माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांचे निधन, नगरमध्ये आज अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 08:02 AM2021-03-18T08:02:50+5:302021-03-18T08:03:13+5:30

त्यांच्या पश्चात पत्नी सरोज, देवेंद्र व सुवेंद्र ही विवाहित मुले, मुलगी श्वेता, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Former Union Minister of State Dilip Gandhi passes away, cremated in the city today | माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांचे निधन, नगरमध्ये आज अंत्यसंस्कार

माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांचे निधन, नगरमध्ये आज अंत्यसंस्कार

Next

अहमदनगर : माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप मनसुखलाल गांधी (वय ७०) यांचे बुधवारी  पहाटे नवी दिल्लीतील खासगी रुग्णालयात निधन झाले. श्वसनाचा त्रास होत असल्याने मंगळवारी  त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्या पार्थिवावर अहमदनगरमध्ये गुरुवारी दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.

त्यांच्या पश्चात पत्नी सरोज, देवेंद्र व सुवेंद्र ही विवाहित मुले, मुलगी श्वेता, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. गांधी यांच्या अकाली निधनाने नगर जिल्ह्यावर शोककळा पसरली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मतदारसंघातील खासदार म्हणून त्यांची नवी दिल्लीमध्ये वेगळी ओळख होती. १९९९, २००९ व २०१४ अशा तीन लोकसभा निवडणुकांमध्ये अहमदनगर मतदारसंघातून ते विजयी झाले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते जहाज बांधणी राज्यमंत्री होते. सव्वा लाख सभासद असलेल्या नगर अर्बन सहकारी बँकेचे ते माजी अध्यक्ष होते. 

९ मे १९५१ रोजी जन्मलेल्या गांधी यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले होते. नगरमध्ये ज्यूस सेंटरची गाडी चालवून त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला. त्यानंतर ते जनसंघाचे स्वयंसेवक म्हणून राजकारणात आले होते.

माजी मंत्री दिलीप गांधी यांच्या निधनाने दु:ख झाले. समाजसेवेसाठी आणि गोरगरिबांना मदत करणाऱ्या योगदानाबद्दल त्यांची आठवण येईल. महाराष्ट्रात भाजपला बळकट करण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या कुटुंबीयांना आणि समर्थकांना दु:खातून सावरण्याचे बळ मिळो.     - नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

दिलीप गांधी यांनी नगरसेवक, खासदार आणि केंद्रीय मंत्री असा राजकीय प्रवास केला. गत ९ मार्चला दिल्लीत मंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट झाली होती. त्यामुळे बुधवारी अचानक त्यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. सकल जैन समाजाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून माझी व त्यांची नेहमी अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांबाबत चर्चा होत असे. त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याची शक्ती मिळो.
    - विजय दर्डा, माजी खासदार व 
    सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष 

माजी मंत्री दिलीप गांधी यांच्या निधनाने एक लोकनेता आपण गमावला. अल्पसंख्याक जैन समाजातून पुढे आलेल्या गांधी यांनी सर्वांना सामावून घेणारे व्यापक राजकारण केले. काहीही राजकीय पार्श्वभूमी नसताना पक्षनिष्ठा व स्व कर्तृत्व या जोरावर ते तीन वेळा खासदार व केंद्रात मंत्री झाले.  त्यांचे व्यक्तिमत्व संघर्षमय व धडपड करणारे होते. 
    - राजेंद्र दर्डा, माजी मंत्री 
    व एडिटर इन चीफ, लोकमत.

Web Title: Former Union Minister of State Dilip Gandhi passes away, cremated in the city today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.