शूरा आम्ही वंदिले : देश हिफाजत को माना अपना धर्म, प्रदीप भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 02:07 PM2018-08-22T14:07:56+5:302018-08-22T14:10:55+5:30

मातृभूमिच्या रक्षणासाठी असंख्य जवानांनी खडतर परिस्थितीत मृत्यूलाही आव्हान देऊन रणांगणात पाय घट्ट रोवले़ अखेरच्या श्वासापर्यंत लढत असीम धैर्य आणि शौर्याचा प्रत्यय दिला़ जान जाये पर शान न जाये म्हणत हौतात्म्य स्वीकारले़

Shoora We Vandili: Your religion, Pradeep Bhosale, regards the country's protecting country | शूरा आम्ही वंदिले : देश हिफाजत को माना अपना धर्म, प्रदीप भोसले

शूरा आम्ही वंदिले : देश हिफाजत को माना अपना धर्म, प्रदीप भोसले

Next
ठळक मुद्देशिपाई प्रदीप भोसलेजन्मतारीख १ मे १९७५सैन्यभरती २१ एप्रिल १९९५वीरगती १९ जानेवारी

मातृभूमिच्या रक्षणासाठी असंख्य जवानांनी खडतर परिस्थितीत मृत्यूलाही आव्हान देऊन रणांगणात पाय घट्ट रोवले़ अखेरच्या श्वासापर्यंत लढत असीम धैर्य आणि शौर्याचा प्रत्यय दिला़ जान जाये पर शान न जाये म्हणत हौतात्म्य स्वीकारले़
राशीन परिसरात सुसंस्कृत म्हणून ओळख असलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबात १ मे १९७५ रोजी प्रदीप भोसले यांचा जन्म झाला. वडील शंकरराव हे बहुजन शिक्षण संस्थेमध्ये वसतिगृह अधीक्षक म्हणून कार्यरत होते तर आई कमलबाई या गृहिणीची जबाबदारी पार पाडत मुलांवर चांगले संस्कार करण्यात रममाण झालेल्या़ प्रदीप भोसले यांना तीन भाऊ आणि चार बहिणी़ त्यांच्यासमवेत खेळण्यात, बागडण्यात आणि आई-वडिलांकडे हट्ट करण्यात प्रदीप यांचे बालपण गेले. प्रदीप यांचे गावातीलच मराठी शाळेत प्राथमिक शिक्षण झाले़ रयतच्या श्री जगदंबा विद्यालयात माध्यमिक शिक्षण झाले़ प्रदीप यांनी शालेय जीवनातच भारतीय सैन्यदलात सेवा करण्याचा निश्चय केला होता.
माध्यमिक शिक्षण पूर्ण होताच प्रदीप यांनी लष्करात भरती होण्यासाठी रात्रंदिवस अथक परिश्रम करण्यास सुरुवात केली. अखेर २१ एप्रिल १९९५ रोजी त्यांची भारतीय लष्करात मध्यप्रदेशातील सागर येथे महार रेजिमेंटमध्ये प्रशिक्षणासाठी निवड झाली़ सर्वांना आनंदाचा सुखद धक्काच बसला. सागर येथील नऊ महिन्यांच्या यशस्वी प्रशिक्षणानंतर प्रदीपची पुढील प्रशिक्षणासाठी पाकिस्तान सीमेलगत असणाऱ्या पंजाबच्या भटिंडा जिल्ह्यातील अबोहर येथे राष्ट्रीय रायफल्समध्ये नियुक्ती करण्यात आली. या ठिकाणी प्रदीपने फायरिंग नेमबाजीमध्ये विशेष नैपुण्य प्राप्त केले. त्यानंतर उत्तरप्रदेश, हरियाणा येथील कार्यकाळात प्रदीप यांनी विविध मोहिमांमध्ये चोख कामगिरी बजावली. सन १९९८ मध्ये प्रदीप यांची पोस्टींग भारताचे नंदनवन असणाºया परंतु पाकिस्तानी आतंकवाद्यांच्या घुसखोरीचे ग्रहण लागलेल्या जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे झाली.
एकदा ते अनंतनाग येथील छावणीवर पहारा देत होते़ बंकरच्या बाहेर येऊन दुर्बिणीद्वारे ते अतिरेक्यांवर निगराणी ठेवीत होते़ विरुद्ध बाजूने काही कळायच्या आतच वायुच्या वेगाने एक गोळी आली आणि दुर्बिणीला लागून त्यांच्या डाव्या खांद्याला घासून गेली़ क्षणार्धात मृत्यूच भेटून गेल्याची जाणीव त्यांना झाली. गावी सुट्टीवर आले की ते युद्धभूमिवरचा थरार मित्रांना सांगताना या गोळीची खूण दाखवीत़
दुसरा प्रसंगही असाच अंगावर शहारे आणणारा... काश्मीरमधील एका गावाला अतिरेक्यांनी वेढा घालून स्थानिकांना वेठीस धरल्याची माहिती भारतीय सैनिकांना समजली़ त्यावेळी प्रदीप भोसले यांची तुकडी त्याच भागात गस्त घालत होती़ या तुकडीवर अतिरेक्यांचा शोध घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली़ जवानांनी घरांची झडती घेण्याची मोहीम हाती घेतली़ रात्रीच्या वेळी अंधार गोठवणाºया थंडीत घराघरातून झडती सुरु होती़ रात्री अगदी पायाचाही आवाज न करता जवानांना जीव धोक्यात घालून ही झडती मोहीम राबवावी लागत होती़ या तुकडीतील प्रदीप यांच्या शेजारी असलेल्या एका जवानाने माचिस शिलगावली़ त्या माचिसच्या उजेडामुळे अतिरेक्यांनी त्याच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला आणि क्षणार्धात तो जवान भारतमातेला प्यारा झाला़ एक गोळी त्या जवानाच्या तोडांतून आरपार झाली होती़ भारतीय जवान पेटून उठले आणि समोरच्या अतिरेक्यांचा काही क्षणात खात्मा केला, असे अनेक थरार ते सुट्टीवर आले की मित्रांना ऐकवत होते़
