जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणूक २१ सप्टेंबरला

By Admin | Updated: August 27, 2014 23:52 IST2014-08-27T23:52:07+5:302014-08-27T23:52:07+5:30

विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीतच पंचायत समिती व जिल्हा परिषदेत खांदेपालट होणार आहे. पंचायत समिती सभापतीच्या आरक्षणाची सोडत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.

Zilla Parishad presidential election on September 21 | जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणूक २१ सप्टेंबरला

जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणूक २१ सप्टेंबरला

यवतमाळ : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीतच पंचायत समिती व जिल्हा परिषदेत खांदेपालट होणार आहे. पंचायत समिती सभापतीच्या आरक्षणाची सोडत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. सभापतीची निवडणूक १४ सप्टेंबरला होवू घातली आहे. तर जिल्हा परिषद अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव असून त्याची निवडणूक २१ सप्टेंबरला होणार आहे.
पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत सभापती, अध्यक्षाची निवडणूक जाहीर झाल्याने विधानसभेच्या रणधुमाळीतच स्थानिक पातळीवरही राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांची नाराजी नको म्हणून या निवडणुका लांबणीवर टाकण्याच्याही हालचाली सुरू आहे. मात्र असा प्रयत्न महापौर आणि नगराध्यक्ष यांच्या निवडणुका लांबवित असताना फसला होता. त्यामुळे या वेळेस राज्य शासनाकडून कोणता पवित्रा घेतला जातो याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान २६ आॅगस्ट रोजी जिल्हा प्रशासनाला जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष तसेच पंचायत समिती सभापती आणि उपसभापती यांचा निवडणूक कार्यक्रम देण्यात आला आहे. पंचायत समितीत १४ सप्टेंबरला आणि जिल्हा परिषदेत २१ सप्टेंबरला निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी विधानसभेचीही निवडणूक आचारसंहिता जाहीर होणार आहे. आताच विधानसभेच्या उमेदवारीवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षात अंतर्गत हालचाली वाढल्या आहे. अशातच जिल्हा परिषद, पंचायत समितीत होणारा खांदेपालट ही स्थानिक नेतेमंडळींची कसोटी ठरणार आहे. कोणाला डावलायचे आणि कोणाला निवडायचे हा यक्षप्रश्न त्यांच्यापुढे राहणार आहे. काही आठवड्यातच निवडणूक असल्याने नाराजी ओढवणेही नेत्यांना परवडण्यासारखे नाही. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापतांना राष्ट्रवादीने शिवसेना आणि भाजप यांना सोबत घेवून सत्ता स्थापन केली होती. आता काँग्रेस, राष्ट्रवादी राज्यातील निवडणुका आघाडीत राहूनच लढणार आहे. तत्पूर्वी जिल्हा परिषदेत काँग्रेस व राष्ट्रवादीला एकत्र आल्याशिवाय पर्याय उरणार नाही. जिल्हा परिषद अध्यक्षाचे पद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव आहे. काँग्रेसकडे बाभूळगाव तालुक्यातील पहूर सर्कलच्या अर्चना कोडापे आणि फाळेगाव-घारफळ सर्कलच्या योगीता कोडापे या दोन महिला आहेत. राष्ट्रवादीकडे पुसद तालुक्यातील काकडदाती सर्कलच्या डॉ.आरती फुफाटे या एकमेव महिला आहे. त्यामुळे संख्याबळाच्या आधारे अध्यक्ष निवडायचा झाल्यास काँग्रेसचे संख्याबळ जिल्हा परिषदेत सर्वाधिक आहे. निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत स्थानिक पातळीवरही मोठे बेबनाव निर्माण झाले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Zilla Parishad presidential election on September 21

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.