यवतमाळ शहरात आज झाडू लागलाच नाही

By Admin | Updated: November 15, 2014 02:09 IST2014-11-15T02:09:55+5:302014-11-15T02:09:55+5:30

शहरातील स्वच्छतेची जबाबदारी नगर परिषदेने कंत्राटदारावर सोपविली आहे. २००२ पासून कंत्राटी सफाई कामगार शहराच्या आरोग्यसाठी अल्प वेतनात राबत आहेत.

Yavatmal was not able to sweep the city today | यवतमाळ शहरात आज झाडू लागलाच नाही

यवतमाळ शहरात आज झाडू लागलाच नाही

यवतमाळ : शहरातील स्वच्छतेची जबाबदारी नगर परिषदेने कंत्राटदारावर सोपविली आहे. २००२ पासून कंत्राटी सफाई कामगार शहराच्या आरोग्यसाठी अल्प वेतनात राबत आहेत. त्यांना असंघटीत कामगारांना मिळणाऱ्या कायदेशीर सवलती कधीच पुरविण्यात आल्या नाही. महिन्याला वेळेवर वेतनही दिले जात नाही. अखेर या जाचाला कंटाळून कंत्राटी कामगारांनी शुक्रवारी कामबंद आंदोलन पुकारले त्यामुळे शहराला झाडूच लागला नाही.
शहराच्या स्वच्छतेसाठी नगर परिषद वर्षाकाठी खासगी कंत्राटदाराला कंत्राट देते. नगर पालिकेने कंत्राटदाराशी करार करताना किमान वेतन आणि कामगारांसाठी असलेल्या शिफारसी प्रमाणे सोयी सुविधा देण्याची हमी कंत्राटदाराकडून घेतली आहे. प्रत्यक्षात मात्र कंत्राटी तत्वावर राबणाऱ्या २५० कामगारांची सातत्याने बोळवण केली जात आहे. या कामगारांना अल्पवेतन आणि भविष्य निर्वाह निधीबाबत कुठलीही हमी देण्यात आलेली नाही. आतापर्यंत चार कंत्राटदारांनी शहर सफाईचे कंत्राट घेतले. यापैकी एकाही कंत्राटदाराने कामगारांचा भविष्य निर्वाहनिधी कधीच जमा केला नाही. याची वारंवार सूचना नगर परिषद प्रशासनाला करूनही त्यांच्याकडून कुठलीच दखल घेतली जात नाही. तुम्ही ठेकेदाराचे कामगार आहात त्याच्याकडेच दाद मागा, पालिकेशी काहीही देणेघेणे नाही अशा शब्दात सुनावून या कामगारांना परत पाठविले जाते. सातत्याने होणाऱ्या अन्यायाविरोधात आज अखेर असंघटीत कामगारांनी आंदोलन पुकारले आहे. कंत्राटदाराने एक वर्षापासून वेतनातील वाढीव रक्कमही दिलेली नाही. ६०० रुपये प्रति महिना या प्रमाणे वाढीव वेतनाची रक्कम कामगारांना घ्यायची आहे. मात्र असंघटीत असलेल्या कामगारांच्या मागण्यांकडे कुणीही फारसे लक्ष्य देण्याच्या मानसिकतेत नाही. जिल्हा कामगार अधिकारी यांच्याकडे तक्रार करून त्यांनी या कामगारांच्या समस्या जाणूनच घेतल्या नाही. त्यामुळे कंत्राटी सफाई कामगारांनी वेठबिगारीचे जिने जगण्याची वेळ आली आहे. आरोग्यास धोकादायक असलेल्या स्थितीतही हे कामगार आपली जबाबदारी पूर्ण करतात. याउलट त्यांना किमान वेतनही मिळत नाही, याशिवाय कामासाठी पूरविली जाणारी आवश्यक संसाधणे कंत्राटदार देत नाही. त्यामुळे घाणीपासून संसर्ग होऊन असाध्य रोग जडण्याची भिती वाढली आहे.
कामगारांच्या आंदोलनामुळे शहरातील मुख्य बाजारपेठ कचरा गोळा झाला नाही. दत्त चौक, स्टेट बँक चौक, एलआयसी चौक, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, बसस्थानक चौक परिसर येथे कचरा साचलेला आढळून आला. या अकस्मात स्थितीसाठी नगर परिषदेने नियमित असलेल्या १७५ सफाई कामगारांना कामाला लावले आहे. त्यामुळे या आंदोलनाची तितकी तिव्रता जाणवली नाही. मात्र असाच संप सुरू राहिल्यास शहरात घाणीचे ढिगारे लागल्याशिवाय राहणार नाही अशी स्थिती आहे.
(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Yavatmal was not able to sweep the city today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.