पितरांचे पूजन करण्यात काहीही गैर नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 03:19 PM2019-05-06T15:19:07+5:302019-05-06T15:21:28+5:30

पितरांचे पूजन करण्यात काहीही गैर नाही, ते करायलाच हवे. पण मेलेल्यांना खाऊ घालणे आणि जिवंत माणसांना मरणयातना भोगायला लावणे ...

There is nothing wrong with worshiping the ancestors! | पितरांचे पूजन करण्यात काहीही गैर नाही !

पितरांचे पूजन करण्यात काहीही गैर नाही !

Next

पितरांचे पूजन करण्यात काहीही गैर नाही, ते करायलाच हवे. पण मेलेल्यांना खाऊ घालणे आणि जिवंत माणसांना मरणयातना भोगायला लावणे याने खरेच पुण्य मिळेल का? पितरांचा आत्मा शांत होईल का? याचा विचार आपण कधी करणार? 

अक्षय्यतृतीया... साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त! पितरांचे स्मरण करण्याचा दिवस. या दिवशी पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात खीर, आंब्याचे पन्हे किंवा चिंचोणी, पापड, कुरडया आदी वाढून सुगंधित पाण्याने भरलेला घट ब्राह्मणाला दान केला जातो. असे केल्याने पितरांंचा आत्मा शांत होतो असे मानले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात एवढं सर्व करायला वेळ नसला तरी अनेक जण पितरांच्या नावे अन्नदान करतात. काही जण ते पाण्यात सोडतात तर काही कावळ्यांना खाऊ घालतात.

सध्या उन्हाचा कडाका वाढल्याने दुपारच्या वेळी कावळेही दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे यंदा पितरांचा आत्मा शांत करायला कावळे मिळतील का, असा प्रश्नही अनेकांना सतावत आहे. पितरांचे पूजन करण्यात काहीही गैर नाही, ते करायलाच हवे. पण मेलेल्यांना खाऊ घालणे आणि जिवंत माणसांना मरणयातना भोगायला लावणे याने खरेच पुण्य मिळेल का? याचा विचार आपण कधी करणार? 
आजचे कुटुंब त्रिकोणी किंवा चौकोनी पद्धतीचे आहे. मम्मी-डॅडी आणि चिंटी, बंटीच्या कुटुंबात आजी-आजोबांना जागा नाही. ते त्यांच्या स्टेटसमध्ये बसत नाहीत. त्यामुळे काहीजण आपल्या वृद्ध माता-पित्याची रवानगी वृद्धाश्रमात करतात. ज्यांना प्रेमाने घडवले, लहानाचे मोठे केले, त्यांच्याकडून मिळालेल्या या अपमानास्पद वागणुकीने म्हाताºया आई-वडिलांच्या डोळ्यांच्या कडा ओलावतात, पण त्यांच्या डोळ्यातले पाणी त्यांच्या मुलांना दिसत नाही. त्यांच्या डोळ्यावर हायफाय स्टेटस, आपला संसार, आपली मुले... अशी संकुचित विचारांची पट्टी असते. आणि या आपल्यांमध्ये आई-वडिलांना थारा नसतो.

काही जण आपल्या मुलांना पाळणाघरात ठेवायला नको, घरात स्वयंपाक करायला नको, म्हणून आई-वडिलांचा अक्षरश: नोकरांसारखा वापर करून घेतात. काही अपवाद वगळता आज अनेक घरात असेच काहीसे चित्र हमखास पाहायला मिळते. मुलांकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक, वाढता दुरावा यामुळे आई-वडिलांना मात्र जीवन नकोसे होऊन जाते. मरणाची वाट पाहण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसतो आणि मग कधीतरी हवेहवेसे वाटणारे मरण त्यांच्या डोळ्यासमोर उभे ठाकते आणि सुटलो एकदाचे म्हणून ते निमूटपणे डोळे मिटतात.

आई गेली, वडील गेले की मग त्यांच्याशी निष्ठूरपणे वागणाºया याच मुलांच्या डोळ्यांत पाणी जमा होते. आईचे किंवा वडिलांचे श्राद्ध घातले जाते. त्यांच्या आवडीचे सर्व खाद्यपदार्थ कावळ्याला खाऊ घातले जातात. माझी आई फार प्रेमळ होती, वडील खूप चांगले होते... असे म्हणत जुन्या आठवणींना  उजाळा दिला जातो. कावळ्याने दिलेले अन्न खाल्ले की आई-वडिलांचा आत्मा तृप्त झाला, असे मानले जाते. काय म्हणावे असल्या प्रेमाला आणि जिवंतपणी आई-वडिलांना मरणोप्राय यातना देऊन मेल्यानंतर त्यांचा आत्मा शांत करण्यासाठी धडपडणाºया त्यांच्या स्वार्थी मुलांना?

या सर्वांची आठवण होण्यामागचे कारण म्हणजे अक्षय्य तृतीया, हा दिवसही खास पितरांसाठीच असतो. त्यांचे स्मरण करण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठीच असतो. पण, मेलेल्यांचे स्मरण करून त्यांचे आशीर्वाद हवे असतील तर घरातील वृद्ध, जिवंत आई-वडिलांची सेवा करायला हवी. निदान त्यांचे मन दुखावले जाणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. त्यांना काय हवे, काय नको, याकडे किमान लक्ष द्यायला हवे, एवढे केले तरी त्यांचे आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळतील. तुमचे अनुकरण तुमची लहान मुले करतील आणि त्यामुळे त्यांच्यावर नकळतपणे जे संस्कार होतील त्यातून तुमचा वृद्धापकाळही सुखाचा होईल. म्हणूनच आजच्या अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पितरांचे स्मरण करण्यासोबतच जिवंत वृद्ध माता-पित्यांची प्रेमाने काळजी घेण्यास सुरुवात करू या आणि त्यांच्या आशीवार्दाने जीवनातील अक्षय्य आनंद, सुख-समृद्धीच्या दिशेने वाटचाल करुया ! 

- गौरीशंकर कंटीकर महास्वामी, शेळगी

Web Title: There is nothing wrong with worshiping the ancestors!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.