पांढरकवडा येथे तरुण दाम्पत्याची आत्महत्या
By Admin | Updated: May 28, 2014 00:02 IST2014-05-28T00:02:54+5:302014-05-28T00:02:54+5:30
अवघ्या दीड वर्षापूर्वी लग्न झालेल्या दाम्पत्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ही घटना येथील गांधी वार्डात सोमवारी रात्री १0 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने शहरात खळबळ उडाली

पांढरकवडा येथे तरुण दाम्पत्याची आत्महत्या
पांढरकवडा : अवघ्या दीड वर्षापूर्वी लग्न झालेल्या दाम्पत्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ही घटना येथील गांधी वार्डात सोमवारी रात्री १0 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही. रूपेश शंकरराव मुप्पीडवार (३२) आणि पल्लवी रुपेश मुप्पीडवार (२३) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. या दोघांनीही घरातील दोन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. रूपेशचा विवाह ३0 नोव्हेंबर २0१२ रोजी मूल तालुक्यातील भेंडाळा येथील पल्लवीसोबत झाला होता. गांधी वार्डातील दोन मळ्याच्या घरात सर्वात वरच्या माळ्यावर ते राहत होते. सोमवारी सकाळपासून दोघेही घरी होते. नेहमी खालच्या माळ्यावरील भावाकडे येणारा रुपेश सोमवारी एकदाही खाली आला नाही. त्यामुळे त्याचा मोठा भाऊ नरेश रात्री १0 वाजताच्या सुमारास वरच्या माळ्यावरील रुपेशच्या घरी गेला. आवाज देऊनही दार उघडले नाही. शेवटी मित्रांच्या सहाय्याने दार तोडले. तेव्हा आतील दृश्य पाहून ते घाबरलेच. समोरच्या खोलीत असलेल्या स्वयंपाक घरात पंख्याला साडी बांधून पल्लवीने गळफास लावला होता. तर बेडरुममध्ये रुपेशने पंख्याला दुपट्टा बांधून आत्महत्या केल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती पसरताच बघ्यांनी एकच गर्दी केली. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. या दोघांनी आत्महत्या नेमक्या कोणत्या कारणाने केली हे मात्र कळू शकले नाही. पांढरकवडा पोलीस अधिक तपास करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)