यूपीएससीतील यशात आई-वडिलांच्या कष्टाचा मोठा वाटा- गिरीश बदोले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 21:57 IST2018-04-27T21:55:22+5:302018-04-27T21:57:17+5:30
उस्मानाबादचा गिरीश बदोले राज्यात पहिला

यूपीएससीतील यशात आई-वडिलांच्या कष्टाचा मोठा वाटा- गिरीश बदोले
उस्मानाबाद : कष्टकरी आई-वडिलांच्या प्रेरणेमुळेच यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवल्याची भावना गिरीश बदोलेनं व्यक्त केली. गिरीश बदोले यूपीएससी परीक्षेत राज्यात पहिला आहे. गिरीशच्या या नेत्रदीपक यशामुळे दोन एकर कोरडवाहू शेती असलेल्या बदोले कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.
लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत उस्मानाबाद जिल्ह्यातील कसगी गावचा गिरीश बदोले राज्यात पहिला आलाय. या उत्तुंग यशात आई-वडिलांचा मोठा वाटा असल्याची भावना गिरीशनं व्यक्त केली. कसगी गावात बदोले यांची कोरडवाहू शेतजमीन आहे. याशिवाय त्यांचं कुटुंब इतरांची जमीनही कसायला घेतं. 'अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही आई-वडिलांनी मोठं पाठबळ दिलं,' असं गिरीशनं सांगितलं.
यूपीएससी परीक्षेत यश मिळवण्यासाठी जितका अभ्यास महत्वाचा असतो, तितकंच वृत्तपत्रांचं वाचनही महत्वाचं असतं. माझ्या यशात वृत्तपत्रांचाही मोठा वाटा आहे, असं गिरीशनं म्हटलं. गिरीशचं प्राथमिक, माध्यमिक शिक्षण तुळजापूरच्या सैनिकी विद्यालयातून झालं. त्यानंतर लातूरच्या दयानंद महाविद्यालयातून त्यानं बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. पुढे मुंबईच्या जे.जे. मधून एमबीबीएसची पदवी मिळविली. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं, तरी प्रशासकीय अधिकारी होण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती, असं गिरीशनं 'लोकमत'शी बोलताना सांगितलं. अधिकारी होण्याची इच्छा आणि आई, वडिलांचं भक्कम पाठबळ मिळाल्यानंतर गिरीशनं २०१४ पासून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणं सुरू केलं. अखेर चौथ्या प्रयत्नात त्याला घवघवीत यश मिळालं. या यशाबद्दल बोलताना तो म्हणाला, 'दिवसातील १२ ते १५ तास अभ्यासाला द्यायचो. एकच लक्ष्य नजरेसमोर ठेवून पुण्यात तयारी सुरू केली. सुरुवातीला अपयश आलं. पण खचलो नाही. पुन्हा जोमानं प्रयत्न केले,' असं गिरीशनं सांगितलं.