‘गुगल’च्या रचनेवर ‘भूगोल’ तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 01:27 PM2018-09-13T13:27:53+5:302018-09-13T13:27:59+5:30

लोकसंख्येचा निकष पूर्ण करून तुटलेला भाग पुन्हा जोडा

'Geography' broken on the design of Google | ‘गुगल’च्या रचनेवर ‘भूगोल’ तुटला

‘गुगल’च्या रचनेवर ‘भूगोल’ तुटला

googlenewsNext

अहमदनगर : लोकसंख्येचा निकष पूर्ण करून तुटलेला भाग पुन्हा जोडा...नव्याने समाविष्ट झालेला भाग पुन्हा जोडा...दूरचा भाग वगळा... भौगोलिक सलगता कायम ठेवा... अशा हरकतींवर तक्रारदारांनी त्यांचे म्हणणे बुधवारी वित्त सचिवांकडे सादर केले. वित्त सचिवांनी म्हणणे ऐकून घेतले, तर रचनेत बदल होणे शक्य नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी तिथेच स्पष्ट केले. त्यामुळे एखादा किरकोळ बदल वगळता आहे तशीच प्रभाग रचना एक आॅक्टोबरला प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
महापालिकेची प्रारुप प्रभाग रचना २७ आॅगस्ट रोजी राजपत्रात प्रसिद्ध केली. त्यावर ५ सप्टेंबरपर्यंत ८३ हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्यावर बुधवारी सुनावणी झाली. राज्य शासनाच्या वित्त विभागाचे सचिव राजीवकुमार मित्तल यांच्या उपस्थितीत ही सुनावणी झाली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, उपायुक्त तथा उपजिल्हाधिकारी ज्योती कावरे, सहायक नगररचना संचालक राजेश पाटील यांची उपस्थिती होती. प्रभाग रचनेवर ८३ हरकती घेण्यात आल्या होत्या. त्यापैकी २२ जणांनी हजेरी लावली. त्यामुळे दुपारी ११ वाजता सुरू झालेली ही सुनावणी दुपारी तीन वाजता संपली.

जिल्हाधिका-यांवर नाराजी
वित्त आयोगाचे सचिव मित्तल यांनी हरकतदारांचे म्हणणे शांतपणे ऐकले. तसेच अर्जाप्रमाणे बदल करा, अशा विनंत्याही हरकतदार करीत होते. नोंद घेतल्याचे मित्तल सांगत होते. मात्र लोकसंख्येचे गणित जुळत नसल्याने आणि एका प्रभागाची रचना दुरुस्त केली तर त्याचा सर्वच प्रभागाच्या रचनेवर परिणाम होणार असल्याचे सांगत बदल होणार नाही, असे जिल्हाधिकारी सांगत होते. त्यामुळे हरकतदारांचा हिरमोड झाला. प्रभाग रचनेत कोणताही बदल होणार नाही, असेच त्यांच्या बोलण्यावरून स्पष्ट झाल्याचे काही हरकतदारांनी माध्यमांना सांगितले.

तर कोर्टात जाणार
प्रभाग रचनेवर दिलेल्या हरकतींबाबत संबंधित अधिकारी अजिबात म्हणणे ऐकून घेत नाहीत. त्यामुळे प्रभाग रचनेत दुरुस्ती होण्याची शक्यता धूसर आहे. प्रभाग रचनेमुळे नागरिक, मतदार आणि विकासावर परिणाम होणार आहे. त्यामुळे प्रभाग रचनेवरील हरकतींबाबत गरज भासल्यास न्यायालयात याचिका दाखल करू, असे जाहीर आवाहन वसंत लोढा यांनी शासकीय विश्रामगृहासमोर उपस्थित हरकतदारांना केले.

‘गुगल’च्या नकाशावर स्पष्टीकरण
महापालिकेची प्रभाग रचना प्रथमच ‘गुगल’वर करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांनी हरकती दाखल केल्या, त्यांना म्हणणे मांडण्यासाठी गुगल नकाशाची स्क्रीनवर सोय करण्यात आली होती. सहायक नगररचना संचालक पाटील यांनी पॉइंटच्या सहाय्याने गुगलवर रचना दाखविली. तसेच हरकतदारांनीही स्क्रीनवर दिसणा-या नकाशावरच आपला भाग कसा तुटला, नव्याने कसा जोडला, हे अधिका-यांना पटवून दिले. हरकतींसाठी प्रथमच अशी व्यवस्था झाली होती.

सुनावणी प्रक्रिया ही गोपनीय होती. त्यामुळे त्याचा तपशील सांगता येणार नाही. झालेल्या सुनावणी प्रक्रियेचा अहवाल २४ तारखेपर्यंत राज्य निवडणूक आयोगाला पाठविण्यात येणार आहे. २८ सप्टेंबरला सर्व हरकतींवरील निर्णय देण्यात येणार आहे. या निर्णयासह १ आॅक्टोबरला अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याचवेळी कोणाच्या हरकती ग्राह्य धरल्या, ते कळणार आहे.
-राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त.

Web Title: 'Geography' broken on the design of Google

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.