महापालिकेच्या निषेधार्थ मनसेची बस

By admin | Published: July 14, 2014 11:00 PM2014-07-14T23:00:27+5:302014-07-15T00:47:20+5:30

अहमदनगर: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वखर्चाने शहरात मोफत बससेवा सुरू करीत नगरकरांसाठी विधानसभेची खास आॅफर आणली आहे़

MNS bus to protest against municipal corporation | महापालिकेच्या निषेधार्थ मनसेची बस

महापालिकेच्या निषेधार्थ मनसेची बस

Next

अहमदनगर: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वखर्चाने शहरात मोफत बससेवा सुरू करीत नगरकरांसाठी विधानसभेची खास आॅफर आणली आहे़ मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांच्या हस्ते दिल्लीगेट येथे मोठ्या धुमधडाक्यात बससेवेचे सोमवारी उद्घाटन करण्यात आले असून, शहरातील चार मार्गांवर बस धावणार आहेत़
महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या निषेधार्थ मनसेने शहरात मोफत बस सेवा सुरू केली आहे़ शहरातील दिल्लीगेट येथून ही सेवा सकाळी सुरू करण्यात आली़ कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक सकाळीच दिल्ली दरवाजासमोर चार बस येऊन थांबल्या़ थोड्याच वेळात नेतेही तिथे पोहोचले आणि फटाक्यांच्या आतषबाजीत फित कापून बस सेवा सुरू करण्यात आली़ ही सेवा माळीवाडा ते निर्मलनगर, एमआयडीसी, केडगाव आणि भिंगार या मार्गावर धावणार असून, नगरकरांना मोफत प्रवास करता येणार असल्याचे मनसेच्या वतीने सांगण्यात आले़ बसमधून प्रवास करताना एक रुपयाही तिकीट आकारले जाणार नाही, ही सेवा पूर्णपणे मोफत राहणार आहे़ परंतुही सेवा किती दिवस सुरू राहणार, याबाबत कोणतीही हमी देण्यात आली नाही़ त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर मनसेची मोफत बससेवेची आॅफर किती दिवस सुरू राहणार, ते पाहावे लागेल़
महापालिकेची बस सेवा काही दिवसांपूर्वी बंद पडली़ अभिकर्ता संस्थेस नुकसान भरपाई देण्यास ज्या स्थायी समितीने नकार दिला़ त्या स्थायी समितीचे सभापतीपद मनसेच्या ताब्यात आहे़ मात्र महापालिकेची बस वाचविण्यासाठी मनसेकडून प्रयत्न झाले नाही़ मात्र याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मोफत सेवा सुरू करीत महापालिकेचा निषेध केला़ महापालिकेतील मनसेने बस सेवा बंद पाडली आणि याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बस सेवा सुरू केली आणि तीही मोफत़ महापालिकेतील जनतेचा पैसा वाचविणाऱ्या मनसेने स्वखर्चातून बस सुरू करण्याचा दाखविलेला उदारपणा नेमका कशासाठी? असा सवाल नगरकरांकडून उपस्थित होऊ लागला आहे़ बस उद्घाटनप्रसंगी मनसेचे जिल्हा संपर्कप्रमुख संतोष धुरी,संजय बिराजदार,शहराध्यक्ष गिरीश जाधव, जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, वसंत लोढा, नगरसेवक गणेश भोसले, नितीन भुतारे आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
बससेवा शहराची गरज आहे़ ही गरज लक्षात घेऊन स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मोफत बस सेवा सुरू केली आहे़ त्यामुळे नागरिकांची उत्तम सोय होणार आहे़
- नितीन सरदेसाई, मनसे नेते.
महापालिकेच्या निषेधार्थ ही सेवा सुरू करण्यात आली आहे़ सेवा बंद करण्यात आली असून, सत्ताधाऱ्यांनी यापासून धडा घेऊन तातडीने बस सेवा सुरू करावी.
- वसंत लोढा, मनसे नेते
ट्रॅव्हल्सने मोफत प्रवास
बस सेवा पुरविण्यासाठी मनसेने ट्रॅव्हल्स भाडेतत्वावर घेतल्या आहेत़ त्यामुळे नगरकरांना ट्रॅव्हल्समधून नगर शहराची वारी आणि तीदेखील मोफत होणार आहे़ त्यामुळे प्रवाशांत आनंदीआनंद आहे़

Web Title: MNS bus to protest against municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.