांचा निपटारा न करता त्याकडे पाठ फिरविल्या जात असल्याचा आरोप भाजप नगरसेवकांमधून केला जात आहे. प्रभागांमध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून नाल्या, गटारे, सर्व्हिस लाइन घाणीने तुंडुंब साचल्या आहेत. ऐन पावसाळ्यात ही परिस्थिती निर्माण झाल्यामुळे साथीच्या आजारांनी अकोलेकर बेजार झाल्याचे चित्र आहे. त्याचा रोष नगरसेवकांवर व्यक्त केला जात आहे. या समस्यांकडे आयुक्तांकडून कानाडोळा केला जात असल्याने नगरसेवकांची मुस्कटदाबी होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Web Title: Lack of infrastructure; Akola Municipal 'Flop Show'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.