गांधींचा भाजप राष्ट्रवादीच्या दावणीला : अनिल राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 12:31 PM2018-11-30T12:31:46+5:302018-11-30T12:45:35+5:30

नगरमधील भारतीय जनता पार्टी ही राष्ट्रवादी व काँगे्रस पुरस्कृत पार्टी आहे, हे केडगावमध्ये उघड झाले आहे. या तिघांची शिवसेनेविरोधात छुपी युती आहे. 

Gandhian BJP's claim to the NCP: Anil Rathod | गांधींचा भाजप राष्ट्रवादीच्या दावणीला : अनिल राठोड

गांधींचा भाजप राष्ट्रवादीच्या दावणीला : अनिल राठोड

googlenewsNext

अहमदनगर : नगरमधील भारतीय जनता पार्टी ही राष्ट्रवादी व काँगे्रस पुरस्कृत पार्टी आहे, हे केडगावमध्ये उघड झाले आहे. या तिघांची शिवसेनेविरोधात छुपी युती आहे. गांधींचा भाजप पक्ष राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलेला आहे, अशी खरमरीत टीका शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अनिल राठोड यांनी केली.
गुरुवारी (दि़२९) ‘लोकमत’च्या फेसबुक पेजवरुन राठोड यांची लाईव्ह मुलाखत घेण्यात आली. ‘लोकमत’ टीमने व फेसबुकवर नागरिकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना राठोड यांनी दिलखुलास उत्तरे दिली.
ते म्हणाले, महापालिका निवडणुकीसाठी भाजपने प्रचाराचा नारळ फोडलाय. हा नारळ फोडताना महापौर द्या तरच तीनशे कोटी देतो, असे त्यांचे प्रदेशाध्यक्ष जाहीर करतात. हे मतदारांना त्यांनी दाखवलेले आमिष आहे. तुम्हाला द्यायचेच होते तर यापूर्वी का नाही निधी दिला. राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता आहे. मग यापूर्वी निधी देण्यासाठी कोणी अडवले होते का? ठाण्यात, कल्याणमध्ये तुम्ही असेच निधी देण्याचे आश्वासन दिले होते. तेथे निधी दिला का? हे पोकळ आश्वासन नगरला नकोय. तुमचे पालकमंत्री, खासदार नगरच्या उड्डाणपुलाबाबत अनेकदा २००-२५० कोटी आणल्याचे सांगत होते. मग पुलाचे काम का नाही केले, नगरला भाजपाने काय दिले, किती निधी शहरासाठी दिला, कोणत्या योजना आणल्या, हे जाहीर करावे. तुम्ही मागील साडेचार वर्षात काहीच केले नाही. फक्त शहराची प्रतिमा मलिन केली. त्यामुळे तुम्ही आता थापा मारणे बंद करा. तुम्ही शहराचा बिहार केला. आम्ही नगर शहर भयमुक्त केले. राष्ट्रवादी ज्यापद्धतीने काम करीत आहेत, त्याचपद्धतीने भाजप काम करीत आहे. ही भाजप पार्टी आम्हाला मान्य नाही. ही बनावट पार्टी आहे. खरे भाजपवाले यांच्यावर नाराज आहेत. नगरमध्ये सोयऱ्या-धाय-यांचे राजकारण सुरु आहे. ते अत्यंत घातक आहे़. हे लोकांच्या लक्षात आले आहे.
पंधाडे, डागवाले निष्ठावान नव्हतेच...
अंबादास पंधाडे, डागवाले यांसारखे निष्ठावान शिवसेनेला सोडून का गेले, असा प्रश्न विचारला असता राठोड म्हणाले, ते एका पक्षात कधीच टिकले नाहीत. त्यांच्या काही गरजा भागविण्यासाठी ते तिकडे गेले. ते गद्दार आहेत. त्यांना निष्ठावान कसे म्हणता येईल. त्यांची मला प्रश्न विचारण्याची ताकद नाही. बाळासाहेब बोराटे यांनी गतवेळी शिवसेनेला फसवल्यानंतरही त्यांना पुन्हा पक्षात घेण्यात आले याकडे लक्ष वेधले असता राठोड म्हणाले, काहीजण शिवसेना सोडून गेले़ त्याचे फळ त्यांना मिळाले. त्यामुळे ते पुन्हा आमच्याकडे आले. लोकांचे विचार बदलत राहतात. कार्यकर्ते ज्याची मागणी करतात, त्याला आम्ही तिकीट देतो.

‘ये रिश्ता क्या कहलाता है
जेथे राष्टÑवादीचे उमेदवार आहेत तेथे भाजपने कमजोर उमेदवार दिले आहेत व जेथे भाजपचे उमेदवार आहेत तेथे राष्टÑवादीने कमजोर उमेदवार दिले आहेत. ही सर्व मॅच फिक्सिंग आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ हे लोक ओळखून असल्याचे राठोड म्हणाले.

Web Title: Gandhian BJP's claim to the NCP: Anil Rathod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.