स्वच्छतेसाठी सरसावले लाखो हात..!

By Admin | Published: October 2, 2014 11:42 PM2014-10-02T23:42:57+5:302014-10-02T23:50:39+5:30

अहमदनगर : महात्मा गांधी जयंती पासून सुरू झालेल्या मिशन स्वच्छ भारत अभियानात जिल्ह्यात गुरूवारी लाखो हात स्वच्छतेसाठी सरसावले.

Millions of hands have come for cleanliness ..! | स्वच्छतेसाठी सरसावले लाखो हात..!

स्वच्छतेसाठी सरसावले लाखो हात..!

googlenewsNext

अहमदनगर : महात्मा गांधी जयंती पासून सुरू झालेल्या मिशन स्वच्छ भारत अभियानात जिल्ह्यात गुरूवारी लाखो हात स्वच्छतेसाठी सरसावले. शासकीय कार्यालय, सार्वजनिक ठिकाणे, ग्रामपंचायात कार्यालये, शाळा, महाविद्यालयाच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. तत्पूर्वी सर्वांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.
यंदापासून निर्मल भारत अभियानाचे नाव बदलण्यात आले असून त्याऐवजी देशभर मिशन स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. याची सुरूवात गांधी जयंती पासून प्रत्येक गावात शाळा, महाविद्यालय ग्रामपंचायत, पंचायत समितीच्या कार्यालयाच्या स्वच्छते पासून होणार आहे. जिल्ह्यातील सर्व शाळेतील ९ लाख ३० हजार विद्यार्थ्यांसह, सर्वच शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी हातात झाडू घेवून स्वच्छता केली.
हे स्वच्छता अभियान २३ आॅक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. या काळात हागणदारी मुक्तीकडे वाटचाल करणे, शौचालयाचे बांधकाम करून घेणे, हात धुण्याचे महत्व पटवून देणे, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन व परिसर स्वच्छता, लहान मुलांच्या विष्ठेचे व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याची सुरक्षित हाताळणी व साठा याबाबतचे प्रबोधन आणि मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासह ग्रामपंचायतींना हागणदारी मुक्तीचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.
विवेकानंदमध्ये स्वच्छता
तारकपूर येथील सेंट विवेकानंद शाळेत महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात आले. शाळेचा परिसर, विद्यार्थ्यांची बसण्याची जागा, शाळेच्या खोल्यांमधील जळमटे विद्यार्थ्यांनी स्वच्छ केली. मुख्याध्यापिका गीता तांबे, गोदावरी कीर्तानी, कांचन पापडेजा यांनी मुलांना स्वच्छतेची शपथ दिली. मुलांनी हसत-खेळत शाळेचा परिसर स्वच्छ केला. सामूहिक स्वच्छतेचा दर महिन्यातून एकदा उपक्रम राबविण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला. शाळेतील शिक्षकांनीही हातात झाडू घेवून स्वच्छता मोहिमेत भाग घेतला.
‘बीएसएनएल’मध्ये स्वच्छता
महात्मा गांधी जयंतीनिमित्त बीएसएनएल कार्यालयात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. महाव्यवस्थापक अजातशत्रू सोमाणी यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन या मोहिमेचा शुभारंभ केला.
सोमाणी यांनी यावेळी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याची माहिती दिली. राजभाषा अधिकारी विजय नगरकर यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना भारत अभियानाची शपथ दिली. यावेळी कार्यालयाचे उपमहाव्यवस्थापक विजय तांबे, नंदकुमार टेकाळे, भानुदास महानूर, भीमराव खेडकर, गणेश जोशी, मिलिंद उपासनी, एम.पी. गंभीरे, एस.पी. पवार, एस.एम. थोरात, पद्माकर कोकणे आदींची उपस्थिती होती.
स्वच्छ नगर अभियान
महात्मा गांधी जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हरियाली संस्थेने स्वच्छ नगर अभियानास प्रारंभ केला आहे़ दि़ २ ते २३ आॅक्टोबर या कालावधित हे अभियान राबविण्यात येणार आहे़ गांधी जयंतीनिमित्त गुरुवारी संस्थेच्यावतीने बुरुडगाव रोड, लिंकरोड, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सिद्धीबाग परिसरात स्वच्छता करण्यात आली़ यावेळी आयटीआयचे प्राचार्य बाळासाहेब ससे यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली़ हरियाली संस्थेचे अध्यक्ष सुरेश खामकर यांनी अभियान आयोजनामागील भूमिका सांगून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली़ या उपक्रमात आबासाहेब सूर्यवंशी, प्रा़ सतीश शिर्के, रंगनाथ सुंबे, अतुल ढाकणे, प्रशांत बंडगर, वैशाली कुरापट्टी, विजय कुदळे, मच्छिंद्र लोहकरे, उद्धव म्हसे आदी सहभागी झाले होते़
(प्रतिनिधी)

Web Title: Millions of hands have come for cleanliness ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.