यवतमाळ ‘एक्साईज’च्या कर्तव्यदक्षतेची लक्तरे वेशीवर

By Admin | Updated: April 22, 2016 04:15 IST2016-04-22T04:15:49+5:302016-04-22T04:15:49+5:30

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नागपूर येथील पथकाने थेट ३०० किलोमीटर दूर पुसदमध्ये येऊन बनावट दारू

Yavatmal's excuse of excise duty is on the gates | यवतमाळ ‘एक्साईज’च्या कर्तव्यदक्षतेची लक्तरे वेशीवर

यवतमाळ ‘एक्साईज’च्या कर्तव्यदक्षतेची लक्तरे वेशीवर

यवतमाळ : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नागपूर येथील पथकाने थेट ३०० किलोमीटर दूर पुसदमध्ये येऊन बनावट दारू पकडली. या कारवाईने यवतमाळ एक्साईजच्या कर्तव्यदक्षतेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदीची मागणी आहे. गावागावातील महिलांनी रस्त्यावर येऊन या दारूचा विरोध चालविला. त्यानंतरही अनेक गावात आजही दारूच्या भट्ट्या सर्रास पेटत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातून लगतच्या चंद्रपूर व वर्धा या दारू बंदी असलेल्या जिल्ह्यात विविध मार्गांनी आणि नवनवीन क्लुपत्या वापरुन दारूचा पुरवठा केला जात आहे. त्यासाठी अनेकदा राजकीय नेत्यांच्या नावाने चालणाऱ्या रुग्णवाहिकांचाही वापर केला जात असल्याची माहिती आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात दारूची ने-आण सुरू असताना एक्साईजला मात्र क्वचितच अशा कारवाईत यश मिळाले आहे. वास्तविक अवैध दारू पकडणे आणि वैधदारूची विक्री वाढवून शासनाच्या तिजोरीत भर घालण्याची जबाबदारी एक्साईजवर आहे. मात्र अवैध दारू पकडण्यात एक्साईजची यंत्रणा फेल ठरत असल्याचे दिसून येते. या अपयशामागे प्रत्येक वेळी एक्साईजकडून पुरेसे मनुष्यबळ नाही, वाहने नाहीत, ही ठेवणीतली कारणे पुढे केली जातात. आता तर एक्साईजच्या वरिष्ठांनीच परस्पर कारवाई करुन यवतमाळ एक्साईजच्या कर्तव्यदक्षतेची लक्तरे वेशीवर टांगली आहे.
एक्साईजच्या नागपूर येथील संचालक (अंमलबजावणी व दक्षता) बी.जी. शेखर व विभागीय उपायुक्त उषा वर्मा यांच्या कार्यालयातील यंत्रणेने थेट पुसदमध्ये येऊन बनावट दारूची विक्री पकडली. या कारवाईची यवतमाळ एक्साईजला कोणतीही खबरबात नव्हती. पुसदच्या वसंतनगरातील दिलीप जयस्वाल यांच्या घरावर छापा घालून सुमारे ३० हजारांची दारू जप्त केली. त्याला अटकही करण्यात आली. नामांकित कंपनीच्या बॉटलची झाकणे, बनावट दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले.
नागपूरच्या विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक प्रशांत गोतमारे, दुय्यम निरीक्षक अशोक कैकाडे, राहुल अंभोरे, अमोल जाधव, सुधीर मानकर, राजेश काष्टे, आशिष वाकोडे यांच्या पथकाने केलेल्या या कारवाईने लोकल एक्साईजची निष्क्रीयता उघड झाली आहे. नागपूर एक्साईजच्या या कारवाईने यवतमाळ विरुद्ध नागपूर असा वादही सुरू झाला आहे. आम्हाला कारवाईची खबर का दिली नाही, असा स्थानिक एक्साईजचा सवाल आहे. तर माहिती देण्याची आवश्यकता नसते, असे नागपूर एक्साईजने स्पष्ट केले आहे.
प्रस्तावित दारूबंदी रोखण्यासाठी लिकर लॉबीने प्रत्येक पेटीवर पाच ते दहा रुपये अतिरिक्त आकारुन मोठी रक्कम जमा केली. या रकमेतील ‘वाटेकरी’ एक्साईजमध्ये असण्याची शंका व्यक्त केली जात आहे.(कार्यालय प्रतिनिधी)

पुसदमधून मराठवाड्यात पुरवठा शॉप-शॉपीवर मेहेरबान
४पुसदमध्ये यापूर्वीही बनावट दारू कारखाने पकडण्यात आले होते. पुसद हे बनावट दारू निर्मितीचे प्रमुख केंद्र मानले जाते. तेथून लगतच्या वाशिम, मराठवाडा या भागात मोठ्या प्रमाणात बनावट दारुचा पुरवठा केला जातो. नागपूरच्या पथकाला ३०० किलोमीटर दूरवरील पुसदमधील बनावट दारूची खबर मिळू शकते तर यवतमाळ एक्साईजला का नाही हा कळीचा मुद्दा या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. अशा बनावट दारू निर्मितीला स्थानिक यंत्रणेचे पाठबळ तर नाही ना अशी शंकाही उपस्थित केली जात आहे.

४यवतमाळातील बार, ढाबे, शॉपी, वाईन शॉप येथे मोठ्या प्रमाणात नियमांना बगल देऊन दारू विक्री केली जाते. अनेक शॉपमध्ये व शॉपीमध्ये तेथेच पिण्याची व स्नॅक्सची छुपी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानंतरही त्या दुकानांवर एक्साईजकडून कारवाई होत नाही. नियोजित वेळेनंतरही ही दुकाने सुरू राहतात. मात्र एक्साईजची यंत्रणा बघ्याची भूमिका घेते.

विभागीय उपायुक्तांचे पथक असल्याने माहिती द्यायची की नाही हा त्यांचा निर्णय आहे. सहसा मदत हवी असेल तरच कळविले जाते. अन्यथा कारवाईची माहिती देणे बंधनकारक नाही.
- राहुल अंभोरे
दुय्यम निरीक्षक (विभागीय पथक), राज्य उत्पादन शुल्क नागपूर

नागपूर एक्साईजने पुसदमधील कारवाईपूर्वी किंवा किमान नंतर तरी यवतमाळ एक्साईजला माहिती देणे गरजेचे होते. मात्र ती दिली गेली नाही. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करण्यात आली आहे.
- पराग नवलकर
अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क यवतमाळ

Web Title: Yavatmal's excuse of excise duty is on the gates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.