यवतमाळ: माकडांच्या टोळक्यांचा धुमाकूळ, आठ जणांना घेतला चावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 14:41 IST2021-05-21T14:37:57+5:302021-05-21T14:41:36+5:30
सध्या उन्हामुळे जंगलातील माकडांचे टोळके रस्त्यावर, वस्त्यांमध्ये येत आहेत. डेहणीच्या बसथांब्यावर गेल्या आठ दिवसांपासून माकडांच्या टोळक्याने धुमाकूळ घातला आहे. (Monkeys bitten Eight people )

यवतमाळ: माकडांच्या टोळक्यांचा धुमाकूळ, आठ जणांना घेतला चावा
यवतमाळ- सध्या गाव परिसरात माकडांच्या (Monkey) टोळक्यांनी धुमाकूळ घातला आहे. धान्य व अन्य वस्तूंची नासधूस करणाऱ्या या माकडांनी आता माणसांवर हल्ले चढविणे सुरू केले आहे. यातच या माकडांनी गुरुवारी तब्बल आठ जणांना गंभीर चावा घेतल्याची घटना डेहणी येथे घडली. यामुळे गावकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. (Yavatmal: Monkeys bitten Eight people )
विनायक अर्जुन (५५), सुभाष ठाकरे (५१), नागोजी मेश्राम (६०), नारायण वारसकर, प्रफुल्ल चंदनखेडे (४०), सुधीर चंदनखेडे (३४), देवीचंद रंगारी (४०) आणि प्रमोद चुटे (४०) सर्व रा. पहूर या आठ जणांना माकडांनी चावा घेतला. ही घटना डेहणी ता. बाभूळगाव येथील बसथांब्यावर घडली.
सध्या उन्हामुळे जंगलातील माकडांचे टोळके रस्त्यावर, वस्त्यांमध्ये येत आहेत. डेहणीच्या बसथांब्यावर गेल्या आठ दिवसांपासून माकडांच्या टोळक्याने धुमाकूळ घातला आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांभोवती ही माकडे जमतात. वाहनांना धक्का देऊन पाडतात. त्यातच गुरुवारी तब्बल आठ जणांना चावा घेतला. या आठ जणांनी यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेऊन उपचार घेतले. दरम्यान, गावकऱ्यांनी सूचना दिल्यानंतर वनविभागाचा चमू डेहणीच्या बसथांब्यावर माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी पोहोचला, मात्र माकडे त्यांच्या हाती लागली नाही.
या घटनेने सध्या परिसरात दहशत आहे. विशेष म्हणजे, असेच टोळके गेल्या काही दिवसांपासून यवतमाळ-घाटंजी मार्गावर कोळंबी फाट्यावरही धुमाकूळ घालत आहे. गुरुवारीच या मार्गावर एका दाम्पत्याची दुचाकी माकडांनी अडविल्याने हे दाम्पत्य घाबरून गेले होते.