१९९९ मध्ये जम्मू काश्मीरच्या कारगील जिल्ह्यात पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनी नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. त्यामुळे १९९९ मध्ये कारगील युद्ध सुरु झाले़ या युद्धात पाकिस्तानी सैन्याला भारतीय जवानांनी धूळ चारली़ मात्र, त्यानंतरही अनेक घुसखोर अनंतनाग, पुलवामा जिल्ह्यातील जंगलांचा आश्रय घेऊन लपून बसले होते़ या घुसखोरीचा बिमोड करण्यासाठी भारतीय जवानांनी ‘आॅपरेशन मेघदूत’ ही मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेचाच एक भाग म्हणजे अनंतनाग व पुलवामा जिल्ह्यांच्या सरहद्दीवरही जवान रात्रंदिवस खडा पहारा देत होते़ घुसखोरांचा शोध घेत होते़ संपूर्ण देशाचे या घटनेकडे लक्ष लागले होते.
राष्टÑीय रायफल्स युनिटचे मेजर भालचंद्र यांच्या नेतृत्वाखाली महार बटालियन ‘आॅपरेशन मेघदूत’ मध्ये सहभागी झाली होती़ या बटालियनमधील प्रदीप भोसले यांच्या दहा जणांच्या एका तुकडीवर अनंतनाग येथील भारत-पाक सरहद्दीवरील एका गावात घुसलेल्या अतिरेक्यांचा खात्मा करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली़ ही मोहीम फत्ते करण्यासाठी तुकडीतील सर्वजण रात्रंदिवस परिस्थितीशी निकराची झुंज देत सरहद्दीवरील परिसर पिंजून काढीत होते.
एका डोंगराच्या कपारीतील आणि घनदाट झाडींनी वेढलेल्या एका वस्तीत या घुसखोरांनी स्थानिक रहिवाशांना धमकावत लहान मुले, महिला आणि वृद्धांना बंदिवान बनविले होते़ एका घरात तेथील स्थानिकांना बंदिस्त केल्याची तसेच तेथेच घुसखोरांनी आश्रय घेतल्याची गुप्त माहिती भोसले यांच्या बटालियनला मिळाली़ सर्व दहा जवानांनी या घराला वेढा घालून घराच्या दिशेने रायफल्स रोखल्या गेल्या. यात प्रदीप अग्रेसर होता. सर्वजण श्वास रोखून घरावर हल्ला करणार होते, तितक्यात पंधरा वर्ष वयाच्या एका मुलीने घराचा दरवाजा उघडला़ सैनिक एकदम जवळ पोहोचले होते़ तिने सैनिकांना ओळखले आणि ओरडली, ‘फौजी आये ऽऽ फौजी आये ऽऽ’
तिचे हे ओरडणे सैनिकांना गोंधळात टाकणारे तर अतिरेक्यांना सावध करणारे ठरले़ अतिरेक्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार सुरु केला़ प्रदीप यांनी जमिनीवर सरपटत जाऊन घरात प्रवेश केला आणि जिवाची पर्वा न करता धाडसाने अतिरेक्यांवर गोळीबार केला़ यात दोन अतिरेक्यांचा जागीच खात्मा झाला. परंतु अतिरेक्यांनीही प्रदीप यांच्यावर बेधुंद गोळीबार केला़ यात प्रदीप गंभीर जखमी झाले. इतर सैनिकही वेगवेगळ्या मार्गाने घरात घुसले आणि अतिरेक्यांवर फैरींचा वर्षाव करीत नेस्तनाबूत केले.
प्रदीप यांचा मंदावत चाललेला श्वास अखेरच्या क्षणांची जाणीव करून देत होता. जवानांनी तातडीने प्रदीप यांना उपचारासाठी युनिटमध्ये दाखल केले़ परंतु तोपर्यंत प्रदीप यांची प्राणज्योत मालवली होती़ तो दिवस होता १९ जानेवारी २०००़
साधारण दोन दिवसांनंतर प्रदीप शहीद झाल्याची वार्ता राशिनमध्ये आली़ संपूर्ण गावावर शोककळा पसरली. प्रदीप यांचे संपूर्ण कुटुंबच या घटनेने कोलमडून पडले. त्याच्या मित्रांना अश्रूंचे बांध रोखणे अनावर झाले. संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला़
२२ जानेवारी रोजी प्रदीप यांचे पार्थिव इंडियन एअरलाइन्सद्वारे श्रीनगरहून दिल्लीमार्गे पुण्यात आणले गेले़ पुण्यात त्यांना मानवंदना देऊन तेथून लष्कराच्या विशेष वाहनातून राशीन येथे आणण्यात आले. प्रदीप यांचा तिरंग्यात लपेटलेला देह पाहताच त्यांच्या आईने पुत्रवियोगाने हंबरडा फोडला़ ते पाहून उपस्थित सर्वांच्याच डोळ्यांच्या कडा पाणावल्या़
२३ जानेवारी रोजी सकाळी लष्कराचे जवान, अधिकारी यांच्या उपस्थितीत अंत्ययात्रा निघाली़ भारत माता की जयऽऽ, प्रदीप भोसले अमर रहेऽऽ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर भारावून गेला़ लष्कराच्या वतीने बंदुकीच्या फैरी आसमंतात झाडून प्रदीप यांना अखेरची मानवंदना देण्यात आली. घुसखोरांविरोधात केलेल्या जिगरबाज कामगिरीमुळे मरणोत्तर त्यांना सेना पदकाने गौरविण्यात आले़
‘‘अपना घर छोडकर, सरहद को अपना ठिकाना बना लिया,
जान हथेली पर रखकर, देश की हिफाजत को अपना धर्म बना लिया ।’’

