शतक पार करणारे यवतमाळचे मातृचर्च

By Admin | Updated: December 25, 2016 02:36 IST2016-12-25T02:36:21+5:302016-12-25T02:36:21+5:30

यवतमाळचे मातृचर्च म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फ्री मेथॉडिस्ट चर्चने शतक पूर्ण केले आहे.

Yavatmal's mother-father passed the century | शतक पार करणारे यवतमाळचे मातृचर्च

शतक पार करणारे यवतमाळचे मातृचर्च

रुपेश उत्तरवार यवतमाळ
यवतमाळचे मातृचर्च म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फ्री मेथॉडिस्ट चर्चने शतक पूर्ण केले आहे. या शंभर वर्षात मातृचर्चने अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. या दीर्घ कालखंडात आरोग्य आणि शिक्षणावर सर्वाधिक भर देण्यात आला. इतकेच नव्हेतर कृषी क्षेत्रासाठीही चर्चचे योगदान आहे. कापूस उत्पादक प्रांतात सोयाबीनवर रिसर्च करण्यात पाळेकऱ्यांना यश आले. नवे नांगरणी यंत्र बनविण्यात आले. यवतमाळच्या चर्चच्या कार्याने राष्ट्रपिता महात्मा गांधीही भारावले होते. त्यांनी चर्चच्या पाळेकऱ्यांना त्यांचा प्रिय चरखा भेट दिला. आज हा चरखा इंग्लंडमध्ये आहे. चर्चवर बसविण्यात आलेल्या बेलचा आवाज १० किमी अंतरापर्यंत जात होता. ही ऐतिहासिक घंटाही आज चर्चवर शाबूत आहे.
फ्री मेथॉडिस्ट चर्चचा प्रारंभ अमेरिकेतील मिस सिला फेरीस यांच्या कार्यातून झाला. २५ जुलै १८९२ रोजी त्यांनी यवतमाळात पहिल्यांदा पाऊल टाकले. यांच्या कार्याला प्रथम विरोध झाला. नंतर हा विरोध मावळला. त्यांना जे घर भाड्याने मिळाले ते अतिशय पडके आणि सापांचे वास्तव्य असणारे होते. या घराच्या मालकीणीचा सर्पदंशाने मृत्यू झाला. त्यावेळी ब्रिटिश असिस्टंट कमिश्नर प्राईस यांनी सिला फेरीस यांना बंगला विकत घेण्याच्या कामात मदत केली. १८९३ ला हा बंगला विकत घेण्यात आला. त्याच्या आजूबाजूची पाच एकर जागा विकत घेण्यात आली.
मिस फेरीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बैलगाडीतून गावांना भेटी दिल्या. प्रभू येशूचे कार्य जनमानसात पोहचविण्यास सुरूवात केली. १८९८ ला मिस फेरिसचे लग्न रेव्ह मॅकमेरीशी झाले. १८९९ ला कॉलराची साथ आली. यावेळी अनेक अनाथ मुलांना मिश्नरींनी मातृत्वाची छाया दिली. यावेळी गुजरातमधील अनाथ बालकांना मदतीचा हात देण्यात आला. यावेळी नारायणराव गद्रे यांच्याकडून मिश्नरींनी चर्चकरिता जागा विकत घेतली. रेव्हरन्ट कॅसबर्ग यांच्या देखरेखीत १९१६ मध्ये चर्च पूर्ण झाले. या चर्चमध्ये बनविण्यात आलेले बेंचेस अनाथ मुलांनी बनविले आहेत. या ठिकाणचे पहिले प्रवचन रेव्हरंट ई एफ वार्ड यांनी ४ फेब्रुवारी १९१६ मध्ये केले. पुढील सात वर्षात दारव्हा, उमरी, वणी व इतर ठिकाणी मिशनचे काम सुरू झाले. त्या ठिकाणी फ्री मेथॉडीस्ट चर्चची स्थापना झाली. यावतमाळच्या चर्चला मातृचर्च नाव प्राप्त झाले.
या मिशन काळात डॉ.एफ.ए.फफर यांनी १९२० ते १९५३ मध्ये यवतमाळात बांबूचे प्रथम नांगरणी यंत्र तयार केले. त्यांच्या या कार्याने प्रभावीत होऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी येरवाडा तुरूंगात वापरलेला चरखा डॉ. फफर यांना भेट दिला. तर डॉ. आर.एन. डेव्हिम यांनी १९१९ ते १९६४ या कालखंडात सोयाबीन या अमेरिकन वाणावर संशोधन केले. भारतातही हे उत्पादन शक्य असल्याचा प्रयोग यशस्वी केला. यामुळे भारतातील सोयाबीनचे जनक म्हणून गॅझेटमध्ये नोंद घेण्यात आली. महात्मा गांधींनी भेट दिलेला चरखा सध्या इंग्लंडमध्ये आहे. या चरख्याचा ५ नोव्हेंबर २०१३ रोजी एक लाख १० हजार पौंडमध्ये इंग्लंडमध्ये लिलाव झाला. चर्चवर अष्टधातूची बेल बसविण्यात आली. त्या बेलचा आवाज ऐकून चर्चमध्ये जायचे. पूर्वी ही बेल अग्रभागी होती. १९४५-४६ मध्ये ती बेल खाली उतरविण्यात आली. आजही ती तिथेच आहे.

Web Title: Yavatmal's mother-father passed the century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.