तरुणाने गळफास घेत जीवन संपवले; एकाच कुटुंबातील तिसऱ्या आत्महत्येने हातगाव हादरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2022 18:37 IST2022-04-13T18:32:55+5:302022-04-13T18:37:34+5:30
दिनेशची पत्नी ममता मुलांना घेऊन माहेरी गेली होती. घरी कोणी नसल्याची संधी पाहून त्याने दोराने गळफास लावून आत्महत्या केली.

तरुणाने गळफास घेत जीवन संपवले; एकाच कुटुंबातील तिसऱ्या आत्महत्येने हातगाव हादरले
अकोला बाजार (यवतमाळ) : एकाच कुटुंबात झालेल्या तिसऱ्या आत्महत्येने हातगाव हादरले आहे. मंगळवारी या कुटुंबातील ३६ वर्षीय व्यक्तीने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. दिनेश ज्ञानेश्वर मेश्राम असे मृताचे नाव आहे. यापूर्वी त्याची आई व लहान भावाने मृत्यूला कवटाळले होते.
या कुटुंबातील व्यक्तींच्या आत्महत्येची कारणे वेगवेगळी असली तरी चिंता निर्माण करणारी आहे. दिनेशची आई आशाबाई यांनी जाळून घेत आत्महत्या केली होती. तेथून वर्षभरानंतर लहान भाऊ नीतेशने विषारी औषध घेऊन जीवन संपविले. आता दिनेशने गळफास लावून आत्महत्या केली.
दिनेशची पत्नी ममता मुलांना घेऊन माहेरी गेली होती. घरी कोणी नसल्याची संधी पाहून त्याने दोराने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना संध्याकाळी उघडकीस आली. वडगाव जंगल पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. दिनेशच्या मागे वडील, पत्नी ममता, मुलगा तेजस, मुलगी तन्वी, भाऊ व मोठा आप्त परिवार आहे.