झरी सर्वात छोटी नगरपंचायत
By Admin | Updated: September 6, 2015 02:27 IST2015-09-06T02:27:04+5:302015-09-06T02:27:04+5:30
शासनाने तालुकास्तरावर नगरपंचायतींची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. परिणामी झरीसारख्या अतिशय कमी लोकसंख्येच्या ठिकाणी ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाले.

झरी सर्वात छोटी नगरपंचायत
लोकसंख्या कमीच : तूर्तास केवळ ११०० मतदार, नवीन मतदार यादी तयार होणार
विठ्ठल पाईलवार झरी
शासनाने तालुकास्तरावर नगरपंचायतींची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. परिणामी झरीसारख्या अतिशय कमी लोकसंख्येच्या ठिकाणी ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाले. येत्या दोन महिन्यात आता निवडणुकही होणार आहे. जिल्ह्यातीलच नव्हे, तर झरी ही राज्य आणि देशातीलही सर्वात कमी मतदार संख्या असलेली नगरपंचायत ठरणार आहे.
झरी तालुक्याची सर्वात लहान तालुका म्हणून ओळख आहे. काँग्रेसचे तत्कालीन आमदार वामनराव कासावार यांच्या प्रयत्नाने २२ वर्षांपूर्वी १५ आॅगस्ट १९९२ रोजी झरी तालुक्याची निर्मिती झाली. त्यावेळी झरी तालुका कोणत्याच निकषात बसत नव्हता. मात्र कासावार यांनी त्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली. त्यामुळे अखेर हा झरी तालुका अस्तित्वात आला. त्यावेळी लगतच्या जामणी गावाला यात समाविष्ट करून झरीजामणी तालुका निर्माण झाला. तालुक्याची स्थापना झाली, तेव्हा या गावाची लोकसंख्या एक हजारांच्याही आतच होती, हे विशेष.
त्यावेळी आणि आजही मुकुटबन, पाटण ही मोठी आहेत. मात्र या गावांना डावलून कासावार यांनी झरी या अतिदुर्गम आणि आदिवासीबहुल गावाला तालुक्याचा दर्जा मिळवून दिला होता. मात्र झरीला साधी नगरपरिषदही नव्हती. आता झरी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्यात आले आहे. त्यामुळे गावाचा विकास, पाणी, रस्ते, स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागण्याचे संकेत प्राप्त होत आहे.
सध्याच्या झरीजामणी तालुक्यात मुकुटबन ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. तालुक्यात ही ग्रामपंचायत राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण मानली जाते. तेथील लोकसंख्या सात हजार २९० असून एकूण चार हजार ७०९ मतदार आहे. त्यात तब्बल दोन हजार २६८ महिला मतदार आहेत. तेथे पाच प्रभाग असून एकूण १५ सदस्य आहेत. मुकुटबन सर्वात मोठी ग्रामपंचायत असूनसुद्धा आता झरीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे या गावाचा कायापालट होण्याची शक्यता बळावली आहे.
झरीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यानंतर गेल्या २ आॅगस्टला येथील तहसील कार्यालयात आरक्षणाची सोडत काढण्यात आली. झरी व शिरोला या दोन गावांमिळून पूर्वी ग्रामपंचायत होती. आताही या दोन गावांमिळूनच नगरपंचायत बनली आहे. या नगरपंचायतीत एकूण १७ प्रभाग राहणार आहे. त्यात अनुसूचित जमातीची लोकसंख्या सर्वाधिक असल्याने या प्रवर्गासाठी सर्वाधिक जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. प्रभाग क्रमांक १, २, ५, १५ हे प्रभाग अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. सोबतच अनुसूचित जमाती महिलेसाठी प्रभाग क्रमांक ४, ७, ९, १०, ११ व १४ आरक्षित आहे. अनुसूचित जातीसाठी प्रभाग क्रमांक ३ राखीव आहे. प्रभाग क्रमांक ८, १२, १७ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी, तर प्रभाग क्रमांक १३ व १६ हे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव आहे.
झरी गावाची सध्याची लोकसंख्या जेमतेम एक हजार ५३५ असून शिरोला या गावाची लोकसंख्या केवळ २४० आहे. या दोन्ही गावांमिळून केवळ एक हजार ७७५ लोकसंख्या आहे. विशेष म्हणजे त्यात केवळ एक हजार ९२ मतदार आहेत. त्यात झरीचे ८६९, तर शिरोलाचे केवळ २२३ मतदार आहेत.
आता नगरपंचायतीसाठी निवडणूक होणार असल्याने नवीन मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. मात्र त्यातही फारशी वाढ होण्याची शक्यता कमीच आहे. कमी मतदार आणि १७ प्रभाग असल्याने येथे अत्यंत मनोरंजक स्थिती निर्माण झाली आहे.
विजयासाठी लागणार ३० ते ४० मते
झरीलगत काही गटग्रामपंचायती असल्याने त्यांना नगरपंचायतीत सामावून घेणे कठीण जात आहे. आता निवडणूक तारीख निश्चित झाली नसली, तरी अनेकांना सत्तेचे स्वप्न पडू लागले आहे. मोर्चेबांधणी व कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. भावी उमेदवारांना निवडून येणे सोपे वाटू लागले आहे. कमी मतदार असलेल्या प्रभागात दोन-तीन उमेदवार रिंगणात राहिल्यास, केवळ ३0 ते ३0 मते मिळवूनही विजय प्राप्त करणे शक्य झाले आहे. प्रभाग जास्त असल्याने अनेकांना लाभ घेता येईल व त्यांना सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळेल. त्यामुळे गावाचा विकास, पाणी, रस्ते, स्वच्छतेचा प्रश्न सुटण्याची शक्यता बळावली आहे.
एका प्रभागात तर केवळ ८९ मतदार
झरी नगरपंचायतीत प्रभाग क्रमांक पाचमध्ये सर्वाधिक १२८ मतदार आहे, तर प्रभाग क्रमांक आठमध्ये सर्वात कमी केवळ ८९ मतदार आहे. नवीन मतदार यादीतही त्यात मोठी भर पडण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराला निवडून येण्यासाठी फार फसरत करावी लागणार नाही. मात्र मतदारांची प्रचंड ओढाताण होण्याची शक्यता आहे, असे जाणकारांचे मत आहे. अनुसूचित जमातीची टक्केवारी ६४.७३ आहे. लगतच्या गावांतील काही गावपुढाऱ्यांनी या नगरपंचायतीत आपली गावे समाविष्ट करण्यासाठी धडपड केली होती. मात्र ती वांझोटीच ठरली.