श्रीरामपूर : सत्ता आणि पैशाच्या बळावर राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांना प्रवरेच्या सर्व संस्था बळकवायच्या आहेत. पद्मभूषण बाळासाहेब विखे यांनी या संस्थांचा राजकारणासाठी वापर होऊ नये, यासाठी मला कार्याध्यक्षपदी नेमले. जनता व न्यायाच्या तत्त्वासाठी माझी लढाई यापुढेही सुरूच राहील, असा इशारा अशोक विखे यांनी दिला.
मुळा प्रवरा वीज संस्थेच्या कामकाजावरून विखे यांच्यासह माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी राधाकृष्ण विखे यांना लक्ष्य केले आहे. या संस्थेचे माजी अध्यक्ष अण्णासाहेब म्हस्के यांनी गैरव्यवहारांचे आरोप नुकतेच फेटाळले होते. त्याला उत्तर देण्यसाठी आज अशोक विखे, तसेच भानुदास मुरकुटे यांनी पत्रकार परिषद घेतली.
विखे म्हणाले, वडिलांच्या इच्छेखातर मी प्रवरा एज्युकेशन ट्रस्टचे कार्याध्यपद स्वीकारले. या संस्थांचा राजकीय वापर होण्याची भीती त्यांना वाटत होती. राधाकृष्ण विखे, शालिनी विखे तसेच डॉ. सुजय हे सर्व संस्था वैयक्तिक मालकीच्या असल्याप्रमाणे कारभार करतात. सत्ता आणि पैशाच्या बळावर ते हे सर्व क रू पाहत आहेत. मी माझ्या कार्यकाळात प्रवरा परिसरातील गोरगरीब विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. आता मात्र बाराशे विद्यार्थी संस्थेतून कमी झाले आहेत. वसतिगृह खाली झाले असून प्रवरा अभियांत्रिकीमध्ये केवळ पन्नास टक्के प्रवेश होऊ शकले. गेल्या क ाही महिन्यांपासून कामगारांचे पगारदेखील थकले आहेत. आजवर असे कधीही घडले नव्हते.