विषमुक्त अन्ननिर्मितीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 11:45 AM2018-10-18T11:45:22+5:302018-10-18T11:45:54+5:30

यशकथा : शेतीचा पोत व आर्थिक नियोजन बसत नसल्याने यावर उपाय म्हणून झीरो बजेट नैसर्गिक शेतीचा निर्णय त्यांनी घेतला.

Filled with poisonous food production | विषमुक्त अन्ननिर्मितीवर भर

विषमुक्त अन्ननिर्मितीवर भर

Next

- सत्यशील सावरकर (तेल्हारा,अकोला)

अकोला   जिल्ह्यातील  वरूड बिहाडे (ता. तेल्हारा) येथील प्रमोद श्रीकृष्ण बिहाडे हे पन्नास वर्षीय शेतकरी आपल्या वडिलोपार्जित शेती व किराणा व्यवसायात वडील थकल्यामुळे स्वत: गुंतले. सुरुवातीला रासायनिक खते व विषारी औषधे लोक वापरतात म्हणून वापरले. पीकसुद्धा झाले. मात्र, शेतीचा पोत व आर्थिक नियोजन बसत नसल्याने यावर उपाय म्हणून झीरो बजेट नैसर्गिक शेतीचा निर्णय त्यांनी घेतला. यासाठी विविध शिबिरे घेतली. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या.

सुरुवातीला २०१६ मध्ये एकरभर जमीन नैसर्गिक पद्धतीत केली, तर या वर्षात पूर्ण अकरा एकर शेतजमिनीत नैसर्गिक पद्धतीने मिश्रपिकाची पेरणी केली आहे. यामध्ये पाच एकर सोयाबीन, एक एकर ऊस, सोयाबीन, दोन एकर हळद, तूर, तीन एकर कपाशी, चवळी-उडीद पेरणी ही पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने केली. यासाठी पेरणीपूर्व मशागत करताना नागरटी, वखरणीसोबत देशी गायीच्या शेणापासून बनविलेले घनजीवामृत सोडले. त्यानंतर बियाणे व पेरणी नियोजन करून जसजशी पीकवाढ होत होती त्या प्रमाणात डवरणी, निंदण, वखरणी करून नैसर्गिकरीत्या बनविलेले जीवामृत, निमास्त्र, ब्रह्मास्त्र, अग्निअस्त्र, दशपर्णी अर्क, सप्तधान्य अंकुर अर्क, आंबट ताक इत्यादींची वेळोवेळी नियमित फवारणी केल्याने पिकांवर कोणताही रोग किंवा कीटकांचे प्रमाण नाही. त्याचप्रमाणे पेरणीनंतर एक महिन्याने एकरी दोनशे लिटरप्रमाणे जीवामृताचा पिकाला स्प्रिंकलरद्वारे डोस दिला.

यामुळे आज पीक जोमात आहे. गत तीन-चार वर्षांत नवनवीन प्रयोग परंपरागत पिकात केले. मिश्र पीक पद्धती अवलंबून शेती केल्याने चांगले उत्पादन झाले. एका पिकात कमी उत्पादन झाल्यास दुसऱ्या पिकाने चांगले उत्पादन देऊन आर्थिक बजेट समतोल ठेवला. २०१५-१६ मध्ये तुरीची पेरणी केली. यामध्ये आंतरपीक म्हणून मूग, उडीद घेतला. एकरी तेरा क्विंटल तूर व चार क्विंटल उडीद झाले.

त्यानंतर पुढील वर्षी मिश्रपीक पद्धतीने सहजीवन पिके घेतली. तूर, ज्वारी, उडीद, हळद, मिरची यांची चोवीसच्या सोयात पेरणी केली. यामध्ये दर नऊ फुटांवर तुरीचे तास, दोन तासांत ज्वारी व त्यामध्ये उडीद, तसेच तूर व ज्वारीच्या फटात आजूबाजूला एक फुटावर हळद पीक घेतले. यामधे तूर एकरी सहा क्विंटल, ज्वारी चार क्विंटल, उडीद पाच क्विंटल, हळद बारा क्विंटल आठ गुंठ्यामध्ये पीक आले. यामध्ये मिरची पिकाने उत्पादन कमी दिले तरी खर्च वजा एकरी एक लाख रुपयांचे पीक मिळाले. यामधील उडीद व ज्वारी थेट न विकता याचे मिश्र दळण करून आटा विक्री ठिकठिकाणी आयोजित प्रदर्शनात केली. यामध्ये चांगला भाव मिळाला व विनाविषारी औषध खताचा माल विकण्याने मानसिक समाधान मिळून आर्थिक बजेट बसले.  

Web Title: Filled with poisonous food production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.