"जब शनि महाराज की लाठी चलती है तो आवाज नहीं होता…"; आरोपानंतर फडणवीसांचे कडक शब्दांत आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 09:59 AM2023-12-20T09:59:43+5:302023-12-20T10:04:14+5:30

शनैश्वर देवस्थानची विशेष लेखापरीक्षणानंतर उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, असं देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलं आहे.

Devendra Fadnavis says he will conduct a high level inquiry into the devasthan committee in Shani Shingnapur | "जब शनि महाराज की लाठी चलती है तो आवाज नहीं होता…"; आरोपानंतर फडणवीसांचे कडक शब्दांत आदेश

"जब शनि महाराज की लाठी चलती है तो आवाज नहीं होता…"; आरोपानंतर फडणवीसांचे कडक शब्दांत आदेश

Devendra Fadnavis ( Marathi News )  : अहमदनगर जिल्ह्यातील शनि शिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थान संस्थेतील कथित भ्रष्टाचारावरून गंभीर आरोप केले जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. "जब शनि महाराज की लाठी चलती है तो आवाज नहीं होता…," असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी चौकशी केली जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. "विश्वस्त मंडळाच्या नोकर भरती, देणगी स्वीकारण्याची पद्धत, इत्यादीबाबत सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल. चौकशीनंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. तसंच श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्त व्यवस्था (शिंगणापूर) अधिनियम २०१८ या अधिनियमाच्या अंमलबजावणीचा दिनांक निश्चित करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल," असं फडणवीस यांनी काल विधानपरिषदेत सांगितलं आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "शनैश्वर देवस्थानच्या संदर्भातील सदस्यांनी मांडलेले विषय गंभीर आहेत. आवश्यक नसताना १८०० जणांची नियुक्ती करण्यात आल्याचे दिसून येते. देवस्थानमध्ये कर्मचारी भरतीच्या अनुषंगाने जाहिरात प्रसिद्ध केली नाही. तसंच देणगी गोळा करण्यासंदर्भातही तक्रारी असून या यासंदर्भात सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी चौकशी केली आहे. मात्र, ही चौकशी पुरेशा प्रमाणात करण्यात आली नाही. तसेच या चौकशीत विसंगती आहे. त्यामुळे शनैश्वर देवस्थानचे विशेष लेखापरीक्षणनंतर उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल."

शिर्डी देवस्थानच्या धर्तीवर शनिशिंगणापूर देवस्थानसंदर्भातही सन २०१८ मध्ये कायदा करण्यात आला. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणी करण्यात आली नाही. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरात लवकर तो लागू करण्यात येईल, असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली. आमदार अनिल परब, कपिल पाटील, प्रवीण दरेकर, सतेज पाटील, प्रसाद लाड आदींनी या चर्चेत सहभाग घेतला.

Web Title: Devendra Fadnavis says he will conduct a high level inquiry into the devasthan committee in Shani Shingnapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.