यवतमाळच्या दादागिरीची क्रेझ क्षणभंगूर

By Admin | Updated: October 16, 2016 00:48 IST2016-10-16T00:48:24+5:302016-10-16T00:48:24+5:30

किशोरवयीन मुलांमध्ये गुन्हेगारी विश्वाविषयी प्रचंड उत्सूकता असते. हा थ्रिल आपणही अनुभवावा अशी सुप्त ईच्छा प्रत्येकाच्या मनात काही काळ घोंगावते.

Yavatmal's fleet of skirmishes flew away | यवतमाळच्या दादागिरीची क्रेझ क्षणभंगूर

यवतमाळच्या दादागिरीची क्रेझ क्षणभंगूर

प्रवीणनेही मोजली प्राणांकित किंमत
किशोरवयीन मुलांमध्ये गुन्हेगारी विश्वाविषयी प्रचंड उत्सूकता असते. हा थ्रिल आपणही अनुभवावा अशी सुप्त ईच्छा प्रत्येकाच्या मनात काही काळ घोंगावते. यातूनच गँगस्टरवर आधारीत सिनेमा असो किंवा गॉसिप याची क्रेझ तरुणाईत पाहायला मिळते. यवतमाळात दादा म्हणून मिरविणाऱ्या प्रवीण दिवटेविषयीही अशीच क्रेझ निर्माण झाली. यातून अनेकांनी गुन्हेगारी जगात प्रवेशाचाही प्रयत्न केला. वरवर झगमगाटीच्या या वाटेवर फार मोठी किंमत मोजावी लागते, याचे भान तरुणाईत दिसत नाही. मात्र प्रवीण दिवटेचा त्याच्याच घरात झालेला खून हा भाईगिरीचे वेड असणाऱ्या किशोरवयीनांसाठी सूचक इशारा आहे.
जीवनात यशस्वी होण्यासाठी शॉर्टकटचा सर्वच जण शोध घेत असतात. अनेकांना गुन्हेगारीचा मार्ग अलगद भावतो. विशेष करून तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्यांचे प्रमाण सर्वाधिक असते. यातूनच यवतमाळात प्राणघातक हल्ला, खून या घटना अगदी सहज घडतात. लोकसंख्येच्या तुलनेत या गुन्ह्यांचे प्रमाण राज्यात सर्वाधिक आहे. यामागे येथील युवावर्गात गुन्हेगारी जगताविषयी असलेले आकर्षण दिसून येते. प्रवीण दिवटे याचा उदय आणि अस्त अनुभवणाऱ्यांनी गुन्हेगारी जगतातील वास्तव युवापिढीपुढे मांडणे आवश्यक आहे. दिवटे याच्या वाटचालीची केवळ एकच बाजू समाजापुढे आली आहे. इलेक्ट्रीकच्या दुकानात नोकर म्हणून काम करणे, भाजीमंडीत हमाली करणे, शहरात आॅटारिक्षा चालविणे ते विदर्भातल्या गुन्हेगारी क्षेत्रातील महत्त्वाचा दुवा आणि यवतमाळचा दादा ही वाटचाल किती खडतर होती, त्यासाठी किती मोठी किंमत मोजावी लागली. याची पुसटशीही जाणीव नसल्याने अनेकांच्या हातून असे गंभीर गुन्हे होतात. कायद्याचे उल्लंघन केल्यानंतर शिक्षा होतेच. पोलिसांचा मार, कोठडीतील यातना या सर्वांतून प्रवीण दिवटेचाही प्रवास झालाच. सतत भीती आणि अस्थिर वातावरणातच दादागिरीची वाटचाल सुरू असते. अखेर इतर सर्व गुंडांप्रमाणेच प्रवीणही अल्पायुषी ठरलाच. त्याने उभ्या केलेल्या साम्राज्याचा उपभोग कधी घेताच आला नाही. अर्धेअधिक आयुष्य कारागृहातच काढावे लागले. आरोपातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतरही बाह्य जगतात वावरताना कायम आत्मसंरक्षणाची चिंता सतावत होती. या अस्थिर गुन्हेगारी जगतापासून त्यालाही ‘टर्न’ हवा होता. त्यामुळेच त्याने राजकारणाच्या माध्यमातून स्थैर्य मिळविण्यासाठी धडपड सुरू केली होती. अखेर त्याला यात यश मिळालेच नाही. गुन्हेगारी वर्तुळात स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या आणि प्रवीण दिवटेलाच ‘आयडॉल’ मानणाऱ्यांनी त्याचा ‘गेम’ केला. प्रतिशोधाचा अग्नी आणि भाई बनण्याचे स्वप्न ठेवणाऱ्या किशोरवयीनांनी प्रवीणला त्याच्याच घरात यमसदनी धाडले. ही घटनाच गुन्हेगारी क्षेत्रात शिरकाव करणाऱ्यांसाठी सर्वात मोठा धडा ठरणारी आहे.
दिवटे हा विरोधी पक्षाचा तर त्याच्या मारेकऱ्यांची सत्ताधारी पक्षाशी असलेली सलगी सर्वश्रूत आहे. दिवटेच्या खूनात अटकेत असलेल्या १६ आरोपींमध्ये नवोदितांचाच भरणा अधिक आहे. त्यातील प्रत्येक गुन्हेगाराचे स्वतंत्र अवलोकन केल्यास गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींचे पैलू उलगडतात. गुन्हेगारीचा वाढता आलेख रोखण्याचा प्रभावी मार्ग यातून सापडू शकतो. यापूर्वी शहरात दादा म्हणून उदयास आलेल्यांचासुद्धा याच पद्धतीने अस्त झाला. ही मालिका खंडित करण्याचा आणि कोणी दादा होऊच नये या दृष्टीने प्रयत्नांची गरज आहे.

गुन्हेगारीला राजकारणातून आश्रय
प्रवीणच्या खूनात अटकेत असलेल्या नवोदित गुन्हेगारांमध्येसुद्धा आता आपण यवतमाळातील भाई बनलो, असा भाव निर्माण झाला आहे. यातील काहींनी ‘अब हमे भी पैसा मिलेगा’ या शब्दात आपली सुप्त ईच्छा बोलून दाखविली आहे. खून केल्यानंतर खंडणीच्या रूपाने पैसा मिळतो आणि या पैशातून व्यवस्था विकत घेता येते, असा समज गुन्हेगारी जगतातील नवोदितांमध्ये आहे, हे यातून स्पष्ट होते. अशा नवोदितांचा वापर राजकीय पुढारी, माफिया यांच्याकडून केला जातो. गुन्हेगारीला राजकारणातूनच आश्रय दिला जातो.

Web Title: Yavatmal's fleet of skirmishes flew away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.