भंडारदरा धरणाचे आवर्तन नदीपात्रातच जिरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 12:06 PM2019-05-08T12:06:40+5:302019-05-08T12:06:43+5:30

भंडारदरा धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी सोडलेले आवर्तन तब्बल ९० तासानंतर श्रीरामपुरात दाखल झाले आहे. प्रवरा नदीपात्रात ओझरपर्यंत असणाऱ्या वाळूच्या बंधाऱ्यांमुळेच पाणी पोहोचण्यास उशीर झाल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे.

Recurrence of the Bhandardara dam took place in the river bed | भंडारदरा धरणाचे आवर्तन नदीपात्रातच जिरले

भंडारदरा धरणाचे आवर्तन नदीपात्रातच जिरले

googlenewsNext

श्रीरामपूर : भंडारदरा धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी सोडलेले आवर्तन तब्बल ९० तासानंतर श्रीरामपुरात दाखल झाले आहे. प्रवरा नदीपात्रात ओझरपर्यंत असणाऱ्या वाळूच्या बंधाऱ्यांमुळेच पाणी पोहोचण्यास उशीर झाल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे. पुढील काळात पाण्यावरून मोठा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
पिण्याच्या पाण्याकरिता धरणातून ३ मे रोजी दुपारी ३ वाजता आवर्तन सोडण्यात आले. ओझरपर्यंत नदीपात्र हाच कालवा असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर पाणी उचलले जाते. त्याचा श्रीरामपूर व नेवासे तालुक्याला जबर फटका बसला आहे.
श्रीरामपूर शहरात मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजता पाणी दाखल झाले. त्यासाठी तब्बल ९० तास खर्च झाले. साधारणपणे ७० ते ७५ तासांमध्ये हे पाणी पोहोचणे अपेक्षित होते. उन्हाची तीव्रता व नदीपात्र कोरडे असल्याने जास्तीचा वेळ जमेस धरूनही हा कालावधी फार मोठा आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सुरेश ताके यांनी दिली. निळवंडे धरणाच्या निर्मितीपूर्वी भंडारदरा ते ओझर हे अंतर अधिक होते. त्यात आता घट होऊनही पाणी मुरते याकडे ताके यांनी लक्ष वेधले आहे.
दरम्यान, भंडारदरा व निळवंडे धरणात दोन हजार ७०० दशलक्ष घनफूट पाणी साठा शिल्लक आहे. या आवर्तनातून ७५० एमसीएफटी पाणी खर्च होणार आहे. एक हजार ६०० क्यूसेकने पाणी सोडण्यात आले आहे. त्यातून श्रीरामपूर नगरपालिका तसेच पाटबंधारे विभागाकडे आरक्षित असणाºया पाणी योजनांना पुरवठा केला जाणार आहे. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी गावतळी भरून देण्याची मागणी केली आहे.
या सर्व बाबी विचारात घेता पाटबंधारेकडून विशेष सतर्कता बाळगली जात आहे. प्रवरा नदीपात्राच्या परिसरात फिरते पथक तैैनात करण्यात आले आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व पाटबंधारेच्या कर्मचाºयांचा त्यात समावेश आहे. असे असले तरी त्यात फारसे यश मिळत नसल्याचेच दिसून येत आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव, उंदिरगाव, माळेवाडी, मुठेवाडगाव, माळवाडगावसह काही गावांना मागील शेतीच्या आवर्तनात पाणी मिळाले नव्हते. या गावांमध्ये भीषण टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे चालू आवर्तनातून प्राधान्याने या भागाला कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले आहे. त्यातून गावतळी भरली जातील, अशी माहिती पाटबंधारेकडून देण्यात आली.
पाटपाण्याचे नियोजन कोलमडल्याने भविष्यात श्रीरामपूरचा अकोले, संगमनेर व राहाता तालुक्यांशी पाणी संघर्ष होण्याची भीती व्यक्त होत आहे. शेतकरी संघटना तसेच माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी अनेकदा हा विषय जाहिररीत्या छेडला आहे.

प्रवरेचे नदीपात्र कोरडे असून उन्हाळ्यामुळे काही प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. मात्र नदीकाठच्या भागात २० तास शेतीपंपांचा वीज पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. फिरते भरारी पथकही नेमले आहे. त्यामुळे चोरी होण्याचा प्रश्नच नाही. -किरण देशमुख, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग.

नदीपात्रामध्ये वाळूचे बंधारे बांधले जातात. अनेक ठिकाणी खड्डे घेऊन पाणी अडविले जाते. आपण ही बाब जिल्हाधिकाºयांच्या निदर्शनास आणून देणार आहे. -सुरेश ताके, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

Web Title: Recurrence of the Bhandardara dam took place in the river bed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.