जिल्हा परिषदेत सात कोटींच्या कामांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 05:00 AM2020-07-07T05:00:00+5:302020-07-07T05:00:31+5:30

सभेत बांधकाम विभागाच्या सात कोटी १७ लाखांच्या विविध कामांना मंजुरी देण्यात आली. या निधीतून ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. सर्व सदस्यांच्या मतदारसंघात समान निधी देणार असल्याचे बांधकाम सभापती राम देवसरकर यांनी सांगितले.

Zilla Parishad approves works worth Rs 7 crore | जिल्हा परिषदेत सात कोटींच्या कामांना मंजुरी

जिल्हा परिषदेत सात कोटींच्या कामांना मंजुरी

Next
ठळक मुद्देसर्वसाधारण सभा : ऑनलाईनमुळे गोंधळाचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : तब्बल तीन महिन्यानंतर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी पार पडली. या ऑनलाईन सभेत सात कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली. मात्र अनेक सदस्यांनी या सभेत सहभाग घेता आला नसल्याबद्दल संताप व्यक्त केला.
अध्यक्ष कालिंदा पवार यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या सभागृहात सोमवारी दुपारी ऑनलाईन पद्धतीने सभा सुरू झाली. यावेळी सर्व पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. सभागृहात मोठा स्क्रिन लावण्यात आला होता. लॉकडाऊनमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी एकत्रित येण्यास बंदी घातल्याने पहिल्यांदाच ही सभा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. त्यात जिल्हा परिषद सदस्य आपापल्या पंचायत समितीतून ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले. अध्यक्षांनी पंचायत समितीनिहाय सदस्यांना बोलण्याची संधी दिली. मात्र मधातच माजी उपाध्यक्षांनी बराच काळ विविध प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
अध्यक्षांनी सर्व सदस्यांना प्रश्न मांडण्याची संधी मिळावी म्हणून पंचायत समितीनिहाय सदस्यांना बोलू द्यावे, अशी भूमिका मांडली. त्याला सदस्यांनीही पाठिंबा दिला. त्यानुसार काही पंचायत समितींमधून सदस्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. मात्र मधातच माजी उपाध्यक्ष बोलू लागल्याने काही सदस्यांनी संताप व्यक्त केला.
अनेक सदस्यांना बोलण्याची संधीच मिळाली नाही. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. याशिवाय ऑनलाईन सभा असल्याने वारंवार नेटचासुद्धा व्यत्यय येत होता. ओरडून बोलूनही सदस्यांचे बोलणे नीट समजत नव्हते. त्यामुळे सभेतच गोंधळाचे वातावरण होते. अखेर अध्यक्षांनी सर्व सदस्यांना या सभेतील प्रश्न नंतर लेखी स्वरूपात प्रशासनाकडे देण्याचे निर्देश दिले.
या सभेत बांधकाम विभागाच्या सात कोटी १७ लाखांच्या विविध कामांना मंजुरी देण्यात आली. या निधीतून ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. सर्व सदस्यांच्या मतदारसंघात समान निधी देणार असल्याचे बांधकाम सभापती राम देवसरकर यांनी सांगितले.

जिल्ह्यातील समस्या कायमच
सोमवारी झालेली सर्वसाधारण सभा ही गेल्यावेळी तहकूब झालेली सभा होती. त्यामुळे या सभेत गेल्या प्रोसिडींगवरील सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. त्यात रस्ते दुरुस्तीच्या कामाचाही समावेश आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील समस्या अद्यापही कायमच आहे. सदस्यांना ऑनलाईन पद्धतीमुळे अनेक समस्या उपस्थित करता आल्या नाही. आता नवीन सभेतच समस्या मार्गी लागण्याची शक्यता आहे. सभेला अध्यक्ष कालिंदा पवार, उपाध्यक्ष बाळासाहेब कामारकर, शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर मोहोड, समाजकल्याण सभापती विजय राठोड, बांधकाम व अर्थ सभापती राम देवसरकर, महिला व बालकल्याण सभापती जयश्री पोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा व विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

Web Title: Zilla Parishad approves works worth Rs 7 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.