पावसाची जिल्ह्यात दमदार हजेरी

By admin | Published: August 26, 2014 11:20 PM2014-08-26T23:20:30+5:302014-08-26T23:22:42+5:30

अहमदनगर: जिल्ह्यात सोमवारी सायंकाळपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. प्रथमच जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला

Poor presence in rainy district | पावसाची जिल्ह्यात दमदार हजेरी

पावसाची जिल्ह्यात दमदार हजेरी

Next

अहमदनगर: जिल्ह्यात सोमवारी सायंकाळपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. प्रथमच जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला असून, संगमनेरमध्ये सर्वाधिक १४६ मि़मी़ पावसाची नोंद झाली़ पारनेर वगळता सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे़ दरम्यान संगमनेर शहरात मध्यरात्री पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊन ३०० कुटुंबीयांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले़ मंगळवारी दिवभरात पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावली.
गेल्या अडीच महिन्यांपासून नगर जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरविली होती़ सर्वत्र पाऊस होता असताना नगर जिल्हा कोरडाच होता़ अडीच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर प्रथमच जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला़ बैल पोळ्याला सर्वत्र मुसळधार पाऊस झाला़ सुमारे अडीच तास धुव्वाँधार पाऊस सुरू होता़ रात्री उशिराने आकाशात काळे ढग दाटून आले आणि विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली़ रात्री उशिराने संगमनेर शहरासह श्रीरामपूर, कोपरगाव, राहाता, नेवासे, नगर, शेवगाव, पाथर्डी, कर्जत, श्रीगोंदा आणि जामखेड परिसरात पाऊस पडला़ सर्वाधिक १४६ मि़मी़ पाऊस संगमनेरमध्ये झाला़या पावसाने संगमनेर शहरातील नागरिकांच्या घरात पाणी घुसले़ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून रात्री उशिराने मदत कार्य सुरू करण्यात आले़ मध्यरात्रीपर्यंत संगमनेर शहरातील ३०० कुटुंबीयांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले़ त्यापाठोपाठ श्रीरामपूर शहर परिसरात सरासरी १०६ मि़मी़ पावसाची नोंद झाली़ सुदैवाने श्रीरामपूर शहरात आपत्ती ओढावली नाही़ राहाता तालुक्यात यापूर्वी पाऊस झाला नव्हता़ या ठिकाणीदेखील ५९ मि़ मी़ पाऊस झाला़ राहुरी तालुक्यात प्रथमच ३७़ ४ मि़ मी़ पाऊस झाला़ उत्तर नगर जिल्ह्यात प्रथमच असा मोठा पाऊस झाला आहे़
नगर तालुक्यात गेल्या अडीच वर्षांपासून पाऊस नव्हता़ या परिसरातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा सोमवारच्या पावसाने संपुष्टात आली़ नगर तालुक्यात ४६ मि़मी़ पावसाची नोंद झाली़आतापर्यंतचा हा पहिलाच पाऊस असून, रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत़ नेवासा तालुक्यात आतापर्यत मोठा पाऊस झाला नव्हता़ त्यामुळे खरिपाची पिके करपू लागली होती़ या परिसरात जोरदार पाऊस झाला असून, नेवासे तालुक्यात २५ मि़ मी़ पावसाची नोंद झाली आहे़ शेवगाव तालुक्यात २८ मि़ मी़ पाऊस झाला आहे़ तर पाथर्डीमध्ये ३७ मि़मी़ पाऊस झाल्याची नोंद झाली आहे़ दुसऱ्या दिवशी मंगळवारीही नगर शहारासह जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस झाला आहे़ (प्रतिनिधी)
सर्वाधिक पाऊस
जिल्ह्यातील बहुतांश गावांत सरासरी १०० हून अधिक मि़ मी़ पावसाची नोंद झाली असून, संगमनेर, नेवासा आणि शेवगाव तालुक्यातील गावांचा यात समावेश आहे़
नेवासा- घोडेगाव-११७ मि़मी़, चांदा- १३२ मि़ मी़
शेवगाव- बोधेगाव- १०३ मि़ मी़
संगमनेर-शिबलापूर- १०० मि़ मी़, समनापूर- १५० मि़ मी़
कुठे किती पाऊस (मि़ मी़)
अकोले- ११, संगमनेर- १४६, कोपरगाव- ३७,श्रीरामपूर- १०६, राहुरी- ३७़ ४, नेवासा- २५, राहाता- ५९, नगर- ४६,पाथर्डी- ३७,कर्जत-१५, श्रीगोंदा- १३, जामखेड-६, पारनेर- निरंक
जिल्हाधिकाऱ्यांचे सतर्कतेचे आदेश
