Corona Cases : ॲक्टिव्ह रुग्णांचा 'ग्राफ' ४० च्या खाली उतरेना!

By atul.jaiswal | Published: August 8, 2021 10:47 AM2021-08-08T10:47:01+5:302021-08-08T10:49:36+5:30

Corona Cases in Akola: गत महिनाभरापासून हा आकडा ३ ऑगस्टचा अपवाद वगळता ४० च्या खाली उतरताना दिसत नाही.

Corona Cases: Graph of active patients does not go below 40! | Corona Cases : ॲक्टिव्ह रुग्णांचा 'ग्राफ' ४० च्या खाली उतरेना!

Corona Cases : ॲक्टिव्ह रुग्णांचा 'ग्राफ' ४० च्या खाली उतरेना!

Next
ठळक मुद्दे४५ ते ५० दरम्यान चढ-उतार कोविडमुक्तीसाठी सक्रिय रुग्णसंख्या घटने गरजेचे

- अतुल जयस्वाल

अकोला : जिल्ह्याला बसलेला कोरोनाचा विळखा बरासचा सैल झाला असून, दैनंदिन रुग्णसंख्येतही कमालीची घट झाली आहे. एकेकाळी सहा हजारांवर असलेल्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही दोन अंकांवर आली असली, तरी गत महिनाभरापासून हा आकडा ३ ऑगस्टचा अपवाद वगळता ४० च्या खाली उतरताना दिसत नाही.

जिल्ह्यात गतवर्षी एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात कहरच केला. या दोन्ही लाटांत तब्बल ५७७८३ जणांना कोरोनाची लागण झाली, तर ११३४ जणांचा बळी गेला. यावर्षी मे महिन्यात दुसरी लाट अत्युच्य पातळीवर होती, तेव्हा सक्रिय रुग्णांची संख्या ६८०० पर्यंत गेली होती. जून महिन्याच्या उत्तरार्धात दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात होऊन जुलै महिन्यात रुग्णवाढीचा आलेखा कमालीचा घसरला. १ जुलैला असलेली ३५३ सक्रिय रुग्णांची संख्या पुढच्या १५ दिवसांमध्ये ४०-४५ वर आली. तेव्हापासून दररोज तीन ते पाच नवे रुग्ण आढळून येत आहेत; परंतु त्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या कमी असल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा ४५ ते ५५ यादरम्यान हेलकावे खात आहे.

 

३ ऑगस्टला होते ३८ रुग्ण

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या तीन दिवसांमध्ये जिल्ह्यात केवळ तीन नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर याच कालावधीत १८ जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे ३ ऑगस्ट रोजी प्रथमच ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा ३८ वर आला होता. त्यानंतर मात्र यामध्ये वाढ होत जाऊन शनिवारी हा आकडा ५२ वर आला.

सक्रिय रुग्ण ठरू शकतात स्प्रेडर

दुसरी लाट आता पूर्णपणे ओसरली असली, तरी ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ५० च्या घरात आहे. तिसरी लाट येण्याची शक्यता बघू जाता, ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होणे गरजेचे आहे. सध्या सक्रिय असलेल्या रुग्णांमुळे इतरांना कोरोनाची लागण होऊन रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

गत सात दिवसांतील सक्रिय रुग्णसंख्या

 

दिनांक       रुग्ण

१ ऑगस्ट - ४७

२ ऑगस्ट  - ४५

३ ऑगस्ट - ३८

४ ऑगस्ट - ४४

५ ऑगस्ट - ४७

६ ऑगस्ट - ५२

७ ऑगस्ट - ५२

 

सक्रिय रुग्णांची संख्या पूर्वीच्या तुलनेत कमी झाली असून, या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. लोकांनी कोरोना सुसंगत नियमांचे पालन केले व लसीकरण करून घेतले, तर जिल्हा नक्की कोविडमुक्त होईल.

-डॉ. राजकुमार चव्हाण, उपसंचालक, आरोग्यसेवा, अकोला मंडळ

Web Title: Corona Cases: Graph of active patients does not go below 40!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.