मनपाच्या सोयीस्कर भूमिकेमुळे ‘ओपन स्पेस’वर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:47 PM2019-02-20T12:47:56+5:302019-02-20T12:48:24+5:30

अकोला: सर्वपक्षीय नगरसेवक तसेच महापालिकेच्या सोयीस्कर भूमिकेमुळे शहरातील ‘ओपन स्पेस’वर अतिक्रमण करण्याचे उद्योग कायम सुरूच असल्याचे चित्र आहे.

Encroachment on 'Open Space' due to MNP's convenient role | मनपाच्या सोयीस्कर भूमिकेमुळे ‘ओपन स्पेस’वर अतिक्रमण

मनपाच्या सोयीस्कर भूमिकेमुळे ‘ओपन स्पेस’वर अतिक्रमण

googlenewsNext

अकोला: सर्वपक्षीय नगरसेवक तसेच महापालिकेच्या सोयीस्कर भूमिकेमुळे शहरातील ‘ओपन स्पेस’वर अतिक्रमण करण्याचे उद्योग कायम सुरूच असल्याचे चित्र आहे. प्रभाग क्रमांक १३ अंतर्गत येणाऱ्या जवाहर नगर येथील खुल्या जागेवर स्थानिकांनी अतिक्रमण केल्यानंतरही या जागेवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आवार भिंतीचे काम सुरू आहे. हा प्रकार पाहता शहरात कोणीही या अन् खुल्या जागेवर अतिक्रमण करा, असे चित्र समोर येत आहे. याप्रकरणी स्थानिक रहिवाशांनी पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात तसेच मनपाकडे तक्रारी केल्यानंतरही कारवाई होत नसल्याने सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शहरातील ले-आउटमध्ये मूळ विकासकांनी एकूण जमिनीच्या क्षेत्रफळापैकी १० टक्के जागा ‘ओपन स्पेस’साठी आरक्षित केल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती नेमकी विपरीत आहे. आरक्षित जागांवर मूळ विकासकांनी तसेच सामाजिक हिताचा आव आणणाºया संस्थांनी व्यवसाय उभारले आहेत. घरालगत खुली जागा असल्यास त्यावर स्थानिक रहिवाशांकडून अतिक्रमण होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. साहजिकच, याप्रकरणी तक्रारकर्ता समोर आल्यास महापालिका प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा सार्वत्रिक अनुभव आहे. असाच काहीसा प्रकार प्रभाग क्रमांक १३ मधील जवाहर नगर येथील खुल्या जागेसंदर्भात होत असल्याचे समोर आले आहे. जवाहर नगरमधील सर्व्हे नं.३९/१, ५१/१ मध्ये तब्बल ५७ हजार ३८० चौरस फूट जागा सार्वजनिक वापराकरिता आरक्षित आहे. त्यावर जिल्हा परिषद शाळेमागे व द्वारका नगरीसमोरील खुल्या जागेवर काही स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. आजरोजी ‘पीडब्ल्यूडी’ विभागाकडून या जागेवर आवारभिंत उभारण्याचे काम सुरू आहे. जागेची मोजणी न करताच आवारभिंतीचे काम केल्या जात असल्याने अतिक्रमकांना पाठीशी घातल्या जात असल्याचा आरोप परिसरातील स्थानिक रहिवाशांकडून होत आहे. याप्रकरणी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी जातीने लक्ष देऊन खुल्या जागेवरील अतिक्रमणाचा तिढा निकाली काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

नगरसेवकांचे हात वर!
खुल्या जागेवरील अतिक्रमण दूर करण्याची मागणी करीत स्थानिक रहिवाशांनी प्रभागातील नगरसेवकांकडे धाव घेतली. त्यावर भाजपाच्या सर्व नगरसेवकांनी हात वर केल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.


स्थानिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष का?
ले-आउटमधील ‘ओपन स्पेस’वर एखादा राजकीय नेता, पदाधिकारी किंवा वजनदार व्यक्तीने ताबा केल्यास त्याच्या विरोधात सहसा कोणी तक्रार करण्यास धजावत नाही. अशा ठिकाणी तक्रार प्राप्त नसल्यामुळे कारवाई करता येत नसल्याची लगंडी सबब मनपा प्रशासनाकडून समोर केली जाते. जवाहर नगरमधील ‘ओपन स्पेस’वर अतिक्रमण होत असल्यासंदर्भात स्थानिक रहिवाशांनी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या जनता दरबारात तसेच मनपाकडे तक्रारी केल्यानंतरही कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

 

Web Title: Encroachment on 'Open Space' due to MNP's convenient role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.