लोकनेते राजीव राजळे यांच्या निधनाने पाथर्डी तालुक्यावर शोककळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 11:51 AM2017-10-08T11:51:04+5:302017-10-08T12:00:07+5:30

Lokneeta Rajeev Rajale's demise on Pathardi taluka mourns | लोकनेते राजीव राजळे यांच्या निधनाने पाथर्डी तालुक्यावर शोककळा

लोकनेते राजीव राजळे यांच्या निधनाने पाथर्डी तालुक्यावर शोककळा

googlenewsNext

पाथर्डी / तिसगाव (अहमदनगर) : शनिवारी रात्री लोकनेते माजी आमदार राजीव राजळे (वय ४८) यांचे मुंबई येथे उपचारा दरम्यान निधन झाले. त्यामुळे पाथर्डी तालुक्यावर शोककळा पसरली आहे. रविवारी सकाळी ८ वाजता त्यांचे पार्थिव कासार पिंपळ्गाव येथे सिद्धसावली या त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे.
राजळे हे काही दिवसांपासून न्युमोनियामुळे आजारी होते़ नगर येथे उपचार सुरु असतानाच त्यांच्या फुप्फुसात संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांना तातडीने मुंबई येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील माजी आमदार अप्पासाहेब राजळे, आई मोहिनी राजळे, पत्नी आमदार मोनिका राजळे, दोन मुले व एक बंधू राहूल असा परिवार आहे.
रविवारी सकाळी त्यांचे पार्थिव कासार पिंपळगाव येथे आणण्यात आले. रुग्णवाहिकेसोबत राजीव राजळे यांच्या पत्नी तथा आमदार मोनिका राजळे, राजाभाऊच्या भगिनी सुनीता गडाख, संगीता जगदाळे, राहुल राजळे, गुलाब राजळे हे होते. पार्थिव असलेली रुग्णवाहिका प्रवेशद्वारात येताच राजीव राजळे यांच्या आई मोहिनीकाकी यांचा बांध फुटला. त्यांच्यासह सर्वच नातेवाईकांना अश्रू अनावर झाले़ त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जिल्हाभरातील त्यांचे कार्यकर्ते कासार पिंपळगाव येथे दाखल झाले आहेत. अंत्यविधीची तयारी जवळच असलेल्या दादा पाटील राजळे महाविद्यालयाच्या मैदानावर सुरु आहे. राज्य शासनातील मंत्री, अधिकारी यांची उपस्थिती गृहीत धरून मोठा शामियाना, हेलिपॅड, वाहन पार्किंग व पूरक व्यवस्था उभारण्याचे काम सुरु आहे़ ४़३० वाजता अंत्यविधी होणार आहे. दरम्यान पाथर्डी, शेवगाव तालुक्यातील अनेक गावे आज बंद आहेत. लाडक्या नेत्याच्या शोकसागरात बुडालेल्या अनेक शेतक-यांनी आज दूधही डेअरीवर नेले नाही़ काही डेअरी संचालकांनी संकलन बंद ठेवले.

   २००४ ते २००९ या कालावधीत आमदार

  • राजीव राजळे हे २००४ ते २००९ या कालावधीत पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून काँगे्रसचे उमेदवार म्हणून निवडून आले होते. २००९ मध्ये अहमदनगर (दक्षिण) मतदारसंघातून त्यांनी लोकसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविली होती. त्यानंतर त्यांनी २०१४ मध्ये याच मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून लोकसभेची निवडणूक लढविली होती. २०१४ च्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी मोनिका राजळे या भाजपच्या तिकिटावर शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून निवडून आल्या आहेत.

     आदर्श संसदपटू

  • राजळे हे अभ्यासू आमदार म्हणून ओळखले जात. विधानसभेत त्यांनी अर्थसंकल्पावर केलेल्या अभ्यासपूर्ण भाषणांची मोठी चर्चा झाली होती. त्यावेळी त्यांना विधानसभेने आदर्श संसदपटू पुरस्कार देऊन गौरविले होते.

Web Title: Lokneeta Rajeev Rajale's demise on Pathardi taluka mourns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.