महाराष्ट्र कर्नाटक राज्यपाल यांच्या बैठकीतील तपशील जाहीर करा; काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची मागणी

By विश्वास पाटील | Published: December 7, 2022 09:48 PM2022-12-07T21:48:08+5:302022-12-07T21:49:08+5:30

आगामी विधानसभा निवडणुकीत कन्नड भाषिक मतांवर डोळा ठेऊन कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई  हे मराठी भाषिकांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

congress mla satej patil demand announce details of maharashtra karnataka governor meeting | महाराष्ट्र कर्नाटक राज्यपाल यांच्या बैठकीतील तपशील जाहीर करा; काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची मागणी

महाराष्ट्र कर्नाटक राज्यपाल यांच्या बैठकीतील तपशील जाहीर करा; काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची मागणी

googlenewsNext

विश्वास पाटील, कोल्हापूर: सीमा भागातील मराठी भाषिकांवर कर्नाटककडून अन्याय सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ४ नोव्हेंबर रोजी कोल्हापूरात महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या राज्यपालांच्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली होती ? याचे  तपशील जाहीर करावेत अशी मागणी काँग्रेसचे आमदार सतेज  पाटील यांनी बुधवारी पत्रकाद्वारे केली. आगामी विधानसभा निवडणुकीत कन्नड भाषिक मतांवर डोळा ठेऊन कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई  हे मराठी भाषिकांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

पत्रकात म्हटले आहे की, ४ नोव्हेंबर २०२२ रोजी इतिहासात कधी झाली नाही, अशी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या दोन्ही राज्यपालांची बैठक कोल्हापूरात झाली . त्याचा सविस्तर वृत्तांत केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला असेलच. तसेच तो वृत्तांत दोन्ही राज्य सरकारांकडेही नक्की पाठविला असणार आहे.  या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली?  याची माहिती जनतेला कळणे गरजेचे आहे . एकीकडे अशी बैठक होते आणि दुसरीकडे मात्र मराठी भाषिकांची मुस्कटदाबी केली जाते, यामागे  नेमके गौडबंगाल काय आहे?   त्यामुळे दोन्ही राज्यपालांच्या बैठकीतील चर्चेची माहिती  जनतेसमोर यावी .

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई  हे मराठी भाषिकांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये  करत आहेत. कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  बेळगांव, कारवार, बिदर या भागातील सुमारे २५ विधानसभा मतदारसंघातील कन्नड भाषिक मतांवर डोळा ठेवून मुद्दामहून ते अशी वक्तव्ये करत आहेत. ते सोलापुरात येऊन गेले पण त्या ठिकाणी कर्नाटक भवन बद्दल फार काही बोलले नाहीत पण कोल्हापुरात कार्यक्रमाला आले असता कोल्हापूरमध्ये कर्नाटक भवन बांधणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. यातून त्यांना नेमका काय संदेश द्यायचा आहे, हे लोकांना नक्की कळले आहे. 

सौंदती यात्रेला गेलेल्या भक्तांची सुरक्षा ठेवा 

दरवर्षी प्रमाणे  कर्नाटकातील सौंदत्ती यात्रेला कोल्हापुरातील लाखो भाविक गेले आहेत. सीमा वादाच्या सध्याच्या या तणावाच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर सौंदत्ती डोंगरावर गेलेल्या तसेच यात्रेला जाणार आहेत ,अशा कोल्हापुरातील रेणुका भक्तांची  योग्य ती सुरक्षा घेण्याबाबत संबंधितांना निर्देश द्यावेत ,अशी मागणी करणारे पत्र आमदार पाटील यांनी बेळगावच्या जिल्हा पोलीस प्रमुखांना पाठविले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: congress mla satej patil demand announce details of maharashtra karnataka governor meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.