Satara: मान्सूनपूर्वने झोडपले; झाडे पडली, पत्रे उडाले; अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित

By नितीन काळेल | Published: May 29, 2023 10:44 PM2023-05-29T22:44:27+5:302023-05-29T22:46:42+5:30

Satara: सातारा जिल्ह्यातील वातावरणात बदल झाला असून, सोमवारी तर अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाने दणका दिला. त्याचबरोबर गारपीटही झाली तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे पडून वाहतूक विस्कळीत झाली.

Satara: Pre-monsoon battered; Trees fell, leaves flew; Electricity supply to many villages interrupted | Satara: मान्सूनपूर्वने झोडपले; झाडे पडली, पत्रे उडाले; अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित

Satara: मान्सूनपूर्वने झोडपले; झाडे पडली, पत्रे उडाले; अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित

googlenewsNext

- नितीन काळेल 
सातारा : जिल्ह्यातील वातावरणात बदल झाला असून, सोमवारी तर अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाने दणका दिला. त्याचबरोबर गारपीटही झाली तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे पडून वाहतूक विस्कळीत झाली. काही ठिकाणी घरावरील पत्रेही उडून गेले. तसेच अनेक गावातील वीजवाहिन्या तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. सातारा शहरात हलक्या सरी पडल्यामुळे गारवा निर्माण झाला.

जिल्ह्यात मे महिन्यात कडाक्याचे ऊन पडले. यामुळे मान्सूनचा पाऊस कधी सुरू होतो, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. असे असतानाच दोन दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणात बदल झाला आहे. थंडगार वारे वाहत असून, मान्सूनपूर्व पाऊसही हजेरी लावत आहे. सोमवारीही दुपारनंतर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. याचवेळी जोरदार वारे वाहत असल्याने नुकसानही झाले.

सातारा शहरात सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास ढगांच्या गडगडाटात पावसाला सुरुवात झाली. काहीवेळ पावसाच्या सरी कोसळल्या. मोठ्या पावसाने साताऱ्याला हुलकावणी दिली असली तरी वातावरणात गारवा निर्माण झाला. त्यामुळे सातारकरांची उकाड्यापासून काहीअंशी सुटका झाली आहे. तर वाई, पाटण आणि महाबळेश्वर तालुक्यालाही पावसाने झोडपले. महाबळेश्वरमध्ये चार वाजल्यापासून मुसळधार पाऊस पडत होता. याचवेळी मोठमोठ्या गारा पडत होत्या. तसेच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही भागात घरावरील पत्रेही उडून गेले. पाटण शहरासह परिसराला पावसाने झोडपले. यावेळी गारपीटही झाली. यामुळे पाटणच्या आठवडी बाजारात धांदल उडाली. तसेच पावसामुळे वीटभट्टी व्यावसायिकांचे नुकसान झाले. आडदेव येथे घराचे छप्पर उडून गेले आहे तर वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता.

शेतात पाणी शिरून भाज्यांचे नुकसान 
वाई शहरासह तालुक्याच्या पश्चिम भागातही सोमवारी जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतात पाणी शिरले. यामुळे पिकांसह पालेभाज्यांचे नुकसान झाले. तर अभेपुरी, वडाचीवाडी, गाढवेवाडी, मांढरेवाडी, वेलंग, असरे परिसरात जोरदार वाऱ्यामुळे झाडे पडली. वाई-जांभळी रस्त्यावर अनेक ठिकाणी झाडे पडल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला तर काही ठिकाणी घरावरील छप्पर उडल्याने नागरिकांचा निवारा गेला आहे. पाऊस आणि वाऱ्यामुळे पश्चिम भागातील वीज पुरवठा खंडित झाल्याने लोकांना अंधारात राहण्याची वेळ आली.

Web Title: Satara: Pre-monsoon battered; Trees fell, leaves flew; Electricity supply to many villages interrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.