गोपीनाथ मुंडेंविना दसरा मेळावा

By admin | Published: October 2, 2014 11:47 PM2014-10-02T23:47:27+5:302014-10-02T23:49:53+5:30

पाथर्डी : गेल्या पस्तीस वर्षापासून गोपीनाथ मुंडे हे भगवानगड येथे दसऱ्याला हजेरी लावून कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते़

Gopinath Mundanevina Dussehra rally | गोपीनाथ मुंडेंविना दसरा मेळावा

गोपीनाथ मुंडेंविना दसरा मेळावा

Next

पाथर्डी : गेल्या पस्तीस वर्षापासून गोपीनाथ मुंडे हे भगवानगड येथे दसऱ्याला हजेरी लावून कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते़ मात्र, त्यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे-पालवे यांच्या उपस्थितीत पहिलाच दसरा मेळावा भगवानगडावर होत आहे़ या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली असून, या मेळाव्यात पंकजा मुंडे काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत होत असलेल्या या मेळाव्याला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, एकनाथ खडसे उपस्थित राहणार असल्याने राजकीय निरीक्षकांच्या नजराही या मेळाव्याकडे लागल्या आहेत़
भगवानगड हा शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात येत असल्याने या मेळाव्याला राजकीय महत्व आले आहे. भगवानगड आणि गोपीनाथ मुंडे हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून रुढ झाले होते़ भगवानगडावर गोपीनाथ मुंडे यांची अपार श्रद्धा होती़ दसरा मेळाव्याला ते आवर्जून उपस्थित राहत़ त्यांनी भगवानगडाचा मोठा विकास केला़ त्यांच्या शब्दावर अनेकांनी भगवानगडाच्या विकासासाठी योगदान दिले आहे़ यामध्ये तोडणी कामगारांचा मोठा वाटा आहे. मुंडे भगवानगडावर येणार असे समजल्यानंतर राज्यभरातील त्यांचे चाहते मोठ्या संख्येने भगवानगडावर येत़ मुंडेंना येण्यास उशीर झाला तरी त्यांचे विचार ऐकल्याशिवाय कोणीही गड सोडत नव्हते, असा इतिहास आहे. परंतु मुंडे यांच्या अनुपस्थितीत पहिलाच दसरा मेळावा होत आहे़ पंतप्रधान नरेंद्र मोदींना गडावर आणण्याचे स्व. मुंडे यांचे स्वप्न होते. परंतु त्यांच्या अनुपस्थितीत पंकजा मुंडे यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, एकनाथ खडसे यांना आमंत्रित केले असल्याने हा मेळावा अभूतपूर्व करण्याचा चंग कार्यकर्त्यांनी बांधला आहे. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत होणाऱ्या या दसरा मेळाव्यात राजकीय तोफा धडाडणार असल्याने राजकीय निरीक्षकांच्या नजराही या मेळाव्याकडे लागल्या आहेत़ (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Gopinath Mundanevina Dussehra rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.