हीच वेळ आहे देशसेवेची
जम्मू काश्मीरमधील अनंतनाग, पुलवामा जिल्ह्यात घुसखोरांनी धुमाकूळ घातला होता़ त्यावेळी प्रदीप भोसले सुट्टीवर आले होते़ त्यांची युद्धभूमिवर निघण्याची तयारी सुरु होती़ मित्र त्यांना थांबण्याचा आग्रह करीत होते़ त्यावेळी प्रदीप म्हणाले, ‘‘मित्रा, हीच तर खरी वेळ आहे स्वत:ला सिद्ध करण्याची़ माझे साथीदार तेथे शत्रूसोबत लढत आहेत आणि मी येथे कसा काय आनंदात राहू? मला जायलाच हवे.’’ असा देशाप्रति समर्पित भाव ठेवून प्रदीप यांनी अखेरच्या श्वासापर्यंत देशरक्षणासाठी प्राण तळहाती घेऊन लढा दिला़

प्रदीप नोव्हेंबर १९९९ मध्ये सुट्टीसाठी राशिनला आले होते. घरात प्रदीप यांच्या लग्नाची तयारी सुरु होती. पण प्रदीप यांनी सध्या देशाच्या सीमेवर सुरु असलेल्या युद्धाकडे कुटुंबीयांचे लक्ष वेधत कोणत्याही क्षणी जावे लागेल़ सध्या माझे लग्न महत्त्वाचे नसून देशावरचे संकट निवारणे महत्वाचे आहे़ मी माझ्या आॅर्डरची वाट पाहतोय, असे सांगत लग्नाचा विचार पुढे ढकलण्याची विनंती केली़ या बाणेदार आणि देशप्रेमी उत्तराने प्रदीप यांचे वडील नि:शब्द झाले. अखेर तो दिवस आला़ प्रदीप यांना तातडीची तार आली़ प्रदीप यांनी आई, वडील, आप्तेष्ट, मित्र या सर्वांचा निरोप घेतला आणि युद्धभूमिकडे प्रयाण केले़ डिसेंबर १९९९ मध्ये राशिनहून प्रदीप यांनी काश्मीरच्या दिशेने उड्डाण घेतले होते़ त्यांची ती शेवटची भेट ठरली.



 

 

Web Title: Shoora We Vandili: Your religion, Pradeep Bhosale, regards the country's protecting country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.