महाविद्यालयातच होणार परीक्षा अन् प्रश्नपत्रिकांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 10:30 AM2020-09-09T10:30:14+5:302020-09-09T10:30:30+5:30

विद्यार्थी शिकत असलेले महाविद्यालयच परीक्षा केंद्र राहणार असून, तेथेच पेपर तपासल्या जाणार आहेत.

Examination and examination of question papers will be done in the college itself | महाविद्यालयातच होणार परीक्षा अन् प्रश्नपत्रिकांची तपासणी

महाविद्यालयातच होणार परीक्षा अन् प्रश्नपत्रिकांची तपासणी

Next

बुलडाणा: अंतिम वर्ष आणि सत्रांच्या परीक्षा घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने या परीक्षांचे नियोजन केले आहे. याविषयी महाविद्यालयांना पत्र पाठवून परीक्षा घेण्याचे निर्देश विद्यापीठाने दिले आहेत. आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या परीक्षांना सुरुवात होणार आहे. विद्यार्थी शिकत असलेले महाविद्यालयच परीक्षा केंद्र राहणार असून, तेथेच पेपर तपासल्या जाणार आहेत.
अंतिम सत्राच्या अभियांत्रिकी व तांत्रिकी अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा या आॅनलाइन पद्धतीने बहुपर्यायी स्वरूपात होणार आहेत. प्रत्येक युनिटवर १० प्रश्न अशा ६० प्रश्नांपैकी विद्यार्थांना ३० प्रश्न आॅनलाइन पद्धतीने शिकत असलेल्या महाविद्यालयांतील परीक्षा केंद्रावर द्यावी लागणार आहे. परीक्षेचा कालावधी हा ९० मिनिटांचा राहणार आहे. इतर अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा या उन्हाळी २०२० परीक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकांचा उपयोग करून त्या प्रश्नपत्रिकेतील कोणतेही तीन प्रश्न विद्यार्थ्यांना दोन तासात सोडवून पूर्ण करायचे आहेत. सर्व परीक्षांसाठी विद्यार्थी प्रवेशित असलेले महाविद्यालयच परीक्षा केंद्र राहणार आहे. अभियांत्रिकी व तांत्रिक अभ्यासक्रम वगळून इतर अभ्यासक्रमातील अंतिम वर्ष/अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांना असलेल्या अनुशेष सत्राच्या परीक्षा विद्यापीठाकडे उन्हाळी परीक्षेसाठी तयार असलेल्या प्रश्नपत्रिका एका सत्राच्या रोज तीन प्रश्नपत्रिका व प्रत्येक प्रश्नपत्रिकेतील कोणतेही दोन प्रश्न सोडून तीन तासात तीन विषयाची परीक्षा पूर्ण करण्यात येईल. तीन विषयाच्या तीन उत्तरपत्रिका सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत, तसेच विद्यार्थी शिकत असलेले महाविद्यालयच परीक्षा केंद्र राहणार आहे. लेखी परीक्षा आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होतील. तसेच १५ सप्टेंबर ते २५ सप्टेंबरदरम्यान प्रात्याक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहेत.
जवळचे परीक्षा केंद्र निवडण्याची संधी
कोरोना संसर्ग वाढत असल्याने अंतिम वर्ष/सत्रांच्या विद्यार्थ्यांना जवळचे महाविद्यालय परीक्षा केंद्र म्हणून निवडण्याची सुविधा देण्यात आली आहे. याविषयी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांकडे विनंती करावी, तसेच परीक्षा सुरू होण्याच्या सात दिवसाआधी याविषयी माहिती विद्यापीठाला द्यावी लागणार आहे. त्यामुळे, कोरोनामुळे परीक्षेसाठी महाविद्यालयात न पोहोचू शकणाऱ्यांना दिलासा मिळाला.

Web Title: Examination and examination of question papers will be done in the college itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.