आईच्या अस्थी शिरवताना तरुण मुलास जलसमाधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 22:26 IST2018-01-27T22:25:51+5:302018-01-27T22:26:12+5:30
आईच्या अस्थी शिरविताना पाण्यात बुडून आसेगाव(देवी) येथील तरुण मुलाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.

आईच्या अस्थी शिरवताना तरुण मुलास जलसमाधी
आॅनलाईन लोकमत
आसेगाव(देवी) : आईच्या अस्थी शिरविताना पाण्यात बुडून आसेगाव(देवी) येथील तरुण मुलाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. कौंडण्यपूर येथे हा प्रकार घडला. श्याम वामनराव येऊतकर (२६) असे मृताचे नाव आहे.
श्यामची आई लीलाबाई यांचे १६ जानेवारी रोजी निधन झाले. शुक्रवारी त्यांचा दहावा दिवस करण्याचे निश्चित झाले. यासाठी अस्थी घेऊन शुक्रवारी आप्त मंडळी कौंडण्यपूर (ता.तिवसा, जि.अमरावती) येथे गेली. अस्थी विसर्जन करून सोबतच्या लोकांनी आंघोळीसाठी पाण्यात उडी घेतली. यात श्यामचाही समावेश होता. तो थोडा खोल पाण्यात गेला. त्याठिकाणी त्याचा पँट गजाला अडकला. बाहेर पडता येत नसल्याने त्याने मदतीसाठी धावा केला. मात्र खोल पाणी असल्याने मदत मिळाली नाही. एका नावचालकाने (डोंगा) पाण्यात उडी घेतली. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती.
पोलिसांची कारवाई पूर्ण होऊन त्याच्या पार्थिवावर अमरावती येथील शासकीय रुग्णालयात शवचिकित्सा करण्यात आली. रात्री ९.३० वाजता शोकाकूल वातावरणात श्यामवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या मागे उज्ज्वल, अमोल, रवी हे तीन भाऊ व मोठा आप्त परिवार आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली.