'आगामी निवडणुकीचे वर्ष म्हणजेच संघर्षाचे वर्ष'; राष्ट्रवादीच्या शिबिरात जयंत पाटील यांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 01:17 PM2024-01-03T13:17:41+5:302024-01-03T13:19:14+5:30

सर्वांचा विचार घेऊन महाराष्ट्रात आपण काम करायचं आहे, ते काम करत असताना आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही पुरोगामी विचारांची ज्योत पेटवत राहायचं आहे, असं जयंत पाटील म्हणाले. 

'The coming election year means the year of struggle'; Jayant Patil's appeal in the NCP camp | 'आगामी निवडणुकीचे वर्ष म्हणजेच संघर्षाचे वर्ष'; राष्ट्रवादीच्या शिबिरात जयंत पाटील यांचं आवाहन

'आगामी निवडणुकीचे वर्ष म्हणजेच संघर्षाचे वर्ष'; राष्ट्रवादीच्या शिबिरात जयंत पाटील यांचं आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे "ज्योत निष्ठेची-लोकशाहीच्या संरक्षणाची" अंतर्गत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन दिवसीय शिबिराला आजपासून सुरुवात झाली आहे. यावेळी जयंत पाटील यांनी भाषण करत कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. 

आगामी काळात आपल्यासमोर संघर्ष उभा राहिलेला आहे, येणाऱ्या निवडणुकीचे वर्ष म्हणजेच संघर्षाचे वर्ष असते. २०२४ हा निवडणुकीचा काळ होणार आहे, या काळात आपण सर्वजण वैचारिक संघर्ष करण्यासाठी ठामपणाने भविष्यकाळात काम करण्याची गरज असल्याचं आवाहन जयंत पाटील यांनी केलं आहे. आपला पक्ष फोडला, मागच्या वेळी जेव्हा या ठिकाणी शिबिर झाले तेव्हा अनेक दिग्गज या ठिकाणी समोर बसले होते. ते निघून गेल्यामुळे त्यावेळी मागच्या कप्प्यात बसलेल्यांना यावेळी पुढच्या कप्प्यात येऊन बसण्याची संधी मिळाली, असंही जयंत पाटील यांनी सांगितले. 

शरद पवारांनी हा पक्ष एका वैचारिक भावनेतून निर्माण केला, पण फार काळ सत्तेत राहिल्यामुळे विचारांकडे दुर्लक्ष झालं आणि सत्यकडे आपले लक्ष जास्त गेले. सत्तेत असताना विचारांवर जोर दिला पाहिजे ही भावना आमच्या मनात कमी प्रमाणात शिवली, त्यामुळे विचार काय आहेत? हा विचार न घेता काही लोक दुसऱ्या विचारांकडे आमच्या पक्षातून गेली. पण आपण सगळे पवार साहेबांना साथ देत ठामपणे आज या ठिकाणी काम करत आहोत. आपले काम इतरांपेक्षा सोपे आहे आपल्याला फार यंत्रणेची गरज नाही. आपण सत्तेत बसणाऱ्यांच्या चुका काय आहेत? देशातील महागाई, बेकारी व ज्या घटना मागच्या काळात घडल्या त्यावर लक्ष केंद्रित करून लोकांना त्याची समज देण्याचे काम आपण जर केलं तर मला वाटतं की सत्ताधाऱ्यांच्या चुका जनतेसमोर मांडल्या तर जनता सुज्ञ आहे. जनता आपला निर्णय घेत असते आपण मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सगळ्यांनी ताकदीने काम केले पाहिजे, असं आवाहन जयंत पाटील यांनी केले. 

आपल्या नेत्यांना त्रास देण्याचे काम झाले-

आपल्या नेत्यांना त्रास देण्याचे काम झाले, अनिल देशमुखसारख्या नेतृत्वाला तुरुंगात जाण्याची वेळ आली. नवाब मलिक यांच्यावर काय प्रसंग आले? हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना या प्रसंगातून जात असताना शरद पवारांची साथ न सोडता आपल्या सगळ्यांनी काम करायचं ठरवलेलं आहे. आम्ही शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार मांडतो. शरद पवारांनी तर उभ्या आयुष्यात हा प्रयत्न केला. हा प्रयत्न करत असताना ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सगळ्यांच्या स्वाभिमानाची ज्योत पेटवली, ज्या महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी ज्ञानाची ज्योत पेटवली, छत्रपती शाहू महाराजांनी समतेची ज्योत पेटवली आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अस्मितेची ज्योत आपल्या मनात पेटवली. या सर्व महापुरुषांचे आदर्श घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेची चौकट आखली. या सर्वांचा विचार घेऊन महाराष्ट्रात आपण काम करायचं आहे, ते काम करत असताना आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही पुरोगामी विचारांची ज्योत पेटवत राहायचं आहे, असं जयंत पाटील म्हणाले. 

डॉ. अमोल कोल्हे डरने की बात नहीं-

आपण सगळ्यांनी या विचारांची आणि मुद्द्यांची नोंद करा. समोरच्या बाजूने जाहिरात प्रचंड असल्यामुळे आपण बोलण्यात कमी पडतोय, व आपण बोललेलं कुठे दाखवले जात नाही. आपला समज असतो की कोणी ऐकत नाही पण लोक सर्व ऐकत असतात. आपण ज्या विचारासाठी काम करतोय त्याला महत्व देण्याचं काम आपण केलं पाहिजे. हा विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याची जवाबदारी घेऊन आपण या दोन दिवसात या ठिकाणाहून जाऊ, याची मला खात्री आहे. निवडणुका जवळ येत असताना आपण घराघरात राष्ट्रवादी हा प्रयत्न सुरू केला, कार्यकर्त्यांनी हा विचार प्रामाणिकपणे घराघरापर्यंत पोहोचवला. शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा आपण काढला, डॉ. अमोल कोल्हे यांनी पुणे जिल्ह्यात प्रचंड मोठा दौरा केला व त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यांना पाडण्याचा विडा आता काहीजण उचलायला लागलेले आहेत, जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि आई भवानीचा आशीर्वाद आपल्या मागे आहे तोपर्यंत डॉ. अमोल कोल्हे डरने की बात नहीं. हा संपूर्ण पक्ष पूर्ण ताकदीने तुमच्या मागे उभा राहील, असा विश्वास यावेळी जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

Web Title: 'The coming election year means the year of struggle'; Jayant Patil's appeal in the NCP camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.