अकोला शहरातील  प्लास्टिक खेळण्याच्या गोडाऊनला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2022 06:04 PM2022-02-02T18:04:04+5:302022-02-02T18:06:43+5:30

Fire in Akola : चार तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविता आले.

A huge fire broke out at a plastic toy godown in Akola city | अकोला शहरातील  प्लास्टिक खेळण्याच्या गोडाऊनला भीषण आग

अकोला शहरातील  प्लास्टिक खेळण्याच्या गोडाऊनला भीषण आग

Next
ठळक मुद्देचार तासांच्या परिश्रमानंतर आग आटोक्यात आगीत १५ ते २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज

अकोला : शहरातील जपान जीन भागात असलेल्या एका प्लास्टिक खेळणी व इतर साहित्याच्या गोडाऊनला भीषण आग लागली. आगीत गोडाऊनमधील १५ ते २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आग लागण्याची घटना बुधवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी चार तासांच्या परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविले.

रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जपान जीन भागात असलेल्या एका प्लास्टिक खेळणीच्या गोडाऊनला बुधवारी सकाळी अचानक आग लागली. क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. आगीसह धुराचे लोळ उठत असल्याने, परिसरातील नागरिकांनी तातडीने ही सूचना महापालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाचे १० ते १२ बंब घटनास्थळावर पोहोचले; परंतु अरुंद रस्ता व गोडाऊन बंद असल्यामुळे आगीवर पाण्याचा मारा कसा करावा, असा प्रश्न निर्माण झाला; परंतु अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी खिडक्यांमधून पाण्याचा मारा करीत, आगीवर नियंत्रण मिळविले. चार तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविता आले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. घटनास्थळी रामदासपेठ पोलीस ठाण्याचे ठाणेदार किशोर शेळके पोलीस ताफ्यासह घटनास्थळी हजर होते.

 

अन्यथा परिसरात पसरली असती आग

जपान जीन भागातील या गोडाऊनलगतच कूलरच्या ताट्या व गवताचे गोडाऊन होते. त्यामुळे मनपा अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी या गोडाऊनमधील ताट्या व गवत बाहेर काढून गोडाऊन रिकामे झाले. अन्यथा गोडाऊनमधील भडकलेली आग लगतच्या गोडाऊनपर्यंत पसरली असती; परंतु मनपा अग्निशमन दल व पोलीस कर्मचाऱ्यांनी समयसूचकता दाखवून गवताचे गोडाऊन रिकामे करून घेतले.

अग्निशमन दलाचा जवान जखमी

अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर चार तासांनी आग आटोक्यात आली. दरम्यान, कर्तव्यावरील अग्निशमन दलाचा जवान गोपाल इंगळे याच्या हातावर प्लास्टिकचे थेंब पडल्यामुळे तो किरकोळ जखमी झाला. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांसह नागरिकांनीही सहकार्य केले.

Web Title: A huge fire broke out at a plastic toy godown in Akola city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.