किशोरवयीन मुलींचा आगळा-वेगळा कीर्तन महोत्सव

By admin | Published: March 26, 2017 02:52 PM2017-03-26T14:52:07+5:302017-03-26T14:52:07+5:30

राज्यभरातून आलेल्या २५ मुलींचे कीर्तन, प्रवचन, गायक ऐकण्याची संधी मिळणार आहे.

Juvenile Girls' Unique Kirtan Festival | किशोरवयीन मुलींचा आगळा-वेगळा कीर्तन महोत्सव

किशोरवयीन मुलींचा आगळा-वेगळा कीर्तन महोत्सव

Next

 किशोरवयीन मुलींचा आगळा-वेगळा कीर्तन महोत्सव

आॅनलाईन लोकमत
अनिल लगड : अहमदनगर 
चिचोंडी पाटील (ता. नगर) येथे १६ ते १७ वयोगटांतील किशोरवयीन मुलींचा आगळा-वेगळा कीर्तन, प्रवचन महोत्सव १४ ते २१ मे २०१७ दरम्यान साजरा होत आहे. या महोत्सवात राज्यभरातून आलेल्या २५ मुलींचे कीर्तन, प्रवचन, गायक ऐकण्याची संधी चिचोंडीकरांना मिळणार आहे.
चिचोंडीपाटील बालकीर्तनकार, भागवतकार (वृंदावन) ह.भ.प. लक्ष्मीताई भास्कर खडके यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने या कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. याबाबत खडके हिने सांगितले की, प. पू. वै. मदन महाराज बिहाणी, ह.भ.प. बबन महाराज बहिरवाल, ह.भ.प. श्यामसुंदर महाराज पुरी यांच्या आशीर्वादाने आदिमायाशक्ती मुक्ताई पुण्यतिथीनिमित्त या महोत्सवाचे आयोजन केले आहे. तुकोबारायांच्या प्रमाणानुसार सर्वांना परमार्थिक आनंद व नामामृताचा अनुभव घेता यावा, यासाठी या कीर्तन सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सप्ताहात राज्यभरातील किशोरवयीन मुलींचे कीर्तन, प्रवचन होणार आहे. यात अध्यात्माशिवाय स्त्री-भ्रूणहत्या, वृक्षारोपण, महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती या विषयांवर प्रबोधन करण्यात येणार आहे. याशिवाय वादक, गायक, टाळकरीही किशोरवयीन मुलीच राहणार आहेत. जवळपास २५ मुलींचा या महोत्सवात ताफा आहे. २१ मे रोजी सकाळी १० वाजता ह.भ.प. राधाताई सानप महाराज (पाटोदा, जि. बीड) यांच्या काल्याच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता होणार आहे. राज्यात प्रथमच किशोरवयीन मुलींचा आगळा-वेगळा महोत्सव पार पडत असून, याचा चिचोंडी पाटीलसह परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले खडके यांनी केले आहे.
ह.भ.प. सपनाताई साखरे (सोलापूर), नयनाताई साळवे (नाशिक), मोनालीताई गोर्डे (औरंगाबाद), पूजाताई कुटे (नेवासा), ललिताताई ठोंबरे (औरंगाबाद), ज्ञानेश्वरीताई येवले, जामखेड), लक्ष्मीताई खडके (चिचोंडी पाटील, अहमदनगर) यांची कीर्तने होणार आहेत. तर शिवचरित्रावर वैष्णवीताई (राहुरी) यांचे व्याख्यान होणार आहे.
प्रवचनाची जबाबदारी त्रिवेणीताई येवले (जामखेड), साक्षीताई साखरे (सोलापूर), वैष्णवीताई फिसके (अहमदनगर), साक्षीताई वाघ (कोपरगाव), कीर्ती गुंड (आठवड, ता. नगर) यांच्यावर आहे, असे ह.भ. प. लक्ष्मीताई खडके यांनी सांगितले.
मी अत्यंत गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील असून, मला लहानपणापासून अध्यात्माविषयी ओढ होती. आई-वडिलांनी मला यासाठी प्रेरणा दिली. मी वृंदावन, आळंदी येथे अध्यात्माचे धडे घेतले. कीर्तन महोत्सवाच्या आयोजनासाठी मला ग्रामस्थांचे अनमोल सहकार्य मिळत आहे, असे भागवताचार्य लक्ष्मीताई खडके यांनी सांगितले़

Web Title: Juvenile Girls' Unique Kirtan Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.