पथदिव्यांची उभारणी व देखभाल करण्यास कंत्राटदारांचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 02:40 PM2019-05-18T14:40:18+5:302019-05-18T14:40:50+5:30

लेखी करारनामा करण्यास ‘मिडास’कडून होणारी टाळाटाळ लक्षात घेता स्थानिक कंत्राटदारांनी काम करण्यास नकार दिल्याची माहिती आहे.

Contractors refuse to build and maintain street lights | पथदिव्यांची उभारणी व देखभाल करण्यास कंत्राटदारांचा नकार

पथदिव्यांची उभारणी व देखभाल करण्यास कंत्राटदारांचा नकार

googlenewsNext

अकोला: महापालिका क्षेत्रात एलईडी पथदिवे उभारण्यासाठी राज्य शासनाने ‘ईईएसएल’ कंपनीची नियुक्ती केली. कंपनीने मनुष्यबळासाठी ‘मिडास’ नामक कंपनीसोबत करार केला. ‘मिडास’ने स्थानिक कंत्राटदारांना हाताशी धरून कोणताही करारनामा न करताच पथदिव्यांच्या उभारणीला सुरुवात केली. पथदिव्यांच्या उभारणीसह त्यांच्या देखभाल दुरुस्तीचे दर अतिशय कमी असण्यासोबतच लेखी करारनामा करण्यास ‘मिडास’कडून होणारी टाळाटाळ लक्षात घेता स्थानिक कंत्राटदारांनी काम करण्यास नकार दिल्याची माहिती आहे. यामुळे २० कोटींची कामे ठप्प पडण्याची चिन्हे दिसताच महापौर विजय अग्रवाल यांनी ‘मिडास’ कंपनीला करारनामा करण्याचे निर्देश दिले आहेत.
एलईडी पथदिव्यांमुळे लख्ख उजेड व वीज बचतीचा दावा केला जात असल्याने शासनाने मनपा क्षेत्रात एलईडीच्या उभारणीसाठी ‘ईईएसएल’ कंपनीची नियुक्ती केली. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोठा गाजावाजा करीत सत्ताधारी भाजपने ६ मार्च रोजी ‘ईईएसएल’सोबत एलईडी पथदिवे लावण्याचा करारनामा केला. शासनाने नियुक्त केलेल्या ‘ईईएसएल’ कंपनीकडे मनुष्यबळ उपलब्ध नाही. ज्या भागात एलईडी पथदिव्यांचा कंत्राट मिळविला जातो, त्याच भागातील स्थानिक कंत्राटदारांना हाताशी धरून पुढील कामकाज करण्याची कंपनीची कार्यपद्धती दिसून येते. या ठिकाणी स्थानिक कंत्राटदारांच्या माध्यमातून मजूर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ‘मिडास’ नामक कंपनीकडे आहे. अर्थात ‘मिडास’ने कंत्राटदारांना परवडणारे दर अदा केल्यासच पथदिव्यांची उभारणी शक्य आहे. या ठिकाणी अत्यल्प दरात पथदिवे लावणे व त्यांची देखभाल दुरुस्ती करणे शक्य नसल्याचे सांगत स्थानिक कंत्राटदारांनी यापूर्वी अनेकदा महापौरांच्या दालनात हा तिढा सोडविण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यावर तोडगा निघू शकला नाही. शिवाय, शहरात उभारण्यात आलेल्या पथदिव्यांचे देयक अदा करण्यास कंपनीकडून चालढकल होत असल्याचे लक्षात येताच कंत्राटदारांनी काम बंद करण्याचा निर्णय घेतला.


करारनामा का नाही?
‘ईईएसएल’च्या माध्यमातून शहरात २३ हजार पथदिवे लावल्या जातील. स्थानिक कंत्राटदारांना हाताशी धरून एवढ्या मोठ्या प्रमाणात पथदिव्यांची उभारणी होत असताना ‘मिडास’ने करारनामा करावा, अशी मागणी कंत्राटदारांनी लावून धरली होती. मार्च महिन्यापासून मिडासने करारनामा का केला नाही, असा प्रश्न कंत्राटदारांनी उपस्थित केला आहे.


अत्यल्प दरात शक्यच नाही!
पथदिवे उभारणे व त्यांची देखभाल करण्यासाठी ‘मिडास’ने ११० रुपयांचे दर निश्चित केले आहेत. ‘ईईएसएल’सोबत झालेला मनपाचा करारनामा लक्षात घेता पुढील सहा वर्षांपर्यंत याच दरात काम करणे शक्यच नसल्याचा सूर कंत्राटदारांमध्ये उमटत आहे.

पथदिव्यांची उभारणी करणे व त्यांची देखभाल करण्यासाठी ‘मिडास’ने दोन करारनामे करून देणे अपेक्षित होते. करारनामा नसल्याने कंपनी देयक अदा करण्यास चालढकल करीत असल्याचे कंत्राटदारांचे म्हणणे होते, तर कंत्राटदारांनी उभारलेल्या पथदिव्यांचे विवरण द्यावे, अशी कंपनीची मागणी होती. या दोन्ही विषयांवर तोडगा काढण्यात आला असून, कंपनीला क रारनामा लिहून देण्याचे निर्देश दिले आहेत.
- विजय अग्रवाल, महापौर.

 

Web Title: Contractors refuse to build and maintain street lights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.