संगमनेर शहरात झालेल्या पावसाने नागरिकांच्या घरात पाणी घुसले होते़ येथील ३०० कुटुंबीयांना रात्री उशिराने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले़ याविषयी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्याशी संपर्क साधला असता जिल्ह्यात पावसाचे जोरदार आगमन झाले असल्याचे सांगून कवडे म्हणाले, आपत्ती व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली आहे़ संगमनेर येथे नागरिकांच्या घरात पाणी घुसले होते, त्याठिकाणी अर्धातास मदतकार्य सुरू करण्यात आले़ यासाठी स्थानिक पोलीस, आरोग्य विभाग आणि महसूल कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली़ अर्ध्यातासात घटनास्थळी यंत्रणा मदतीसाठी दाखल होईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे़ तसेच कोणत्या शहरात काय परिस्थिती आहे, याचा आढावा घेऊन काय उपाय योजना कराव्या लागतील, याचे नियोजन करण्यात आले आहे़ वेळोवेळी झालेल्या बैठकीत संबंधितांना याविषयी सूचना केल्या असून, आपत्तीसाठीची यंत्रणा सज्ज आहे़ नागरिकांनी पावसाळ्यात आपत्ती ओढावल्यास जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, तातडीने यंत्रणा पाठविली जाईल, असे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी याविषयी माहिती देताना सांगितले़
कर्जतला वादळी पाऊस, झाडे उन्मळली, पत्रे उडाले
तालुक्यातील बर्गेवाडी, गायळावाडी, वडगाव तनपुरा कर्जत परिसरात वादळी वाऱ्याने हाहाकार माजवला. पोल पडले, झाडे उन्मळली. घरावरचे पत्रे उडाले. या प्रकाराने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागातील झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार जयसिंग भैसडे यांनी दिले आहेत. कर्जत येथील शेतकरी अफसार चांद पठाण यांच्या शेतातील घराचे पत्रे उडाले, आंब्याची झाडे पडली, पोल पडला.
भेंडा परिसरात ५५ मिमी पाऊस
नेवासा तालुक्याचे पूर्व भागात भेंडा, कुकाजा, सफाबतपूर ... गावांसह परिसरात सोमवारी रात्री विजेच्या कडकडाटासह मघा बरसल्या. या पावसाची नोंद भेंडा येथील पर्जन्यमापकावर ५५ मिमी. इतकी नोंद झाली आहे. पावसाळा सुरु होऊन तीन महिन्याचा कालावधी संपत आला. यात फक्त सोमवारी रात्री झालेला पाऊस दमदार होता.
धरणांतील पाणीसाठा
(दलघफू)
मुळा- २०,०११
भंडारदरा- १०,९३५
निळवंडे- ६,१४९
आढळा- ८२०
... तर मुळा धरणाचे कालवे बंद होणार
मुळा धरणाच्या लाभक्षेत्रावर गेल्या दोन दिवसांत पावसाने हजेरी लावल्याने पिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. पाटबंधारे खाते पावसाचा आढावा घेत असून शेतकऱ्यांकडून मागणी झाल्यास मुळा धरणाच्या दोन्ही कालव्यांतून सोडलेले आवर्तन बंद करण्याची किंवा ते काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. २६ हजार दलघफू पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात मंगळवारी रात्री २०१०० दलघफू पाणी साठ्याची नोंद झाली़ कोतूळ येथे ६ मिलीमीटर, तर मुळानगर येथे ५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली़ काल पाणलोट क्षेत्रावर पाऊस सुरू झाल्याने आवक ९००वरून २२४७ क्युसेकवर पोहोचली. मुळा धरणाच्या लाभक्षेत्रावर मिलीमीटरमध्ये पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे : राहुरी ४६, विद्यापीठ ४०, वांबोरी २६, सोनई ९५, घोडेगाव ११७, चांदा १३२, कुकाणा ५९, नेवासा २८, शिरसगाव ५०़ दुसऱ्या दिवशीही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने लाभक्षेत्रातील पिकांमध्ये पाणी साचले आहे़ पाटबंधारे खात्याचे अधिकारी पावसावर लक्ष ठेऊन आहेत़
मुळा धरणाच्या लाभक्षेत्रावर गेल्या दोन दिवसात चांगला पाऊस सुरू आहे़ मुळा डावा व उजवा कालव्यासंदर्भात आढावा घेण्याचे काम सुरू आहे़ दोन्ही कालव्यांसंदर्भात बुधवारी सकाळी निर्णय घेण्यात येणार आहे़
- आनंद वडार, कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे

Web Title: Poor presence in rainy district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.