‘राष्ट्रीय संरक्षित स्मारक’ कालबाह्य

By admin | Published: February 17, 2016 10:29 PM2016-02-17T22:29:31+5:302016-02-17T22:40:33+5:30

रियाज सय्यद, संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावचे ‘राष्ट्रीय संरक्षित स्मारक’ कालपरत्वे अस्तित्वहीन होत चालल्याने भविष्यात इतिहासाचा हा अमूल्य ठेवा केवळ नावापुरता उरण्याची शक्यता आहे.

'Nationally protected monument' timed out | ‘राष्ट्रीय संरक्षित स्मारक’ कालबाह्य

‘राष्ट्रीय संरक्षित स्मारक’ कालबाह्य

Next

रियाज सय्यद, संगमनेर
एकेकाळी भारत देशाच्या ६ पुरातत्वीय स्थळांमध्ये गणले गेलेले संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावचे ‘राष्ट्रीय संरक्षित स्मारक’ कालपरत्वे अस्तित्वहीन होत चालल्याने भविष्यात इतिहासाचा हा अमूल्य ठेवा केवळ नावापुरता उरण्याची शक्यता आहे.
संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावाला पूर्वी ‘जरासंधनगरी’ असे म्हटले जायचे. संगमनेर शहरापासून ५ किलोमीटर अंतरावर पूर्वेला प्रवरा नदीच्या काठी वसलेल्या जोर्वे गावात इ.स.पूर्व १२०० ते १५०० या काळात ‘जोर्वे संस्कृती’ सर्वप्रथम प्रकाशात आली. सन १९५०-५१ या काळात पुणे विद्यापीठाच्या पुरातत्वशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. हसमुख धीरजलाल सांकलिया व डॉ. शांताराम भालचंद्र देव यांनी जोर्वे वसाहतीच्या उत्खननाचे मोठे धाडसी काम केले. या उत्खननात ६ तांब्याच्या कुऱ्हाडी, १ तांब्याची बांगडी व ५ मिलीमीटर व्यासाचा गारगोटीचा मणी अशा वस्तू त्यांना सापडल्या. त्यातील २ कुऱ्हाडी अर्धवट तुटलेल्या असून त्यात कथिल व तांबे या धातूंचे मिश्रण आहे. त्याचबरोबर खोदकामात मोठ्या प्रमाणावर रंगीत खापरे, काही कुंभ, वाडगे व थाळ्या मिळाल्या.
राखाडी रंगाची ही खापरे भाजलेल्या तांबट मातीपासून बनवलेली आहेत. पाने व झाडांची चित्रे देखील या ठिकाणी आढळून आली. त्यानंतर महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, कर्नाटक व आंध्रप्रदेशच्या काही भागात झालेल्या उत्खननात अशाच प्रकारची खापरे सापडली. परंतु सर्वप्रथम ही खापरे जोर्वे येथे सापडल्याने ‘जोर्वे संस्कृती’ म्हणून संबोधली गेली. सापडलेली खापरे घडविलेली असून वेगवेगळे भाग चाकावर बनवून नंतर ते एकमेकांना जोडलेली, पक्कया भाजणीची, लाल गाभ्याची व खणखणीत आवाजाची आहेत. तर काही खापरे काळपट झाली आहेत. खापरांच्या लाल पृष्ठभागावर काळ्या रंगात भौमितिक आकाराचे नक्षीकाम केलेले आहे. काळवीट, पक्षी, कुत्रा आदी पशू-प्राण्यांची चित्रे त्यावर आहेत. भारतीय पुरातत्व विभागाने २२ जानेवारी १९५४ रोजी ‘जोर्वे’ तील या स्थळाला ‘राष्ट्रीय संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित केले. देशातील ६ स्मारकांमध्ये ‘जोर्वे’चा समावेश होतो. परंतु जोर्वेला ‘राष्ट्रीय संरक्षित स्मारक’म्हणून दर्जा मिळाला तरी कालपरत्वे त्याकडे कुणीही फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे इतिहासाचा हा अमूल्य ठेवा सध्या अस्तित्वहीन होण्याच्या मार्गावर आहे.

Web Title: 'Nationally protected monument' timed out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.