राठोडांना झोपता, उठता, बसता राष्ट्रवादीच दिसते : आमदार संग्राम जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 07:06 PM2019-01-11T19:06:26+5:302019-01-11T19:09:09+5:30

शिवसेनेने महापौर करण्यासाठी आमच्या वरिष्ठांशी सातत्याने संपर्क केला होता. संपर्क केल्याची कबुली शिवसेनेच्या काही नेत्यांनी दिली.

Rathoda sleeps, gets up, resides and looks like NCP: Sangram Jagtap | राठोडांना झोपता, उठता, बसता राष्ट्रवादीच दिसते : आमदार संग्राम जगताप

राठोडांना झोपता, उठता, बसता राष्ट्रवादीच दिसते : आमदार संग्राम जगताप

googlenewsNext

अहमदनगर : शिवसेनेने महापौर करण्यासाठी आमच्या वरिष्ठांशी सातत्याने संपर्क केला होता. संपर्क केल्याची कबुली शिवसेनेच्या काही नेत्यांनी दिली. अचानक झालेल्या निर्णयामुळे आम्ही भाजपाला पाठिंबा देण्याचे ठरले. त्यामुळे जास्त जागा मिळवूनही शिवसेनेचे महापौरपद गेले. त्यामुळे उपनेते अनिल राठोड अस्वस्थ झाले आहे, त्यांना झोपता, उठता, बसता राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप समोर दिसत आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी पत्रकार परिषदेत केली.
आमदार जगताप म्हणाले,आम्ही भाजपला पाठिंबा का दिला आहे. मी, नगरसेवकांनी मिळून नगरच्या विकासासाठी हा निर्ण़य घेतला आहे. पक्ष आमच्यावर कारवाई करेल, नाही करेल. मी आमदारकीचा राजीनामा द्यायचा की नाही. हे आमचे आम्ही ठरवू. आम्हाला शहाणपणा शिवसेनेने शिकवू नये. उपनेते दाखला किंवा आयएसओ प्रमाणपत्र देण्यासाठी कोण लागून गेले. आमच्या पक्षामधील ही बाब आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या पक्षातील बाबीत लक्ष घालू नका. तुम्ही शिंगावर घेण्याची भाषा करत आहात. २५ वर्ष आमदार राहिल्यानंतर तुम्हाला काही न करता आल्याने गेल्या निवडणुकीत लोकांनीच तुम्हाला शिंगावर घेतले आहे. पुन्हा घोडेमैदान जवळ आले आहे. त्यासाठी तयार राहा, असेही जगताप म्हणाले.
शहरात शिवसेनेची पिछेहाट झाल्याने त्यांनी फक्त राष्ट्रवादीला टारगेट करण्याचा धंदा सुरु केला आहे. आपल्या स्वत:च्या पक्षात काय चालले आहे हे राठोेडांनी पाहावे. कोणता शिवसैनिक मोठा केला हेही सांगावे. अनेक लोकांचे संसार उद्धवस्त करण्याचे काम शिवसेनेने केले आहे. शहरातील उद्योगाची हानी शिवसेनेमुळे झाली. ११ महिन्यांतच तुमचे मंत्रीपद बाळासाहेब ठाकरे यांनी का काढून घेतले. हे लोकांना माहित आहे. तसेच उपनेते असून देखील जिल्ह्यात व शहरात शिवसेना वाढविण्यासाठी त्यांनी काय योगदान दिले. हे सांगावे. त्यामुळे त्यांनी मला तरी पक्षनिष्ठा शिकवू नये, असे संग्राम जगताप म्हणाले. शिवसेना आज सत्तेत आहे.
त्यांच्याकडे उद्योग व परिवहन खाते आहे. मात्र, राठोड हे नगरच्या तरुणांना उद्योगधंदा मिळावा यासाठी मंत्र्यांना निमंत्रित करणार नाही, किंवा शहराची बस व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करणार नाही. पण एखाद्या गुन्हाला राजकीय वळण देण्यासाठी सगळ्यांची मदत घेतली असा आरोप देखील जगताप यांनी केला.
आम्ही पैशासाठी पाठिंबा दिला अशी नवी अफवा सुरू आहे. पूर्वी केडगाव हत्याकांडातून बाहेर पडण्यासाठी पाठिंबा दिला आहे, असेही आरोप करण्यात आले. महापौरपद गेल्याने राठोड बावचळले आहेत. नेमका काय आरोप करावा हेही त्यांना कळत नाही. याउलट शिवसेनेनेचा आम्हाला पाठिंबा देण्यासाठी मागणी केली होती. मात्र, तो प्रस्ताव आम्ही नाकारला. त्यामुळे सत्ता गेली. म्हणून त्यांना झोपेत, उठता,बसता, रात्रंदिवस राष्ट्रवादीच दिसत आहे, असेही जगताप म्हणाले.

भाजपात जाणार नाही
भाजपाला पाठिंबा दिल्याने पक्ष करेल त्या कारवाईला आम्ही सामोरे जाणार आहोत. मात्र मी अथवा नगरसेवक कोणीही भाजपात जाणार नाही. भाजपात जायचे असते तर राष्ट्रवादी पक्ष शहरात वाढवलाच नसता. त्यामुळे इतर पक्षात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही पक्षाबरोबर आहोत आणि पुढेही राहणार आहोत, असेही जगताप म्हणाले.

केडगाव घटनेची सखोल चौकशी व्हावी
केडगावमध्ये दोघांची हत्या झाल्यानंतर योग्यवेळी उपचार मिळणे गरजेचे होते. मात्र शिवसेनेने जाणीवपूर्वक त्यांच्यापर्यंत अ‍ॅम्ब्युलन्स पोहचवू दिली नाही. केवळ राजकीय फायद्यासाठी दोन जीव घेतले गेले. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. यात कोण दोषी आहे. हे स्पष्ट होईल. असा आरोप जगताप यांनी शिवसेनेचे नाव न घेता केला आहे.

प्रसंगी भाजपचा पाठिंबा काढून घेऊ
नगर शहराच्या विकासासाठी भाजपला पाठिंबा दिला आहे. माझ्या करीअरपेक्षा शहराच्या विकासाला नेहमी प्राधान्य दिले आहे. महापौरपदाचे आमचे गणित जुळत नव्हते. शिवसेनेने आमदारकी उपभोगली, महापौरपद भोगले मात्र, शहराचा विकास त्यांनी केला नाही. पोकळ गप्पा मारल्या. त्यामुळे भाजपाला पाठिंबा दिला. भाजप चुकीचे काम करत असेल तर नक्कीच त्यांचाही पाठिंबा काढून घेऊ असे जगताप म्हणाले.

Web Title: Rathoda sleeps, gets up, resides and looks like NCP: Sangram Jagtap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.