क्रिमिनल ट्रॅकिंगमध्ये यवतमाळ राज्यात पहिल्या क्रमांकावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 19:08 IST2019-11-30T19:08:50+5:302019-11-30T19:08:56+5:30
‘सीसीटीएनएस’ प्रणाली अर्थात क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्किंग सिस्टीममध्ये यवतमाळ जिल्हा पोलीस दलाने राज्यात दुस-यांदा पहिला क्रमांक पटकाविला आहे.

क्रिमिनल ट्रॅकिंगमध्ये यवतमाळ राज्यात पहिल्या क्रमांकावर
यवतमाळ : ‘सीसीटीएनएस’ प्रणाली अर्थात क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्किंग सिस्टीममध्ये यवतमाळ जिल्हा पोलीस दलाने राज्यात दुस-यांदा पहिला क्रमांक पटकाविला आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (पुणे) पोलीस अधीक्षक राकेश कलासागर (तांत्रिक सेवा) यांनी मानांकन जाहीर केले आहे.
‘सीसीटीएनएस’ प्रणालीमध्ये दुसरा क्रमांक कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाचा असून, तिस-या क्रमांकावर सोलापूर ग्रामीण पोलीस दल राहिले आहे. यवतमाळ, कोल्हापूर व सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस दलाला अनुक्रमे सुवर्ण, रजत व कास्य पदक सीआयडीच्या पुणे मुख्यालयाने उत्कृष्ट कामगिरीबाबत जाहीर केले आहे. भारत सरकारच्या ई-गव्हर्नन्स अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस विभागाकरिता १५ सप्टेंबर २०१५ पासून ‘सीसीटीएनएस’ प्रणाली लागू करण्यात आली.
गुन्हेगाराची अद्यावत माहिती तात्काळ उपलब्ध होण्यासाठी ही प्रणाली उपयोगी आहे. चोरी गेलेले, हरविलेले वाहन शोधणे, व्यक्ती, लहान मुले शोधणे, अनोळखी मृतदेहांची ओळख पटविणे यासाठी या प्रणालीचा उपयोग होतो. चारित्र्य पडताळणी, पासपोर्टकरिता संबंधित व्यक्तीविरुद्ध देशात कुठे गुन्हा दाखल आहे का याची तपासणी या प्रणालीद्वारे करता येते. नागरिकांकरिता या प्रणालीवर विविध सुविधा उपलब्ध आहेत. त्यात सिटीझन पोर्टलवर ई-तक्रार नोंदविता येते. अटक आरोपींची माहितीही नागरिकांकरिता उपलब्ध आहे. सण-उत्सव काळात ऑनलाईन परवानगी मिळविण्यासाठी ही प्रणाली वापरली जाते. जिल्ह्यात या प्रणालीची जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर अधीक्षक नुरूल हसन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप शिरसकर यांच्या मार्गदर्शनात सर्वदूर अंमलबजावणी केली जाते.
पोलीस कर्तव्य मेळाव्यात गौरव
महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा २०१९ मध्ये ‘सीसीटीएनएस’ प्रणालीत राज्यात पहिला क्रमांक मिळविणा-या यवतमाळ जिल्हा पोलीस दलाला सुवर्ण चषक देऊन गौरविण्यात आले. यापूर्वी २०१७ मध्येसुद्धा या प्रणालीत यवतमाळ जिल्ह्याने पहिला क्रमांक पटकाविला होता.