नगर मनपा निवडणूक २०१८ : आमदारांच्या प्रभागात सेना-भाजपचा पॅनल गुलदस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 05:33 PM2018-10-30T17:33:55+5:302018-10-30T17:34:19+5:30

आमदार संग्राम जगताप यांचे वास्तव्य असलेल्या प्रभाग क्रमांक १४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलमधील तीन्ही उमेदवार निश्चित झाले आहेत.

Nagar Municipal Election 2018: In the division of MLAs, the Army-BJP panel will be in Guldasta | नगर मनपा निवडणूक २०१८ : आमदारांच्या प्रभागात सेना-भाजपचा पॅनल गुलदस्त्यात

नगर मनपा निवडणूक २०१८ : आमदारांच्या प्रभागात सेना-भाजपचा पॅनल गुलदस्त्यात

Next

अहमदनगर : आमदार संग्राम जगताप यांचे वास्तव्य असलेल्या प्रभाग क्रमांक १४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलमधील तीन्ही उमेदवार निश्चित झाले आहेत. चौथ्या जागेसाठी अनेक नावे चर्चेत आहेत. शिवसेना, भाजपचे प्रत्येकी दोन, तर मनसेच्या एका इच्छुकानेही प्रभागात प्रचार सुरू केला आहे. असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात अन्य पक्षांचे पॅनल तयार करण्यात सेना-भाजप सध्यातरी पिछाडीवरच आहे.
सारसनगर, बुरुडगाव रोडवरील प्रभाग क्रमांक १४ हा पूर्वीच्या प्रभाग क्रमांक २९ आणि ३० चा मिळून तयार झालेला आहे. पूर्वीच्या प्रभाग क्रमांक २९ मध्ये आ. संग्राम जगताप स्वत: व त्यांच्या पत्नी शीतल जगताप विद्यमान नगरसेविका आहेत. प्रभाग क्रमांक ३० मध्ये मनसेचे गणेश भोसले व शिवसेनेच्या सुनिता भगवान फुलसौंदर नगरसेविका आहेत. तसे पाहिले तर नव्याने तयार झालेला भाग राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्लाच आहे. आमदार संग्राम जगताप हे स्वत:ऐवजी अन्य एका कार्यकर्त्याला संधी देणार आहेत. त्यांच्या पत्नी शीतल जगताप याही निवडणूक लढविणार असल्याचे निश्चित झाले आहे. मनसेचे नगरसेवक गणेश भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. माजी नगरसेवक संजय चोपडा यांच्या पत्नी मीनाताई चोपडा याही रिंगणात उतरल्या आहेत. त्यांचीही उमेदवारी निश्चित झाली आहे. ओबीसी पुरुष या जागेसाठी अनेकांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते बाबासाहेब गाडळकर यांचेही नाव चर्चेत आहे. प्रकाश भागानगरे यांच्या सौभाग्यवती, ज्ञानदेव पांडुळे यांचे बंधू दादासाहेब पांडुळे हेही या प्रभागातून इच्छुक आहेत. विधाते, भागानगरे, औसरकर, आंबेकर या परिवारातील सदस्य इच्छुक आहेत. मात्र एका जागेसाठी आ. जगताप यांनी कोणालाही शब्द दिलेला नाही. ते ऐनवेळी ठरवतील तो उमेद्वार या प्रभागात असेल.
शिवसेनेचा अद्याप या प्रभागात पॅनल तयार झाला नाही. माजी महापौर भगवान फुलसौंदर हे खुल्या किंवा ओबीसी यापैकी कोणत्याही एका जागेवरून निवडणूक लढविणार आहेत. त्यांच्या पॅनलमध्ये सध्यातरी कैलास भोसले यांच्या पत्नी इच्छुक आहेत. भोसले हे यापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे या पक्षातून लढले आहेत. यावेळी ते शिवसेनेकडून लढणार आहेत. अन्य दोन उमेदवारांबाबत सध्यातरी चर्चा नाही. मेहूल भंडारी यांच्याही नावाची याच प्रभागासाठी चर्चा आहे.
भाजपचाही पॅनल तयार नाही. मात्र अ‍ॅड. राहुल रासकर आणि माजी नगरसेवक दीपक गांधी हे त्यांचा स्वतंत्रपणे प्रचार करीत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सुमित वर्मा यांनी प्रचार सुरू केला आहे. एकला चलो रे असा त्यांचा प्रभागात दौरा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाल्यास या प्रभागातून काँग्रेस उमेदवारी देण्याची शक्यता नाही.


इच्छुकांची गर्दी
सारसनगर, बुरुडगाव रोडवरील या प्रभागातून निवडणूक लढविण्याची अनेकांची इच्छा आहे. त्यामुळे आ. जगताप यांना हीच खरी डोकेदुखी ठरली आहे. तीन नावे निश्चित केल्यानंतर आता चौथ्या नावासाठी त्यांच्यासमोर अनेक नावे आहेत. त्यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब करणे त्यांच्यासमोर आव्हानच आहे. मात्र ज्याचे नाव निश्चित होईल, त्याला इतर इच्छुकांची सहमतीही निश्चित आहे. सारसनगरच्या प्रभागातून निवडून आल्यानंतर संग्राम जगताप शहराचे दोनवेळा महापौर झाले. आ. अरुण जगताप हेही या प्रभागाचे नगरसेवक राहिले आहेत. आ. जगताप पती-पत्नी दोघेही सध्या नगरसेवक आहेत. त्यामुळे येत्या महापालिकेच्या निवडणुकीत जगताप कुटुंबियांची हक्काची एक जागा कोणाला मिळणार याकडे लक्ष लागले आहे.


जिजामाता गार्डन, सारसनगर, आनंदधाम, भवानीनगर, माळीवाडा, आनंदऋषिजी हॉस्पिटल, हॉटेल उदयनराजे पॅलेस, माणिकनगर, भोसले आखाडा, शिल्पा गार्डन, बजाज शोरुम, विनायकनगर, मातोश्री जॉगिंग पार्क, आयसीए भवन, भिंगार,अहिंसानगर, नक्षत्र लॉन, पोकळे मळा, औसरकर मळा, रेणुकामाता मंदिर, कॉर्पोरेशन बँक, भगवानबाबा मंदिर, वैष्णोदेवी मंदिर.
अ नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब सर्वसाधारण (महिला)
क सर्वसाधारण (महिला)
ड सर्वसाधारण

Web Title: Nagar Municipal Election 2018: In the division of MLAs, the Army-BJP panel will be in Guldasta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.